गुंटूर (आंध्रप्रदेश) – भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. येथील आचार्य नागार्जुन विद्यापिठाकडून मानद डॉक्टरेट मिळाल्यानंतर दीक्षांत समारंभाला संबोधित करतांना सरन्यायाधीश बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाचे एक ‘मॉडेल’ विकसित केले पाहिजे, जे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास शिकवते. अळंबींप्रमाणे वाढणार्या शिक्षणाच्या कारखान्यांमुळे शैक्षणिक संस्था त्यांची प्रासंगिकता गमावत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘शिक्षण हे सामाजिक एकात्मता साधण्यासाठी आणि समाजातील लोकांना चांगले सदस्य बनवण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मुख्य उद्दिष्ट काळाप्रमाणे आज्ञाधारक कर्मचारी निर्माण करणे हे राहिले आहे. यामुळे मानवी संसाधनांचे अवमूल्यन होत आहे. कुणाला आणि कसा दोष द्यावा, हे मला समजत नाही’, असे सरन्यायाधीश म्हणाले.
शिक्षणव्यवस्थेत पालट करण्यावर भर देतांना सरन्यायाधीश म्हणाले की, देशात पालटाची वेळ आली आहे. विद्यापिठाने आपल्या संशोधन शाखांच्या साहाय्याने यावर तोडगा काढावा. शासनानेही यासाठी निधी देऊन त्यांना साहाय्य करावे.