शाळिग्रामाच्या प्रतिष्ठापनेविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रेअ. आषाढ मासात गुरुपौर्णिमेनंतर असलेल्या ‘उत्तराषाढा’ या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मनक्षत्रावर सनातनच्या रामनाथी आश्रमात एका पिठावर धर्मशास्त्राप्रमाणे ‘श्रीराम शाळिग्रामा’ची प्रतिष्ठापना करावी. (‘आषाढ कृष्ण प्रतिपदा (१४.७.२०२२) या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र असतांना सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.’ – संकलक) आ. शाळिग्रामाला दूध आणि गुलाब जल यांनी अभिषेक करावा. नंतर ईश्वराने दिलेल्या नैसर्गिक गोड पदार्थांचा, म्हणजे मनुका, मध आणि खजूर या तीन गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. शाळिग्रामाची प्रतिष्ठापना झाल्यावर तो प्रसाद आश्रमातील सर्व साधकांना द्यावा. (‘असे केले.’ – संकलक) – श्री. विनायक शानभाग (५.५.२०२२) |
१. शाळिग्रामाचे नाव ‘श्रीराम शाळिग्राम’ असे का आहे ?
‘सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना होणार्या शाळिग्रामावर सुवर्णरेखा आहे, तसेच हा दिसतांना शिवलिंगासारखा दिसतो. प्रभु श्रीराम अखंड भगवान शिवाची उपासना करतात. प्रभु श्रीरामाने अनेक तीर्थक्षेत्री शिवलिंगांची स्थापना केली आहे. त्यामुळे शिवलिंगाप्रमाणेच दिसणार्या या शाळिग्रामाला ‘श्रीराम शाळिग्राम’ असे म्हटले आहे.
२. सप्तर्षींनी ‘श्रीराम शाळिग्रामा’विषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१५.४.२०२२ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या १९८ व्या सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचनाच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीराम शाळिग्राम पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना दाखवण्यासाठी नेला होता. त्या वेळी सप्तर्षींनी शाळिग्रामाचे वर्णन केलेले माहात्म्य येथे देत आहे.
२ अ. ‘श्रीराम शाळिग्राम’ हा गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम असून तो श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वाट पहात असणे : भगीरथाच्या प्रयत्नांमुळे शिवाच्या जटेतून ‘गंगा’ पृथ्वीवर आली. सनातनच्या आश्रमातील ‘श्रीराम शाळिग्राम’ हा शिवाच्या जटेतील गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम आहे. हा शाळिग्राम सत्ययुगातच पृथ्वीवर आला असून कलियुगात कार्तिकपुत्री येईपर्यंत तो त्यांची वाट पहात होता.
२ आ. प्राचीन देवस्थानांतील शाळिग्रामांप्रमाणे अत्यंत चैतन्यमय शाळिग्राम ! : या ‘श्रीराम शाळिग्रामा’ची तुलना अन्य कुठल्याही शाळिग्रामाशी होऊ शकत नाही. तिरुपती बालाजीची मूर्तीही शाळिग्रामाची आहे. थिरूवनंतपूरम् येथील श्री पद्मनाभस्वामींची शेषशायी मूर्तीही शाळिग्रामापासूनच बनवलेली आहे. अशा प्रकारचा चैतन्यमय शाळिग्राम आता सनातनच्या आश्रमातही प्रतिष्ठापित होणार आहे.
२ इ. सनातनच्या तीन गुरूंकडून पूजा करून घेण्यासाठी आलेला श्रीविष्णूची सुवर्णरेषा असलेला ‘श्रीराम शाळिग्राम’ ! : या शाळिग्रामावर एक सुवर्णरेषा आहे. ती साक्षात् श्रीविष्णूची रेषा असून ती ब्रह्मनाडीच आहे. भगवंताला सनातनच्या तीन गुरूंकडून (सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून) स्वतःची पूजा करवून घ्यायची आहे; म्हणून तो या शाळिग्रामाच्या रूपात सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापित होणार आहे.
कर्नाटकातील कोल्लूरू येथील मुकांबिकादेवीच्या मंदिराच्या गाभार्यात देवीची मूर्ती नसून एक शिवलिंग आहे. त्यावर या शाळिग्रामाप्रमाणे एक सुवर्णरेषा आहे. हे सर्व दैवी नियोजन आहे.
२ ई. रामनाथी आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे सनातनची संपूर्ण गुरुपरंपरा आनंदी झाली आहे.
२ उ. प्रतिष्ठापना झाल्यावर एक दिवस एक नाग येऊन त्याची कात त्या शाळिग्रामाच्या भोवती सोडून जाईल.
श्रीविष्णुभक्त वृंदाकडून श्रीमन्नारायणाला मिळालेला शाप आणि श्रीमन्नारायणाने वृंदेला दिलेले वर !
१. जालंधर असुर आणि श्रीविष्णुभक्त वृंदा
‘शिवाच्या क्रोधाग्नीतून जालंधर नावाच्या असुराची उत्पत्ती होते. पुढे जालंधर असुराचा विवाह विष्णुभक्त वृंदाशी होतो. वृंदा ही पतिव्रता असते. जालंधर असुर शिवावरच आक्रमण करतो. त्या दोघांमध्ये तुल्यबळ युद्ध होते. युद्धात शिव जालंधरला हरवू शकत नाही. तेव्हा श्रीविष्णूच्या लक्षात येते, ‘जोपर्यंत वृंदाचे पातिव्रत्य भ्रष्ट होत नाही, तोपर्यंत जालंधरला हरवणे अशक्य आहे.’ तेव्हा श्रीविष्णु वृंदाकडे जालंधराचे रूप घेऊन जातो. त्यामुळे वृंदाचे पातिव्रत्य भंग होते आणि शिवाला जालंधराचा वध करता येतो. (संदर्भ : पद्मपुराण)
२. वृंदाने श्रीविष्णूला दिलेला शाप !
जेव्हा वृंदाला कळते की, ‘माझे आराध्यदैवत श्रीविष्णुच माझ्या पतीचे रूप घेऊन आला आहे’, तेव्हा वृंदाला फार दुःख होते. वृंदा श्रीविष्णूला शाप देते, ‘तुला वैकुंठ लोक सोडून पृथ्वीवर दगड (शाळिग्राम), गवत (कुश नावाचे गवत) आणि झाड (पिंपळाचे झाड) होऊन रहावे लागेल.’ परम भक्त वृंदासाठी भगवान श्रीविष्णु तो शाप स्वीकारतो आणि वृंदाला वरदान देतो, ‘तू तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि तुळशीचा शाळिग्रामाशी विवाह केला जाईल. तसेच श्रीविष्णूला नैवेद्य अर्पण करतांना त्यावर तुळस घातली असेल, तरच भगवंत तो नैवेद्य ग्रहण करील.’ तेव्हापासून पृथ्वीवर तुळशी विवाहाची प्रथा आणि श्रीविष्णूला नैवेद्य दाखवतांना नैवेद्यावर तुळशीपत्र घालण्याची पद्धत चालू झाली. (संदर्भ : पद्मपुराण) (शाळिग्रामाच्या व्युत्पत्तीविषयी पुराणांमध्ये काही पाठभेद आढळतात, उदा. ब्रह्मवैवर्तपुराणात शाळिग्राम व्युत्पत्तीची कथा वेगळी आहे. – संकलक)
३. भगवान श्रीविष्णु शाळिग्रामाच्या रूपात पृथ्वीवर आल्यावर सर्व देवीदेवताही ‘वज्रकीट’ नावाच्या किड्याच्या रूपात पृथ्वीवर येणे
वृंदेने दिलेल्या शापामुळे भगवंत वैकुंठातून पृथ्वीवर शाळिग्रामाच्या रूपात आला; मात्र ‘श्रीविष्णु पृथ्वीवर कुठे आहे ?’, हे कुणालाही कळेना. सर्व देवीदेवता नारायणाचा परम भक्त असलेल्या नारदाला ‘श्रीविष्णु कुठे आहेत ?’, असे विचारतात. तेव्हा नारद सांगतात, ‘‘भगवंत शाळिग्रामाच्या रूपात पृथ्वीवरील ‘दामोदर कुंड’ नावाच्या तलावात आहे.’’ जेथे भगवंत आहे, तेथेच सर्व देवीदेवता असतात. सर्व देवीदेवता भगवंताची भक्ती करण्यासाठी ‘वज्रकीट’ नावाच्या कीटकाचे रूप धारण करतात. हा कीटक पाण्यात रहातो आणि त्याचे दात ‘वज्रा’सारखे, म्हणजे हिर्यासारखे कठीण असल्याने तो दगडावर कोरू शकतो. सर्व देवता भगवंताचे नामस्मरण करत वज्रकीटाच्या रूपात शाळिग्रामरूपी दगडामध्ये भगवंताची शंख, चक्र, गदा आणि पद्म ही शुभचिन्हे कोरतात.
४. वज्रकीटांनी कोरलेल्या आकारानुसारअसंख्य प्रकारचे शाळिग्राम असणे
वज्रकीट रूपातील देवतांनी शाळिग्रामाला दिलेल्या आकारानुसार किंवा त्यांनी शाळिग्रामावर कोरलेल्या आकाराप्रमाणे शाळिग्रामाला वेगवेगळी नावे पडली. ‘सुदर्शन, दशावतार, पद्म, श्रीराम, गदा, मधुसूदन, जर्नादन, अनिरुद्ध, संकर्षण, प्रद्मुम्न, शंख, चक्र, कृष्ण, परशुराम, विश्वरूप, सूर्य, शेष, लक्ष्मी-नारायण’, असे अनेक प्रकारचे शाळिग्राम आहेत.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (५.५.२०२२)
‘श्रीराम शाळिग्रामा’वर प्रार्थना करत असलेल्या हनुमंताचे रेखाचित्र दिसणे
‘१४.४.२०२२ या दिवशी दुपारी मी पलंगावर विश्रांती घेत होते. तेव्हा मला ‘दोन वानर कुठेतरी जात आहेत’, असे दृश्य दिसले. काही वेळाने मी उठल्यावर सहज शाळिग्रामाकडे पाहिले. तेव्हा मला त्याच्यावर पांढर्या आकारातील हनुमंताचे रेखाचित्र दिसले. ‘हनुमंत उभा असून तो हात जोडून प्रार्थना करत आहे’, असे मला वाटले. शाळिग्रामाचा निमुळता भाग खाली करून शाळिग्राम उभा करून बघितल्यावर मला हनुमंताचे दर्शन झाले. शाळिग्रामावरील हनुमंताचे रेखाचित्र बघितल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला वानर दिसणे’ हे शाळिग्रामावर हनुमंत असल्याचे सूचक होते.’ हनुमंताच्या त्या रेखाचित्राकडे बघून ‘तो रामराज्य येण्यासाठी श्रीरामाला प्रार्थना करत आहे’, असे मला वाटले. या शाळिग्रामावर सुंदर अशी सुवर्णरेषा आहे.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (५.५.२०२२)
श्रीराम शाळिग्रामाच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सनातनला लाभले विविध देवतांचे आशीर्वाद !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ज्या ठिकाणी श्री ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध देवतांची तत्त्वे एकवटली आहेत. शाळिग्राम हे श्री महाविष्णूचे निर्गुण रूप आहे. त्यावरील नैसर्गिक रेषांत हनुमंताचे प्रार्थना करतांनाचे सुंदर चित्र दिसते. या शाळिग्रामाचा आकार शिवलिंगासारखा आहे आणि त्याचे नाव ‘श्रीराम शाळिग्राम’ आहे.
अशा प्रकारे श्रीराम शाळिग्रामाच्या स्थापनेने त्या स्थानी श्री ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायक, श्री महाविष्णु, प्रभु श्रीराम, हनुमंत आणि भगवान शिव अशा विविध देवतांचे तत्त्व आकृष्ट झाले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध देवतांचे आशीर्वाद लाभावे, यासाठीच सप्तर्षींनी शाळिग्रामाच्या प्रतिष्ठापनेसाठी हे स्थान निवडून सुंदर लीला घडवली आहे’, असे जाणवले. त्यासाठी सप्तर्षींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२२.७.२०२२)
श्रीराम शाळिग्राम स्थापनेच्या वेळी पुष्कळ चैतन्य कार्यरत झाल्यामुळे डोळे आपोआप मिटणे
‘सप्तर्षींच्या आज्ञेने १४.७.२०२२ या दिवशी उत्तराषाढा हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मनक्षत्र असतांना श्रीराम शाळिग्रामची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी पुष्कळ प्रमाणात चैतन्य कार्यरत झाले होते. त्या ठिकाणी एवढे चैतन्य होते की, ‘चैतन्याच्या प्रवाहामुळे डोळे आपोआप मिटत आहेत’, असे जाणवत होते.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२२.७.२०२२)
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या हनुमानाच्या रूपांचे वैशिष्ट्य !
‘काळानुसार हनुमानतत्त्व आवश्यक आहे; म्हणून हनुमानाची एक मूर्ती सनातनच्या रामनाथी आश्रमात प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. ती दक्षिणाभिमुख आहे. आता श्रीराम शाळिग्रामाची स्थापना करतांनाही त्यावर नैसर्गिक रेषांमध्ये दिसून येणारा हनुमानही दक्षिणाभिमुखच आहे.
दक्षिण दिशा काळाची, म्हणजेच यमदेवतेची दिशा आहे. हनुमान हा काळावर अधिपत्य असलेल्या भगवान शिवाचा अवतार आहे. त्यामुळेच ‘दक्षिणाभिमुख हनुमानाच्या पूजनाने मृत्यूभय नष्ट होते’, असे म्हणतात. सध्या बाह्य परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. भीषण आपत्काळात साधकांचे जीवितरक्षण होण्याच्या दृष्टीने आश्रमात दक्षिणाभिमुख असलेल्या हनुमानाच्या २ रूपांची प्रतिष्ठापना होणे, ही ईश्वराची दिव्य लीला आहे ! साधकांच्या रक्षणासाठी आणि रामराज्याप्रमाणे असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी आश्रमात अवतरलेल्या रामभक्त हनुमंताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !’- श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२२.७.२०२२)
श्रीविष्णूचे पृथ्वीवरील मस्तक मानले गेलेले ‘दामोदर कुंड’ !
‘समुद्रसपाटीपासून ४ सहस्र ८९० मीटर उंचीवर असणार्या नेपाळमधील हिमालयाच्या शिखरांवर ‘दामोदर कुंड’ नावाच्या तलावात शाळिग्रामची उत्पत्ती होते. या ‘दामोदर कुंडा’पर्यंत पोचणे पुष्कळ अवघड आहे. ‘दामोदर कुंड’ हा तलाव ‘काली गंडकी’ नदीचे उगमस्थान आहे. भक्त दामोदर कुंडातून ‘काली गंडकी’ नदीमध्ये वहात आलेले शाळिग्राम घेऊन येतात. सर्वसामान्य शाळिग्राम ५० ग्रॅम ते २०० ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो.
१. दामोदर कुंडाचे वैशिष्ट्य
‘दामोदर कुंड’ तलाव हिमालयातील उंच ‘दामोदर हिमल’ नावाच्या हिमशिखरावर आहे. समुद्रसपाटीपासून ४ सहस्र ८९० मीटर उंचीवर हा तलाव आहे.
वर्षातील ९ मास हा तलाव गोठलेला असतो. ‘दामोदर कुंडा’त काही सहस्र नव्हे, तर काही कोटी शाळिग्राम आहेत. तलावातील बर्फ वितळल्यावर त्या तलावातील पाणी हिमालयातून खाली येते आणि ते पाणी नदीचे रूप धारण करते. या नदीचे नाव ‘गंडकी’ आहे.
२. ‘दामोदर कुंडा’त भक्तीभावाने एक तुळशीपत्र अर्पण केले, तर शळिग्राम आपोआप वर येत असणे
‘दामोदर कुंडा’तील शाळिग्राम पाण्याच्या समवेत वहात ‘गंडकी’ नदीत येतात. ‘दामोदर कुंडा’पर्यंत जाणे अत्यंत कठीण असल्याने बरेच लोक ‘गंडकी’ नदीत वहात आलेले शाळिग्राम घेतात. थोडेच लोकच ‘दामोदर कुंडा’पर्यंत पोचू शकतात. ‘दामोदर कुंडा’पर्यंत जाऊन आलेले लोक सांगतात, ‘आपण भक्तीभावाने एक तुळशीपत्र ‘दामोदर कुंडा’त अर्पण केले, तर कुंडाच्या पाण्यातून शाळिग्राम आपोआप वर येतो.’ या ‘दामोदर कुंडा’ला श्रीविष्णूचे पृथ्वीवरील मस्तक मानले जाते.
३. शाळिग्रामचा मूलमंत्र
ॐ नमो भगवते विष्णवे श्रीसालग्रामनिवासिने सर्वाभीष्टफलप्रदाय सकलदुरितनिवारिणे सालग्रामाय स्वाहा ।
अर्थ : इच्छित फलप्राप्तीसाठी आणि सर्व संकटांच्या निवारणासाठी शाळीग्रामात निवास करणार्या भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो. हे शाळीग्रामासाठी अर्पण करत आहे.
शाळिग्रामनिवासी श्रीविष्णूला केलेली प्रार्थना‘हे शाळिग्राम रूपी महाविष्णु, तुझ्या लीला अनंत आहेत आणि तुझी रूपेही अनंत आहेत. हे शाळिग्राम देवा, अनंताची लीला आम्ही काय जाणणार ? हे भगवंता, आम्ही तुझ्या प्राप्तीसाठी कठीण तपश्चर्या केली नाही; मात्र तू आमच्यासाठी आश्रमात आला आहेस. तुझ्या दर्शनाने आणि तुझी भक्ती करून आम्हाला श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या चरणांची प्राप्ती लाभो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’ |
संदर्भ : मुरली भट्टर कृत ‘शाळिग्राम महिमा’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई, तमिळनाडू.