‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘दुहेरी अवतरणचिन्ह’ आणि ‘अपसारणचिन्ह’ वापरण्याची पद्धत !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘एकेरी अवतरणचिन्हा’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘दुहेरी अवतरणचिन्ह (‘‘  ’’)’ आणि ‘अपसारणचिन्ह (-)’ या दोन्ही चिन्हांविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ८ – भाग १०)

मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/592925.html


२ ओ. दुहेरी अवतरणचिन्ह :  हे ‘‘  ’’ या खुणेने दाखवले जाते. जे लिखाण ‘दुहेरी अवतरणचिन्हा’त घ्यावयाचे असते, त्याच्या आरंभी ‘‘ ही खूण करतात आणि लिखाण संपल्यानंतर ’’ ही खूण केली जाते. भाषा लिहितांना ‘दुहेरी अवतरणचिन्हा’चा उपयोग पुढील ठिकाणी केला जातो.

२ ओ १. व्यक्तीचे प्रत्यक्ष बोलणे दुहेरी अवतरणचिन्हात लिहिले जात असणे : व्यक्तीचे प्रत्यक्ष बोलणे लिखित भाषेत मांडतांना दुहेरी अवतरणचिन्हात लिहिले जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. विमल म्हणाली, ‘‘जेव्हा हे पाश्चात्त्य लोक टोळ्या करून रानोमाळ हिंडत होते, तेव्हा आमच्या देशाची संस्कृती सर्वाेच्च स्तरावर होती.’’

आ. गुरुजी म्हणाले, ‘‘अरे, सापाला दूध पाजले, म्हणून त्याच्या दातांमधून दूध बाहेर पडत नाही, तर विषच बाहेर पडते.’’

इ. ‘‘तीर्थक्षेत्री आल्यावर सहलीला आल्यासारखे वागू नका’’, मधूने मित्रांना दटावले.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२ औ. अपसारणचिन्ह : हे ‘-’ या खुणेने दर्शवले जाते. आपण यापूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शुक्रवार, १०.६.२०२२ या दिवशीच्या लेखामध्ये अभ्यासलेले ‘संयोगचिन्ह (-)’ आणि ‘अपसारणचिन्ह (-)’ ही दोन्ही चिन्हे दिसावयास सारखीच आहेत; मात्र त्यांच्यामध्ये अर्थाच्या दृष्टीने एक भेद आहे. संयोगचिन्ह हे दोन शब्दांमधील दुवा बनून त्यांना जोडण्याचे कार्य करते, उदा. राम-लक्ष्मण, तर अपसारणचिन्ह एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमुहाला अन्य लिखाणापासून वेगळेपणा प्राप्त करून देण्याचे कार्य करते. सनातनच्या वाङ्मयात केवळ पुढील ठिकाणी अपसारणचिन्हाचा वापर केला जातो.

२ औ १. दोन उपमथळे एकापुढे एक येणे : एखाद्या लेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूत्रे असतात, उदा. लेखातील वर्ण्य विषयाची वैशिष्ट्ये, त्यात जाणवलेले पालट, साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी. या सूत्रांपैकी एखाद्या सूत्रामध्ये एकच उपसूत्र असेल, म्हणजे समजा, ‘वर्ण्य विषयाची वैशिष्ट्ये’ आणि ‘त्यात जाणवलेले पालट’ एकाहून अधिक असतील अन् ‘अनुभूती’ एकच असेल, तर ‘अनुभूती’ या सूत्राची मांडणी पुढीलप्रमाणे केली जाते. या मांडणीत अपसारणचिन्हाचा उपयोग करतात. पुढील उदाहरणात दिलेला ‘३’ हा आकडा केवळ उदाहरणादाखल देण्यात आलेला आहे. लेखाच्या अनुक्रमाप्रमाणे हा आकडा अन्य कोणताही असू शकतो.

३. अनुभूती – संतांच्या शरिराभोवती पिवळा प्रकाश दिसणे : अशा प्रकारे उपमथळे देऊन ‘अपूर्णविरामा’च्या (‘:’च्या) पुढे साधकाला आलेली अनुभूती लिहिली जाते.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०२२)