गोपीभाव !

‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता ! आर्तता, व्याकुळता, तरलता, स्पष्टता, सहजता, मोहकता, सुंदरता, समरसता, एकरूपता, अखंडता अशा सर्व गुणांनी व्याप्त असलेले गोपीमन हे ईश्वराच्या सर्वश्रेष्ठ अशा अंगीभूत कार्यपैलूंनी भरलेले आहे. श्रीकृष्णतत्त्वाच्या सर्वविध गुणांची अष्टपैलूत्वाने साकारलेली व्याप्ती पहायची असेल, तर गोपीभाव अनुभवायला हवा, तरच श्रीकृष्णभेटीची खरी आस, आर्तता यांची अनुभूती येऊ शकते. भक्तीरसातील माधुर्यता म्हणजे गोपी, तर माधुर्यतेतील सहजता म्हणजे श्रीकृष्णभाव ! श्रीकृष्णभक्तीतील प्रेमरसमय उत्कटता, म्हणजे गोपीभाव ! गोपीभाव असणाऱ्या साधक किंवा साधिका यांनी श्रीकृष्णाशी केलेला संवाद, म्हणजे परमात्म्याशी संवाद, म्हणजे साऱ्या ब्रह्मांडाला व्यापून उरणाऱ्या हरिमनाचा ठाव घेणारा तो एक शुद्धस्वरूप आणि सतत सद्-चित्-आनंदात ठेवणारा शब्दविलास होतो. 

(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – ‘कलियुगातील गोपी-कृष्ण : वृषाली आणि प्रतीक्षा’)    

गोपींप्रमाणे भाव ठेवण्याचा प्रयत्न करून श्रीकृष्णाला अनुभवूया !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

द्वापरयुगातील गोपींची श्रीकृष्णभक्ती किती उत्कट होती ! भक्ती ही ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी’, असे नारदमुनींनी म्हटले आहे. गोपींची प्रत्येक कृती कृष्णभावाने भरलेली असते. गोपींच्या कृतीच्या आरंभी कृष्ण असतो, कृतीमध्ये कृष्ण असतो आणि कृतीनंतरही कृष्ण असतो, तसेच त्यांची प्रत्येक कृती कृष्णासाठीच असते. ‘प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार सुचणे कृष्णकृपेनेच शक्य होत आहे’, हाच गोपींचा भाव असल्याने त्यांची प्रत्येक कृती अन् प्रत्येक विचार कृष्णाला समर्पित असतो. त्या स्वतःमध्येही कृष्णाला पहातात आणि दुसऱ्यांमध्येही कृष्णाला पहातात. कृष्णाविना त्यांना दुसरा विचारच सुचत नाही. एक क्षणही कृष्णाविना गेला, तरी त्यांना पुष्कळ हळहळ वाटते. या कलियुगात गोपींचे असे वर्णन वाचून कदाचित् एखाद्याला ती अतिशयोक्ती वाटेल; पण हे वर्णन सत्य आहे. आपणही गोपी जशा भाव ठेवतात, तसा भाव ठेवण्याचा प्रयत्न करून श्रीकृष्णाला अनुभवूया अन् त्याचा कृपाशीर्वाद मिळवून जीवनाचे सार्थक करून घेऊया !

– (सद्गुरु) डॉ. मुकुल माधव गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, सनातन आश्रम, गोवा.

निरपेक्ष प्रीतीचे भावामृत !

श्रीकृष्णाने ‘अखिल ब्रह्मांडाचा मालक, म्हणजेच तो  स्वतः समवेत असल्या’चे सांगून आश्वस्त करणे 

मी : श्रीकृष्णा, केवढे विशाल गगन आहे रे तुझे !

श्रीकृष्ण : हो.

मी : सूर्य, चंद्र, तारे, वारे, जलाशय, ही वसुंधरा, या वनस्पती, हे प्राणी, हे सारे जीवमात्र, सारे सारे तुझेच आहेत ना रे !

श्रीकृष्ण : हो.

मी : अखिल ब्रह्मांड, सप्तलोक, सप्तपाताळ, जे जे काही आहे, ते ते सर्व तुझेच आहे ना !

श्रीकृष्ण : हो.

मी : या विश्वात माझे काहीच नाही का रे ?

श्रीकृष्ण (हसून पहात) : असे कसे होईल ? मी आहे ना तुझा !

– एक साधिका

‘स्वतःचे डोेळे नि केस श्रीकृष्णाचेच आहेत’, असे वाटणे आणि श्रीकृष्णाचे स्मरण करत स्वतःचे आवरतांना ‘स्वतः एक गोपी आहे’, असे वाटणे !

एकदा मी केस विंचरतांना आरशात बघत होते. तेव्हा माझे डोेळे नि केस माझे नसून श्रीकृष्णाचेच वाटले. त्यानंतर मी आतुरतेने श्रीकृष्णाचे स्मरण करत आवरत होते, केस विंचरत होते, कुंकू लावत होते, तसेच ‘त्याला आवडेल’ असा भाव कसा ठेवू ?’, याच विचारात होते. माझे सर्व आवरून झाले, तेव्हा ‘मी एक गोपी आहे’, असे वाटले. मी सलवार-कुर्ता परिधान केलेला होता, तरीही ‘मी साडी नेसले आहे’, असे वाटले.

एकदा  सायंकाळी  मी दैनिक विभागात एक संगणकीय प्रत काढायला गेले होते. ती घेऊन विभागात परत येतांना ‘माझ्या मागून बाळकृष्ण येत असल्या’चे जाणवले. त्याला पुष्कळ आनंद झाला होता. ‘मी प्रत काढली. मी सेवा केली’, असे म्हणत तो उड्या मारत होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘हो, तूच सेवा केलीस. तूच प्रत काढलीस.’ ते ऐकून तो माझ्या मागे उड्या मारत येऊ लागला. मी विभागात जाऊन संगणकासमोर बसेपर्यंत तो मागे आला. नंतर उड्या मारतच तिथून निघून गेला. त्यानंतर माझे मन आनंदी होते.

–  सौ. निशिगंधा नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भाव का ठेवायला हवा ?

प्रत्येक कृती देवासाठी आणि देवाला अपेक्षित अशी करणे म्हणजे भाव !

व्यवहारातही कोणतीही कृती करतांना ‘ती सत्साठी, म्हणजे ईश्वरासाठी त्याची सेवा म्हणून करत आहे’, असा भाव असेल, तर प्रत्येक कृती करतांना साधना होते. त्यामुळे घर, कार्यालय, समाज आणि राष्ट्र कार्य हे सत्ची म्हणजे ईश्वराची सेवा म्हणून केले, तर त्याचा लाभ होतो. ‘प्रत्येक कृती देवासाठी आणि देवाला अपेक्षित अशी करणे’ हाच देवाप्रतीचा भाव आहे. त्यामुळे ती कृती भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यास साहाय्य होते.

साधना करतांनाही स्नान करणे, जेवणे यांसारख्या व्यष्टी कृती, तसेच नामजप, प्रार्थना, सेवा, दोष-निर्मूलन प्रक्रिया यांसारख्या साधनेच्या कृती भावपूर्ण केल्या, तर त्याचा अधिक पटींनी लाभ होतो आणि त्या ईश्वरचरणी अर्पण होतात !

भाव ठेवल्याने होणारे लाभ !

‘श्री दुर्गादेवीला सकाळी भांडी घासलेली आवडणार नाही’, असा विचार करून रात्रीच भांडी घासल्याने घरात देवीचे अस्तित्व जाणवणे आणि विसर्जनानंतर नमस्कार करतांना ती आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे !

‘१८.१०.२००७ या दिवशी नवरात्रीमधील सातव्या दिवशी रात्री ‘भांडी सकाळी घासावीत’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु ‘श्री दुर्गादेवी येथे आहे, तिला हे आवडेल का ?’, असा विचार येऊन मी लगेच भांडी घासली. त्या रात्री झोपल्यानंतर माझ्या मुलीला घरात श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवले. ‘श्री दुर्गादेवी रागाने युद्ध करत आहे’, असे तिला जाणवले. स्वयंपाकघरातून तिला पैंजणांचा आवाज आला. तेव्हा मला आनंद झाला. श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनानंतर मी नमस्कार करत असतांना मला तिथे श्री दुर्गादेवीचे पुष्कळ मोठे रूप दिसून ‘ती मला आशीर्वाद देत आहे’, असे जाणवले.’ – एक साधिका, विशाखापट्टणम्

भावामुळे सूक्ष्मातील कळून योग्य कृती होणे !

‘मी जेवतांना परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना भरवत आहे’, असा भाव ठेवून जेवत होतो. तेव्हा एका साधिकेने जिलेबीचे भांडे समोर ठेवून ‘शिल्लक राहिलेली जिलेबी संपवा’, असे सांगितले. तेव्हा मी जवळील ४-५ साधकांच्या ताटामध्ये जिलेबी वाढली. काही साधक दुसऱ्या ठिकाणी गेले होते. एका ताटामध्ये मी अधिक वाढली. माझ्या हातून हे सर्व नकळत घडले. १ मिनिटाने साधक आल्यानंतर ज्या ताटामध्ये अधिक जिलेबी वाढली होती, तो साधक म्हणाला, ‘‘अरे वा ! मला जिलेबी आवडते. मला कुणी एवढी जिलेबी वाढली ?’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. भावजागृतीचे प्रयत्न करतांना आवश्यक कृती कशा आपोआप घडतात, याची अनुभूती आली.’ – श्री. परेश कानडे, कोल्हापूर

भावामुळे पुढे घडणाऱ्या गोष्टी आधीच दिसणे !

‘सनातनच्या मिरज आश्रमात प.प. भगवान श्रीधरस्वामी यांच्या पादुकांच्या पूजनाचा मंगल सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. आदल्या दिवशीपासून मी पाद्यपूजेशी संबंधित सेवा करतांना  परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत मला चरण दिसत होते. त्यानंतर मी जिथे जात होते, तिथे मला पादुका दिसत होत्या आणि ‘मी पादुकांचीच सेवा करत आहे’, असे वाटत होते. त्यानंतर मला आश्रमावर मोठ्या पादुकांचे दर्शन झाले. आदल्या दिवशीपासून विविध प्रसंगांत मला ज्या पादुका (सूक्ष्मातून) दिसत होत्या, त्याच चरणपादुका प्रत्यक्षात प.प. श्रीधरस्वामींच्या भक्तांनी आणल्या होत्या !’

– कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भावामुळे निर्माण होणारी उत्कट भावावस्था !

माझ्या मनात विचार येतो, ‘गावोगावी फिरावे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे गुणगान (कीर्तनभक्ती करावी) करावे. आपला देह आणि वाणी यांसाठीच झिजवावी. प.पू. डॉक्टरांप्रती सर्वांची भावभक्ती कशी वाढेल ? यासाठीच प्रयत्न करावेत. प.पू. डॉक्टरांचे माहात्म्य जाणून सर्व लोक त्यांच्या चरणी शरण आले, तर सर्वांचा उद्धार होणे शक्य होईल आणि असेच व्हावे.’ – एक साधिका

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.