शिवसेनेसमवेत बंडखोरी करणारे कधीही निवडून आले नाहीत ! – अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी सर्व पदे भूषवली आहेत. त्यामुळे ते नशीबवान आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना पद सोडावे लागले. त्या आधीही शिवसेनेतील छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यामुळे शिवसेना फुटली; पण शिवसेनेशी बंडखोरी करणारे पुन्हा निवडून आले नाहीत. फुटणाऱ्या शिवसेना नेत्यासमवेत शिवसैनिक जात नाहीत, हा इतिहास आहे. याचे बंडखोर आमदारांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केले. ४ जुलै या दिवशी विधानसभेत बहुमत चाचणी पार पडल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनंदनाच्या प्रस्तावर बोलत होते.

ते म्हणाले की,

१. १०६ आमदार असलेल्या भाजपला सत्ता मिळत नाही; पण ४० आमदारांमुळे सत्ता आली आणि मुख्यमंत्रीपद मिळाले. शिवसेनेचे मुख्यमंत्री तेव्हाही एकनाथ शिंदेच होणार होते; पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना आग्रह केल्याने ते मुख्यमंत्री झाले.

२. आजपर्यंत मी कुणालाही फोडले नाही; मात्र भाजपसमवेत एकनाथ शिंदे गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध पाढा वाचला गेला; मात्र मी निधीवाटपात कोणताही भेदभाव केला नाही. मी सर्वांनाच निधी दिला आहे.

३. ज्या पद्धतीने शिंदे-बंडखोरांसह काँग्रेसनेही आमच्यावर आरोप केला; परंतु शिंदे जे आरोप करतात, तो खोटा आहे. लोकांनी आमच्यावर झालेला आरोप मनातून काढावा.

४. उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊन जे काही केले असते, त्यातून सर्वांना समाधान लाभले असते. आमचे सत्तेला सहकार्य असेल; पण जिथे राज्याचे हित पाळले जाणार नाही, तेव्हा आम्ही विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून देऊ.

५. राजकीय मते, भूमिका वेगळी असू शकते; पण राज्याच्या विकासासाठी आम्ही आमची भूमिका पार पाडण्यासाठी कुठेही अल्प पडणार नाही.

६. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानूनच काम करावे लागणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची नियुक्ती !

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी ४ जुलै या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना याविषयीचे पत्र दिले. नंतर अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली.