एकनाथ शिंदे आणि माझ्यात कधीही कुरघोडी राजकारण दिसणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होणार असल्याचे प्रतिपादन

एकनाथ शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी २४ घंटे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझा पूर्णपणे पाठिंबा राहील. त्यांच्यात आणि माझ्यात कधीही दुरावा किंवा कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ४ जुलै या दिवशी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमताचा प्रस्ताव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतांना फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,

१. शिवसेना आणि भाजप यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत प्राप्त करून जनतेचा मोठा विश्‍वास संपादन केला आहे. धनानंदाची सत्ता निरंकुश होते, त्या वेळी चाणक्यांना चंद्रगुप्त शोधावा लागतो. अशा प्रकारे एकनाथ शिंदे सत्तेत आले आहेत.
२. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहेत. ते कुशल संघटक असून जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहेत.
३. अनेकदा पदे मिळाल्यावर व्यक्ती माणुसकी विसरतो; परंतु एकनाथ शिंदे हा माणुसकी असलेला नेता आहे. येत्या काळात ते यशस्वी मुख्यमंत्री होतील.
४. पक्षनेतृत्वाने मला उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय दिला. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदापर्यंत नेले, त्या पक्षाने घरी बसण्याचा निर्णय दिला, तरी तोही मी स्वीकारला असता.
५. मागील सरकारचे निर्णय आम्ही सूडाच्या भावनेने रहित करणार नाही. चांगले निर्णय आम्ही पुढे नेऊ. गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतले जातील.

‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ यांच्या नामांतरासाठी पुन्हा मंत्रीमंडळाची बैठक !

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक घेतली जात नाही, हे संकेत आहेत; परंतु राज्यपाल्याच्या निर्णयानंतरही महाविकास आघाडीने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन काही निर्णय घेतले. ‘हे निर्णय लागू करण्यासाठी आम्ही पुन्हा मंत्रीमंडळाची बैठक घेऊ’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नमूद केले. महाविकास आघाडीने घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’ जिल्ह्याचे नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.