रथोत्सवाचे दर्शन घेत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य थेट साधिकेच्या चित्ताला भेदून जाणे आणि परमात्म्याच्या प्रीतीचा स्पर्श होऊन तिला अश्रू येणे

रथोत्सव होण्यापूर्वी सनातनचे तीनही गुरु रथात बसून येत असल्याचे दिसणे आणि स्थुलातूनही तसेच दर्शन होणे

सनातनच्या रामनाथी आश्रमातून मार्गस्थ होतांना श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे)
सौ. मनीषा वाघमारे

मागील सप्ताहात मला एक दृश्य डोळ्यांसमोर दिसत होते. त्यात ‘६ – ७ पांढऱ्या घोड्यांचा रथ आहे. त्यात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.)गाडगीळकाकू विराजमान आहेत’, असे मला दिसले. तेव्हा मला वाटले, ‘या तर देवी आहेत.’ तसेच ‘एक पिवळसर व्यक्ती तो रथ चालवत आहे’, असेही मला दिसले. ‘ती पिवळसर व्यक्ती म्हणजे सूर्यदेव असावा’, असे मला वाटले; पण श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू नेहमी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत असतात. यापूर्वी मी देव आणि देवी एकत्रित असलेल्या घोड्यांच्या रथाचे चित्रही पाहिलेले नाही. देवी घोड्यांच्या रथात विराजमान नसून त्या वाघावर असतात; म्हणून ‘हा भास किंवा कल्पना असावी,’ असे मला वाटले. त्या दृश्यातील शुभ्र रंगांचे घोडे अतिशय मोहक दिसत होते. तो रथ आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गक्रमण करत असल्याचे जाणवत होते. त्या दृश्यातील आनंद मी घेतला आणि ‘ते दृश्य पुनःपुन्हा पहावे’, असे मला वाटत होते. २२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू असे तीनही गुरु जेव्हा रथात दिसले, तेव्हा वरील दृश्य देवाने मला या आधीच दाखवल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

–  सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२२)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव पहातांना सौ. मनीषा वाघमारे यांना आलेल्या अनुभूती

१. भूमाता विष्णुदेवाची वाट पहात असल्याचे जाणवणे

‘रथोत्सव होण्याच्या १ दिवस आधी रामनाथी (गोवा) येथील आश्रमापासून ते नागेशीपर्यंतच्या मार्गाची स्वच्छता केली होती. माझे खोलीतून तिकडे लक्ष गेले असता मला ‘तो मार्ग पूर्णतः निळा झाला असून भूमाता पुष्कळ प्रसन्न झाली आहे. ‘उद्याची सकाळ कधी होईल’, याची ती आतुरतेने वाट पहात आहे’, असे मला वाटले. ‘भूमाता विष्णुदेवाची वाट पहात आहे’, असेही मला जाणवले.

२. गुलाबी कमळांवरून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पांढऱ्या कमळांवरून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ येत असल्याचे जाणवणे

‘रथोत्सव येत आहे’, असा निरोप मिळण्याच्या आधी त्या मार्गावर सर्वत्र कमळे पसरली आहेत. गुलाबी छटा असलेल्या सुंदर कमळांवरून एक एक चरण टाकत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई येत आहेत, तर पांढऱ्या कमळांवरून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू त्यांचे एक एक कोमल चरण कमळांवर ठेवत आश्रमाकडे येत असल्याची चाहूल मनाला जाणवली.

३. ‘छोटे जीव विष्णुनारायण, भूमाता आणि लक्ष्मीमाता यांना पहात आहेत’, असे जाणवणे

सर्व साधक हे दृश्य पहात आहेत. ‘सर्वत्र निळा सागर दिसू लागला. त्या निळ्या सागरात ‘आम्ही छोटे जीव विष्णुनारायण, भूमाता आणि लक्ष्मीमाता यांना पहात आहोत’, असे मला जाणवले. सर्वच साधक क्षीरसागरात उभे आहेत आणि त्या सर्वांकडे याचक भावाने पहात आहोत’, असे दृश्य मला दिसू लागले.

४. आम्ही रथोत्सवातील साधकांना पिण्यासाठी पाणी ठेवले होते. त्यामध्ये ‘त्या क्षीरसागरातील एक एक थेंब मिसळत आहे आणि गंगामातेने आपले पवित्र जल प्रवाहित केले आहे’, असे मला जाणवले.

५. परात्पर गुरु डॉक्टर यांना पहाताच आलेल्या अनुभूती

५ अ. गुरुदेवांचे चैतन्य थेट चित्ताला भेदून जाणे आणि परमात्म्याच्या प्रीतीचा स्पर्श होऊन अश्रू येणे : एरव्ही भावसत्संगामध्ये भावजागृती किंवा आत्मनिवेदन करतांना भावजागृती होते. त्या वेळी आपण शब्द आणि त्यानुसार अनुभवणे अन् मग भाव जागृत होणे, अशी प्रक्रिया होते. या वेळी परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर शब्द नव्हते किंवा शब्दांप्रमाणे अनुभवणे नव्हते, तर ‘त्यांच्यातील चैतन्य थेट चित्ताला भेदून अंतरात्म्याला परमात्म्याच्या प्रीतीचा स्पर्श होऊन अश्रू येत आहेत’, असे वाटले.

५ आ. ‘स्वतः केवळ शरीर नसून अनंत जन्मांनंतरचा हा दैवी स्पंदनांचा स्पर्श चित्ताला भेदत आहे’, असे वाटले. ‘आपण शरीर नसून परमात्म्याचे अंश आहोत’, हे जाणवत होते. मध्येच ‘आपल्याला शरीर नाहीच’, असे वाटले.

५ इ. पुष्कळ दिवसांची प्रतीक्षा या दिवशी पूर्ण होऊन भावजागृती होणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘चित्त चैतन्याशी जोडा’ या भजनातील ओळी ऐकल्यावर मला ‘चित्त चैतन्याशी कसे जोडायचे ?’, असा प्रश्न पडायचा. रथोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहातांना त्यांच्याकडून चैतन्याचा स्रोत आला आणि एका क्षणात तो माझ्या हृदयातून भेदून चित्ताकडे गेला. त्या वेळी मला लख्ख प्रकाशाचा झोत माझ्याकडे आल्याचे आणि ‘तो प्रकाश परमात्म्याचा आहे’, असे मला जाणवले. त्या क्षणी ‘त्या प्रकाशात विरून जावे’, असे मला वाटले. त्यानंतर शरिराच्या कवचातून अंश रूपात असणारा आत्मा बाहेर पडला आणि तो या प्रकाशाच्या झोतात प्रकाशित झाला’, असे मला जाणवले. माझ्या मनात अनेक दिवसांपासून असलेल्या शंकेचे देवाने उत्तर दिल्याने माझी देवाने प्रतीक्षा पूर्ण केली’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली. हे सर्व काही सेकंदातच घडले.’

– सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक