परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय रथोत्सवाच्या संदर्भात कु. राजश्री सखदेव यांना आलेल्या अनुभूती

सनातनच्या रामनाथी आश्रमातील परतलेला रथोत्सव ! रथात विराजमान श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे)

१. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी (२१.५.२०२२ या दिवशी) सायंकाळी वातावरणात जाणवलेले पालट

अ. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी सायंकाळचे वातावरण अतिशय सुंदर होते. ‘त्या वातावरणाकडे पहात राहून त्यातील आनंद घ्यावा’, असे वाटत होते.

आ. काही पक्षी आश्रमाच्या जवळून जात होते. ते पाहून वाटले, ‘पक्षीही आश्रमातील चैतन्य घेण्यास येत आहेत.’

इ. ‘आकाश, डोंगर आणि एकूण निसर्ग जन्मोत्सवाची वाट पहात आहेत’, असे वाटत होते.

ई. हे सर्व पहातांना मला केवळ आनंद जाणवत होता. काही वेळा मला नामजपाचीही आठवण होत नव्हती. काही वेळा कुठूनतरी बासरीचे सुंदर सूर कानावर येत होते.

कु. राजश्री सखदेव

२. रथोत्सव चालू झाल्यावर (२२.५.२०२२ या दिवशी) आलेल्या अनुभूती

२ अ. रथ थोड्या अंतरावर असतांना त्यातून प्रचंड प्रमाणात पांढरा स्वच्छ प्रकाश प्रक्षेपित होणे आणि भाव जागृत होणे : रथोत्सव चालू झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान झालेला रथ थोड्या अंतरावर असतांना त्या रथातून प्रचंड प्रमाणात पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत होता. त्यामुळे ‘रथात कोण बसले आहे’, हे दिसत नव्हते. तो प्रकाश पाहूनच माझी भावजागृती होत होती.

२ आ. घोषणा देण्यासाठी हात वरच्या दिशेने उचलला जाणे; परंतु तोंडातून शब्द बाहेर न पडणे : सांगितल्यानुसार घोषणा देतांना माझा हात वरच्या दिशेने होत होता; परंतु माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. त्या वेळी ‘बोलू नये’, असे वाटत होते. ‘मनाची निर्विचार आणि शांत स्थिती तशीच अनुभवत रहावी’, असे वाटत होते.

२ इ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीतसेवा करणाऱ्या साधिकांनी म्हटलेली काही भजने ध्वनीवर्धकावर लावली होती. त्यांतील शब्द कानावर पडून ते हळूच दूर होत होते.

२ ई. ‘संपूर्ण सृष्टी आणि आजूबाजूचे वातावरण स्तब्ध झाले आहे’, असे वाटत होते. एक सुंदर आणि नीरव शांतता अन् आल्हाददायक वातावरण होते.

३. श्रीविष्णूच्या अवताराने प्रत्येकाला त्याच्या ठिकाणी येऊन दर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

कलियुगाचे माहात्म्य पहा… गुरु स्वतः, प्रत्यक्ष श्रीविष्णूचे अवतार आम्हाला दर्शन देत आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्यास पुष्कळच अल्प पडत असतांना ‘त्यांची कृपा किती महान आहे पहा ! ते स्वतःहून आमच्यापर्यंत येत आहेत.’

– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२४.५.२०२२)


परात्पर गुरु डॉक्टर आरूढ झालेला मंगलमय रथ जवळून पहातांना झालेली भावजागृती

१. परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा केवळ तोंडवळा दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असीम कृपेने ते विराजमान झालेला रथ आम्ही थांबलो त्या ठिकाणी आल्यानंतर मला केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळाच दिसला. ‘त्यांनी कोणते वस्त्रालंकार परिधान केले आहेत, त्यांच्या आजूबाजूला काय आहे’, हे मला दिसले नाही. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भातही तसेच झाले.

२. भावाश्रू येत असल्याने मला बराच वेळ समोरचे काहीच दिसत नव्हते.

३. रथ बाहेर जाऊन आश्रमात आल्यावरही रथ प्रथम पाहिल्याप्रमाणे भावजागृती होणे

रथ आश्रमातून बाहेर जाऊन पुन्हा आश्रमात येतांनाही आम्हाला तो पहायला मिळाला. आता ‘रथात परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत’, हे ठाऊक असूनही पुन्हा पहिल्यासारखीच स्थिती झाली. पुष्कळ प्रमाणात भावाश्रू येऊ लागले.

४. एरव्ही होणारी भावजागृती आणि रथोत्सव पहातांना झालेली भावजागृती यांतील भेद

४ अ. रथोत्सव पहातांना झालेली भावजागृती नेहमी होणाऱ्या भावजागृतीपेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात होती.

४ आ. रथाच्या ठिकाणी प्रकाश दिसून भाव जागृत होणे : प्रथम समोर व्यक्तीस्वरूप काही न दिसता (केवळ प्रकाश दिसत होता) पुष्कळ भाव जागृत झाला.

४ इ. ओक्साबोक्सी रडायला येणे आणि ‘त्याच स्थितीत रहावे’, असे वाटणे : मला ओक्साबोक्सी रडायला येत होते. ते रडणे मला थांबवता येत नव्हते. त्या वेळी ‘त्याच स्थितीत रहावे’, असे मला वाटत होते. नैसर्गिकरित्या होणाऱ्या कृती सहजतेने होत होत्या, उदा. अश्रू गालावर ओघळू लागल्यावर ते रूमालाने पुसले जाणे. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांचे केवळ मुखमंडल दिसल्यावर एखाद-दोन सेकंद भावाश्रू अल्प प्रमाणात आले; परंतु नंतर पुन्हा पहिल्यासारखी भावजागृती होऊ लागली.

४ ई. परात्पर गुरु डॉक्टर आरूढ झालेला रथ आश्रमातून बाहेर जाऊन पुन्हा आश्रमात येईपर्यंतच्या काळात भाव सुप्तावस्थेत असणे आणि त्या काळात काहीही करावेसे न वाटणे : परात्पर गुरु डॉक्टर आरूढ झालेला रथ आश्रमातून बाहेर जाऊन पुन्हा आश्रमात येईपर्यंतच्या काळात भाव प्रकट रूपात नव्हता; परंतु रथोत्सवाचे क्षण आठवले, कोणाशी त्याविषयी बोलणे झाले, तरी पुन्हा भावाश्रू वहात होते. मन एका शांत स्थितीत होते. ‘काही करावे’, असे वाटत नव्हते. ‘शांत बसून निर्विचार स्थिती अनुभवत रहावे’, असे वाटत होते.

४ उ. देवाने एकाच वेळी भावस्थिती आणि ‘दिसेल ते कर्तव्य’ याप्रमाणे सेवा करून घेणे : देवाने एकाच वेळी संपूर्ण वेळ भावस्थिती आणि भावजागृती होणारे प्रसंग डोळ्यांसमोर नसतांना (म्हणजे येथे परात्पर गुरु डॉक्टर डोळ्यांसमोर नसतांना) समोर दिसेल ती सेवा, त्याच भावाच्या स्थितीत करवून घेतली. काही गोष्टी आधी ठरवलेल्या नसतांना समोर दिसत असतांना ‘त्या करायला हव्यात’, असे वाटून केल्या गेल्या. (खोलीचा केर काढण्याचे ठरवलेले नसतांनाही माझ्याकडून केर काढला गेला, वाटेत पडलेला केर सहजतेने उचलला गेला आणि भोजनकक्षात पटलावर असलेली भांडी स्वच्छ करून ठेवली गेली.) एरव्ही या कृती समोर दिसल्यावर केल्या जातात; पण त्या वेळी केल्या जाणाऱ्या कृती आणि आता संपूर्ण भावाच्या स्थितीत असतांना केल्या जाणाऱ्या त्याच कृती यांमध्ये पुष्कळ फरक जाणवत होता. म्हणजे श्वास घेणे ही कृती जितक्या सहजतेने होते, तशा या कृती होत होत्या.

४ ऊ. पूर्ण निर्विचार अवस्था अनुभवणे : या भावस्थितीत असतांना नामजपाची आठवण नव्हती. ‘काहीच करू नये’, असे वाटत होते. मनात कोणतेच विचारही येत नव्हते. म्हणजे ‘थोड्या वेळापूर्वी रथ पाहून भावजागृती झाली’, तेही आठवत नव्हते. कोणी त्याविषयी बोलल्यावर पुन्हा भावजागृती होत होती.

४ ए. ही स्थिती दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत होती.

५. कृतज्ञता

देवाने त्याच्या रथोत्सवाच्या माध्यमातून सर्वच साधकांना भावाच्या उच्चतम अशा स्थितीत नेले, काही वेळ ती स्थिती अनुभवायला दिली, त्याबद्दल त्याच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक