राजपक्षे कुटुंबियांनी भारतात आश्रय घेतलेला नाही ! – भारतीय दूतावासाचे स्पष्टीकरण

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत चालू झालेल्या गृहयुद्धात आतापर्यंत अनुमाने २०० लोक घायाळ झाले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका खासदाराचाही समावेश आहे. दुसरीकडे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे कुटुंब भारतात पळून गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर भारतीय दूतावासाने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून अफवा पसरवली जात आहे की, श्रीलंकेतील काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत; मात्र हे वृत्त चुकीचे आहे.

पंतप्रधान राजपक्षे श्रीलंकेच्या नौदलाच्या तळावर लपले !

माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे त्यांच्या कुटुंबासह नौदलाच्या त्रिंकोमाली तळावर लपून बसले आहेत. ही बातमी पसरल्यानंतर आंदोलक नौदल तळाजवळ जमा झाले. दुसरीकडे आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाला घेरून त्यावर पेट्रोल बाँब फेकले, तसेच गाड्याही जाळल्या. आंदोलक राजपक्षे यांची देशातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी महिंदा यांच्या अटकेची मागणी केली आहे. राजपक्षे कुटुंब आणि त्यांचे निष्ठावंत यांना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी आंदोलकांनी कोलंबोमधील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर एक चौकी उभारली आहे.

आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश नाही ! – श्रीलंकेचे सैन्य

‘श्रीलंकेत सध्या हिंसाचार करणार्‍यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश सैन्याकडून देण्यात आला आहे’, असे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले जात होते. यावर श्रीलंकेच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख शवेंद्र सिल्वा यांनी हे वृत्त फेटाळून लावत ‘सैन्य कोणत्याही परिस्थितीत असे पाऊल उचलणार नाही. हिंसक आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे’, असे सांगितले.