पुण्यातील खराडी जकात नाका येथे मिसळ विक्री केंद्राच्या आणि फर्निचरच्या ८ दुकानांना मोठी आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. खराडी येथे गेल्या ४-५ वर्षांत अनेक वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळेस शहरातून आगीचे बंब येईपर्यंत मोठी हानी होते. खराडी येथील बाह्यवळण मार्गावर अग्नीशमन केंद्राचे काम चालू आहे. ते काम निधीअभावी मध्यंतरी रखडले होते. याचाही सरकारने विचार करावा. दुकानाला लागलेली आग पाहून दुकानदार दुकानातील सामान बाहेर काढण्यासाठी जिवाचे रान करत होते; मात्र बघ्यांनी दुकानदारांना साहाय्य करण्याऐवजी त्या घटनेचे भ्रमणभाषद्वारे ध्वनीचित्रीकरण करण्यात धन्यता मानली, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी ‘अग्नीशमन सेवा’ असते, असे मानण्यात येते. अडचणीच्या किंवा आपत्कालीन प्रसंगात अग्नीशमन सेवा, धैर्य आणि सामुग्री हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण हे लोकांना साहाय्य करण्यासाठी उपयोगी पडते. केंद्रशासनाच्या अग्नीसुरक्षेसंबंधी नियुक्त समितीच्या नियमानुसार ५० सहस्र लोकवस्तीला एक अग्नीशमन केंद्र आणि त्यात २१ कर्मचारी असणे आवश्यक आहे. अग्नीरोधकयंत्रणा व्यवस्थित असल्याचे आवेदन प्रत्येक ६ मासांनी अग्नीशमन दलास द्यावे लागते; मात्र अनेक जण हे आवेदन भरून देत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वरील घटना पहाता ‘अग्नीसुरक्षा यंत्रणा खरोखरच पूर्णपणे सक्षम आहे का ?’ असा प्रश्न निर्माण होतो. आग लागू नये; म्हणून काळजी घेतलेली आहे का ? आग लागल्यास सुरक्षित सुटकेसाठी मार्गात अडथळे नाहीत ना ? अग्नीरोधक यंत्रे सुस्थितीत आहेत का ? आपत्कालीन परिस्थितीत अग्नीशमन यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण रहिवाशांना आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सर्व गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही सुरक्षेचे नियम पाळण्यासह दुर्घटनेसमयी काय करावे ? आणि काय करू नये ? याचे भान ठेवावे. अग्नीशमन यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण घ्यावे. येणाऱ्या भीषण आपत्काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. त्या वेळी स्वतःसह कुटुंबियांच्याही जीविताचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. यासाठी प्रत्येकानेच अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नव्हे, तर अन्य वेळीही उपयुक्त आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे