नागपूर – एका बाजूला भोंगे आहे, तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्यांच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यान् पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरवण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरे यांना मंदिरावर भोंगे लावायचे असतील, तर त्यांनी ते लावावेत; पण धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते येथे बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका पालटली आहे. त्यांच्या झेंड्यामध्ये विविध रंग होते; पण त्यांनी आता एकदम कठोर भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे त्यांना काहीही राजकीय लाभ होणार नाही.
२. बाळासाहेब ठाकरे असतांना त्यांनी अशा प्रकारची मागणी (भोंग्यांच्या विरोधात) केली नव्हती. त्यांनी आतंकवादी मुसलमानांना विरोध केला होता. जे हिंदु समाजातून मुसलमान झाले, त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. भोंगे काढण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्यांना मंदिरांवर भोंगे लावायचे असतील, त्यांना तो अधिकार आहे. राज्यशासनाच्या सूचनेनुसार अनुमती घेऊन भोंगे लावायला काहीच हरकत नाही.
३. धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. भोंगे काढण्याच्या संदर्भात भाजपची भूमिका नाही. मंदिरांवर भोंगे लावण्याची त्यांची भूमिका असेल.
संपादकीय भूमिका
धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?