‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘लिखित भाषेत ‘स्वल्पविराम’ हे विरामचिन्ह कुठे वापरावे ?’, या संदर्भातील काही सूत्रे पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील सूत्रे पाहू.

(लेखांक ८ – भाग ४)

याआधीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  https://sanatanprabhat.org/marathi/568947.html

‘स्वल्पविराम’ आणि तो वापरण्याची पद्धत !

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२. विरामचिन्हांचे प्रकार

२ इ. स्वल्पविराम

(टीप : ‘स्वल्पविरामा’च्या वापराविषयीची ‘२ इ १’ ते ‘२ इ ४’पर्यंतची सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शनिवार, ९.४.२०२२ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.)

२ इ ५. वाक्यात ‘म्हणजे’ हा शब्द येणे : वाक्यातील एखादा शब्द किंवा शब्दसमूह वाचकाला व्यवस्थित समजावा, यासाठी आपण त्या शब्दाच्या किंवा शब्दसमुहाच्या पुढे ‘म्हणजे’ हा शब्द लिहितो आणि त्यापुढे त्या शब्दाचा किंवा शब्दसमुहाचा अर्थ लिहितो. अशा वेळी ‘म्हणजे’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. त्याचबरोबर जेव्हा दोन वाक्ये ‘म्हणजे’ या शब्दाने जोडलेली असतात, तेव्हाही ‘म्हणजे’च्या आधी स्वल्पविराम दिला जातो. याची नियमाची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. ‘दोहोंचे चार हात होणे’, म्हणजे ‘विवाह होणे’ बरं का !

आ. हे श्रीकृष्णाचे, म्हणजे साक्षात् श्रीविष्णूच्या पूर्णावताराचे चरित्र आहे.

इ. तो आत्मविश्वासाने सांगत आहे, म्हणजे त्याने नक्कीच घटनेची पूर्ण चौकशी केली आहे.

ई. संतांनी आशीर्वाद दिला, म्हणजे तुला यशप्राप्ती होणारच !

२ इ ६. वाक्यात ‘उदाहरणार्थ’ हा शब्द येणे : वाक्यामध्ये एखाद्या सूत्राला पुष्टी (बळकटी) मिळावी, तसेच ते अधिक सुस्पष्ट व्हावे, यासाठी काही उदाहरणे दिली जातात. ही उदाहरणे देण्याच्या आधी ‘उदाहरणार्थ’ किंवा ‘उदा.’ हे शब्द लिहिले जातात. या शब्दांपूर्वी नेहमीच स्वल्पविराम द्यावा. सहसा लिखित भाषेत ‘उदाहरणार्थ’ असा पूर्ण शब्द अल्प प्रमाणात वापरला जातो. त्याऐवजी ‘उदा.’ हे त्या शब्दाचे लघुरूप लिहिणे अधिक प्रचलित आहे. या नियमाची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. भारतात अतिशय पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष हिंदु राजे होऊन गेले, उदा. सम्राट विक्रमादित्य, सम्राट भोज, सम्राट कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी.

आ. सुजय कुठलेही काम, उदा. घराची स्वच्छता, आजोबांचे औषधपाणी, बाजारहाट इत्यादी अगदी मनापासून करतो.

२ इ ७. दोन वाक्ये ‘यासाठी’ या शब्दाने जोडली जाणे : ‘चांगली साधिका होता यावे, यासाठी प्रज्ञा सतत धडपडत असते’, या एका वाक्यामध्ये खरेतर ‘चांगली साधिका होता यावे’, हे आणि ‘प्रज्ञा सतत धडपडत असते’, हे अशी दोन वाक्ये अंतर्भूत आहेत. यांतील ‘चांगली साधिका होता यावे’, या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसला, तरी त्याच्या पुढील ‘यासाठी’ या शब्दाने जोडलेले ‘प्रज्ञा सतत धडपडत असते’, हे वाक्य वाचले की, पहिल्या वाक्याचा अर्थ लक्षात येतो. अशा प्रकारे जेव्हा दोन वाक्ये ‘यासाठी’ या शब्दाने जोडली जातात, तेव्हा ‘यासाठी’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मंदिरात सेवा करता यावी, यासाठी सौरभ धावतपळत शाळेतून येतो.

आ. आईला त्रास होऊ नये, यासाठी कौस्तुभ स्वतःचे कपडे स्वतः धुवायला शिकला.

इ. आईस्क्रीम खायला मिळावे, यासाठी तो प्रतिदिन रात्री बाबांबरोबर चालायला जातो.

२ इ ८. दोन वाक्ये ‘की’ या शब्दाने जोडणे : कोणतीही दोन वाक्ये जेव्हा ‘की’ या शब्दाने परस्परांशी जोडली जातात, तेव्हा ‘की’ या शब्दानंतर स्वल्पविराम येतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. बाबा म्हणाले होते की, या माणसावर विश्वास ठेवू नकोस.

आ. दादा आले की, आपण नवीन कपडे आणावयास जाऊ.

इ. ताईचे जेवण झाले की, ती मला चित्र काढायला शिकवणार आहे.’ (क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड. (टीप), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२२)

टीप : ‘एड.’ हा शब्द इंग्रजी भाषेतील ‘एज्युकेशन (Education)’ या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. त्या भाषेत हा शब्द ‘Ed.’ असा लिहिला जातो. ‘एड.’ हे संक्षिप्त रूप इंग्रजीतील ‘एम्’, ‘एफ’, ‘एल्’ इत्यादी मुळाक्षरांसारखे उच्चारले जात असले, तरी ते मुळाक्षर नाही. त्यामुळे त्यातील ‘ड’ हलंत (पाय मोडलेला) लिहिण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे इंग्रजीतील ‘कॉमर्स (Commerce)’ या शब्दाचे संक्षिप्त रूप ‘कॉम.’ असे ‘म’ पूर्ण याप्रमाणे लिहिले जाते, तसेच ‘ऑर्गनायझेशन (Organisation)’ या शब्दाचे संक्षिप्त रूप ‘ऑर्ग.’ असे ‘र्ग’ पूर्ण याप्रमाणे लिहिले जाते, तसेच हे आहे.