सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेतली. या लेखात ‘स्वल्पविराम’ या विरामचिन्हाविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ८ – भाग ३)

‘स्वल्पविराम’ आणि तो वापरण्याची पद्धत !

२ इ. स्वल्पविराम : ‘हा ‘,’ या चिन्हाने दर्शवतात. लिखित भाषेमध्ये ‘स्वल्पविराम’ पुढील ठिकाणी वापरण्यात येतो.

२ इ १. एकाच जातीचे बरेच शब्द लागोपाठ येणे : कित्येकदा वाक्यात एकाच जातीचे (परस्परांशी काही ना काही संबंध असलेले) बरेच शब्द लागोपाठ येतात. अशा दोन शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम दिला जातो, उदा. ‘गणित, इतिहास, भूगोल आणि संस्कृत हे पूनमचे आवडते विषय आहेत.’ या वाक्यातील ‘गणित, इतिहास, भूगोल आणि संस्कृत’ हे शब्द एकाच जातीचे आहेत, म्हणजे हे सर्व ‘अभ्यासाचे विषय’ आहेत. अशा प्रकारचे शब्द जेव्हा एकमेकांच्या पुढे सलग लिहिले जातात, तेव्हा त्यांच्यामध्ये स्वल्पविराम दिला जातो. स्वल्पविराम देतांना नेहमीच तो दोन शब्दांपैकी पहिल्या शब्दाला जोडून लिहिला जातो. या वाक्यात ‘संस्कृत’ या शब्दाच्या आधी स्वल्पविराम दिलेला नाही; कारण येथे स्वल्पविरामाचे कार्य ‘आणि’ या शब्दाने केले आहे. आता या संपूर्ण नियमाची आणखी काही उदाहरणे पाहू.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

अ. खिरीमध्ये काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे इत्यादी सुकामेवा घातला होता.
आ. कांचनला कथा, कविता आणि विनोद वाचायला फार आवडतात.
इ. आज आमच्याकडे ताई, भावोजी, प्रभा, चिंटू आणि काकू येणार आहेत.
ई. किरण लहानपणापासून आरत्या, भजने आणि स्तोत्रे आवडीने म्हणतो.
उ. कलेकडे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा इत्यादी मिळवण्याचे साधन म्हणून पहाणे योग्य नव्हे.

२ इ २. एखाद्यास हाक मारणे : जेव्हा एखाद्याला हाक मारली असल्याचे आपल्याला शब्दांत लिहावयाचे असते, तेव्हा ज्याला हाक मारली आहे, त्याच्या नावानंतर/उल्लेखानंतर स्वल्पविराम दिला जातो, उदा. ‘सुबोध, आधी घरी ये.’ या वाक्यात ‘सुबोध’ला कुणीतरी हाक मारून घरी येण्यास सांगितले आहे. येथे त्याच्या नावानंतर स्वल्पविराम द्यावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. जय, जरा पाणी आणून दे पाहू.
आ. आजोबा, आज रात्री मला नक्की गोष्ट सांगा हं.
इ. रूपाली, जेवलीस का ?
ई. केतन, आजच सगळा अभ्यास पूर्ण कर.
उ. आजी, मला उद्या सकाळी लवकर उठव.

२ इ ३. कोणतेही वाक्य ‘जेव्हा-तेव्हा’, ‘जर-तर’, ‘जो-तो’ इत्यादी शब्दरचना वापरून बनलेले असणे : वाक्याची रचना ‘जेव्हा-तेव्हा’, ‘जर-तर’, ‘जो-तो’ इत्यादी शब्दरचना वापरून करण्यात आली असल्यास त्यांतील ‘तेव्हा’, ‘तर’, ‘तो’ इत्यादी शब्दांच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

‘जेव्हा पाऊस पडला, तेव्हा शेतकऱ्यांना हायसे वाटले’, या वाक्याची रचना ‘जेव्हा-तेव्हा’ हे शब्द वापरून करण्यात आली आहे. या वाक्यरचनेत ‘तेव्हा’ या शब्दाच्या आधीच्या ‘पडला’ या शब्दाला जोडून स्वल्पविराम देण्यात आला आहे. अशा प्रकारची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. जो निष्ठेने साधना करत रहातो, तो अध्यात्मात प्रगती करतो.
आ. जसा तो पुढे शिकत गेला, तशा त्याच्या स्वतःकडून अपेक्षा वाढत गेल्या.
इ. जितके पद मोठे असते, तितके दायित्वही मोठे असते.
ई. जिथे रामसंकीर्तन चालू असते, तिथे हनुमंत येतोच.
उ. जर गुरूंची कृपा झाली, तर जगात काहीही अशक्य नाही.

२ इ ४. वाक्यात ‘तर’ आणि ‘तरी’ हे शब्द असणे : वाक्यात ‘तर’ आणि ‘तरी’ यांपैकी कोणताही शब्द आल्यास नेहमीच त्याच्या आधी स्वल्पविराम द्यावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मी गावी गेलो नाही, तर तुमच्याकडे नक्की येईन.
आ. आणखी थोडा वेळ थांबलो, तर आजच हे काम पूर्ण होईल.
इ. मी समजावले, तरी त्याने त्याच्या मनानेच सर्व केले.
ई. शिष्य चुका करतो, तरी गुरु त्याच्याकडे सदाची पाठ फिरवत नाहीत.
उ. बाळू वरवर दाखवत नव्हता, तरी मनातून चांगलाच घाबरला होता.’

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०२२)

पुढील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/570849.html