सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘अनुरूप’ आणि ‘अनुसार’ हे शब्द जोडले जाऊन होणार्या वैशिष्ट्यपूर्ण संधीविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘विरामचिन्हे’ म्हणजे काय ?’ आणि ‘पूर्णविराम’ यांची माहिती पाहू.
(लेखांक ८ – भाग १)
या लेखाचा मागील लेखांक वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/560753.html
१. ‘विरामचिन्हे’ म्हणजे काय ?
मनुष्य बोलतांना निरनिराळ्या पद्धतींनी बोलतो, उदा. तो कधी प्रश्न विचारतो, कधी माहिती देतो, कधी आश्चर्य व्यक्त करतो, तर कधी एखादे साधे विधान करतो. या गोष्टी जेव्हा आपण ऐकत असतो, तेव्हा बोलणार्याच्या आवाजातील चढ-उतार, त्याने मध्येच घेतलेला छोटासा विराम (थांबणे), त्याचा एखादा हुंकार इत्यादींद्वारे ‘त्याला काय म्हणायचे आहे ?’, हे आपल्याला लगेच समजते; परंतु त्याच्या बोलण्यातील केवळ शब्द घेऊन एकापुढे एक लिहीत गेल्यास ते वाचून त्याचे नेमके म्हणणे समजून घेणे कुणालाही अवघड जाईल. त्याही पुढे एकाऐवजी दोन माणसांच्या बोलण्याविषयी या प्रकारे केवळ शब्दापुढे शब्द लिहिलेले असल्यास तो परिच्छेद कळणे आणखी अवघड होईल. याचे उदाहरण म्हणून पुढे केवळ शब्दापुढे शब्द असलेला एक उतारा दिला आहे.
कसा होता चित्रपट बाबांनी संकेतला विचारले फारच सुंदर संकेत उत्तेजित होऊन म्हणाला देशासाठी भगतसिंग यांनी एवढ्या लहान वयात केवढा त्याग केला संकेत भारावून सांगत होता भगतसिंगांचा इतिहास राजकारण आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास फार दांडगा होता बरं बाबा म्हणाले त्यांना अनुमोदन देत संकेत बोलला होय बाबा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फार परिश्रम घेतले त्या सर्वांनी फार वेदनाही सोसल्या
वरील उतार्यामध्ये बाबा आणि संकेत यांच्यातील संवाद दिला आहे; परंतु तो वाचतांना ‘कोण काय बोलत आहे ? कुणाचे बोलणे कुठून चालू होऊन कुठे संपत आहे ?’, हे झटकन समजत नाही. कोणतेही लिखाण वाचत असतांना ‘त्यातील शब्दांचा, तसेच वाक्यांचा परस्परसंबंध; संवाद असल्यास त्यांतील प्रश्न, विराम, उद्गार इत्यादी वाचकाला लगेच कळावेत’, यासाठी भाषेमध्ये काही खुणा ठरवून दिल्या आहेत. या खुणांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. आता वरील उतारा विरामचिन्हे घालून पुढे दिला आहे.
‘‘कसा होता चित्रपट ?’’ बाबांनी संकेतला विचारले. ‘‘फारच सुंदर !’’ संकेत उत्तेजित होऊन म्हणाला. ‘‘देशासाठी भगतसिंग यांनी एवढ्या लहान वयात केवढा त्याग केला !’’ संकेत भारावून सांगत होता. ‘‘भगतसिंगांचा इतिहास, राजकारण आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास फार दांडगा होता बरं’’, बाबा म्हणाले. त्यांना अनुमोदन देत संकेत बोलला, ‘‘होय बाबा. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फार परिश्रम घेतले त्या सर्वांनी. फार वेदनाही सोसल्या.’’
आता हा उतारा आपल्याला सहजपणे कळतो. हे विरामचिन्हांचे महत्त्व आहे.
२. विरामचिन्हांचे प्रकार
२ अ. पूर्णविराम : हा ‘.’ या चिन्हाने दर्शवतात. भाषेत पूर्णविराम पुढील ठिकाणी वापरण्यात येतो.
२ अ १. ‘वाक्य पूर्ण झाले आहे’, हे दाखवणे : एखादे वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या शब्दाच्या पुढे पूर्णविराम दिला जातो, उदा. ‘तात्यांनी पूजा केली.’ या वाक्यात ‘केली’ या शब्दानंतर पूर्णविराम देण्यात आला आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. मनीषा उत्तीर्ण झाली.
आ. तो वापीला गेला आहे.
इ. काकू संतांची सेवा फार चांगली करतात.
ई. तिने पाणी भरून ठेवले.
उ. मी प्रयत्न करून पाहिला.
२ अ २. शब्दांचे संक्षिप्त रूप लिहिणे : लिखित भाषेत काही वेळा काही शब्द पूर्ण न लिहिता संक्षिप्त स्वरूपात लिहिले जातात. एखाद्या सूत्राच्या स्पष्टीकरणासाठी उदाहरण द्यावयाचे असल्यास ‘उदाहरणार्थ’ असा पूर्ण शब्द न लिहिता केवळ ‘उदा.’ असे लिहिले जाते. या प्रकारे शब्दांचे संक्षेप करतांना संक्षिप्त रूपानंतर पूर्णविराम दिला जातो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
२ अ ३. सूत्रांना क्रमांक देणे : लिखाणात एखाद्या विषयाशी संबंधित विविध सूत्रे मांडण्यात येतात. या सूत्रांना ‘१, २, ३’ किंवा ‘अ, आ, इ’ असे क्रमांक देण्यात येतात. या क्रमांकांच्या पुढे पूर्णविराम देण्याची पद्धत आहे. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. ——
२. ——
३. ——
अ. ——
आ. ——
२ अ ४. दिनांक लिहिणे : दिनांक लिहितांना दिवस, मास आणि वर्ष यांचे आकडे परस्परांमध्ये मिसळू नयेत अन् त्यांचे वेगवेगळे तीन गट वाचकांच्या लक्षात यावेत, यासाठी प्रत्येक गटातील आकडा लिहून पूर्ण झाला की, पूर्णविराम देतात, उदा. १०.३.२०२२
(क्रमशः पुढील रविवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०२२)