विसर्ग आणि विसर्गसंधीचे प्रकार !

  • सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

  • शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागील तीन लेखांत आपण ‘विसर्गसंधी’चे एकूण सात प्रकार पाहिले. आजच्या लेखात त्यापुढील प्रकार जाणून घेऊ.

(लेखांक ७ – भाग ९)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : : https://sanatanprabhat.org/marathi/556747.html


४ इ २. ‘विसर्गसंधी’चे प्रकार

(टीप : ‘विसर्गसंधी’च्या ‘४ इ २ अ’ ते ‘४ इ २ ए’ या सात प्रकारांची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, १३, २० आणि २७.२.२०२२ च्या अंकांत क्रमशः प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

४ इ २ ऐ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग (:) असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘च्’ किंवा ‘छ्’ असणे : ‘मनः + चक्षू = मनश्चक्षू’ या संधीमध्ये पहिल्या ‘मनः’ या शब्दाच्या शेवटी विसर्ग (:) आहे आणि दुसर्‍या ‘चक्षू’ या शब्दातील पहिला वर्ण ‘च्’ हा आहे. अशा दोन शब्दांचा जेव्हा संधी होतो, तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग लोप पावतो आणि त्याच्या जागी ‘श्’ हा वर्ण येतो. अशा प्रकारे ‘मनश्चक्षू’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ इ २ ओ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘त्’ किंवा ‘थ्’ असणे : ‘मनः + ताप = मनस्ताप’ या संधीमध्ये पहिल्या ‘मनः’ या शब्दाच्या शेवटी विसर्ग आहे आणि दुसर्‍या ‘ताप’ या शब्दाचा पहिला वर्ण ‘त्’ हा आहे. अशा शब्दांचा संधी होतांना पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग लोप पावतो आणि त्याच्या जागी ‘स्’ येतो. अशा प्रकारे ‘मनस्ताप’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ इ २ औ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असणे आणि दुसर्‍या शब्दाचा पहिला वर्ण ‘श्’ किंवा ‘स्’ असणे : ‘उः + शाप = उःशाप’ या संधीमध्ये ‘उः’ या पहिल्या पदाच्या अखेरीस विसर्ग आहे आणि ‘शाप’ या दुसर्‍या पदाचा पहिला वर्ण ‘श्’ हा आहे. अशा पदांचा संधी होतांना पहिल्या पदातील विसर्ग कायम रहातो आणि पुढील पद विसर्गाला जसेच्या तसे जोडले जाते. अशा प्रकारे ‘उःशाप’ हा शब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ इ २ औ १. ‘पुरस्सर’ हा शब्द वरील ‘४ इ २ औ’ या नियमाला अपवाद असणे : ‘पुरः + सर = पुरस्सर (पूर्वक, उदा. हेतूपूर्वक)’ या संधीमध्ये पहिल्या ‘पुरः’ या शब्दाच्या शेवटी विसर्ग आहे आणि दुसर्‍या ‘सर’ या शब्दातील पहिला वर्ण ‘स्’ आहे. असे असले, तरी हा शब्द ‘पुरःसर’ असा न लिहिता प्रचलित मराठीनुसार ‘पुरस्सर’ असा लिहावा.

४ इ २ औ २. प्रचलित मराठी व्याकरणामध्ये वरील ‘४ इ २ औ’ या नियमात लेखकाला विसर्ग कायम ठेवण्यासह तो काढण्याचेही स्वातंत्र्य असणे; मात्र आपण विसर्ग कायम ठेवण्याचा एकच पर्याय स्वीकारला असणे : सध्या प्रचलित असलेल्या मराठी व्याकरणामध्ये वरील ‘४ इ २ औ’ या नियमानुसार संधी करतांना लेखकाला त्याच्या इच्छेनुरूप विसर्ग कायम ठेवण्याचे किंवा काढण्याचेही स्वातंत्र्य आहे. त्यामुळे लेखक विसर्ग कायम ठेवून ‘उःशाप’ असे लिहू शकतो किंवा विसर्ग काढून ‘उश्शाप’ असेही लिहू शकतो. यांतील दुसर्‍या प्रकारे विसर्ग काढून लिहितांना अट एवढीच आहे की, ‘जोडशब्दातील दुसर्‍या शब्दामधील पहिले अक्षर त्याच अक्षराला जोडून त्याचे जोडाक्षर करावे.’ यानुसार वरील ‘४ इ २ औ’मधील सारणीतील शब्द ‘मनश्शक्ती’, ‘निश्शुल्क’, ‘निस्संकोच’, ‘दुस्साहस’ आणि ‘चतुस्सीमा’ असेही लिहिता येतात; मात्र असे दोन्ही प्रकारे लिहिण्याचे स्वातंत्र्य ठेवल्यास प्रत्येक जण स्वतःला हवे त्याप्रमाणे लिखाण करील. काही प्रसंगी एकाच पृष्ठावर एकाच प्रकारचे शब्द वेगवेगळ्या पद्धतींनी लिहिले जातील. त्यामुळे सर्वसामान्य अभ्यासकाच्या दृष्टीने त्यांत एकसूत्रीपणा रहाणार नाही आणि त्याचा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण होईल. हे टाळण्यासाठी आपण विसर्ग कायम ठेवून लिहिण्याचा एकच पर्याय स्वीकारला आहे.’

(क्रमशः पुढील रविवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२२)