|
‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागील लेखात आपण ‘विसर्गसंधी’चे तीन प्रकार पाहिले. आजच्या लेखात त्यापुढील प्रकार जाणून घेऊ.
(लेखांक ७ – भाग ८)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/554693.html
४. संधीचे प्रकार
४ इ २. ‘विसर्गसंधी’चे प्रकार
(टीप : ‘विसर्गसंधी’च्या ‘४ इ २ अ’ आणि ‘४ इ २ आ’ या दोन प्रकारांची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, १३.२.२०२२ या दिवशीच्या अंकात, तर ‘४ इ २ इ’ ते ‘४ इ २ उ’ या प्रकारांची माहिती रविवार, २०.२.२०२२ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
४ इ २ ऊ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गाच्या (ः च्या) आधी ‘अ’ स्वरयुक्त अक्षर असणे आणि दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण ‘क्’, ‘ख्’, ‘प्’ किंवा ‘फ्’ यांपैकी एखादा असणे : ‘तेजः + पुंज = तेजःपुंज’ या संधीमध्ये पहिल्या ‘तेजः’ या शब्दामधील विसर्गाच्या (ः च्या) आधी ‘ज’ हे ‘अ’स्वरयुक्त अक्षर आहे आणि दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण ‘प्’ आहे. अशा दोन शब्दांचा संधी होतांना विसर्ग (ः) तसाच रहातो आणि ‘तेजःपुंज’ असा जोडशब्द सिद्ध होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ इ २ ए. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गाच्या आधी ‘इ’युक्त किंवा ‘उ’युक्त अक्षर असणे आणि दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण ‘क्’, ‘ख्’, ‘प्’ किंवा ‘फ्’ यांपैकी एखादा असणे : ‘चतुः + कोन = चतुष्कोन (चौकोन)’ या संधीमध्ये पहिल्या शब्दातील विसर्गाच्या आधी ‘तु’ हे ‘उ’युक्त अक्षर आले आहे आणि दुसर्या शब्दातील पहिला वर्ण ‘क्’ आहे. अशा शब्दांचे संधी होतांना पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग लोप पावतो आणि त्याच्या जागी ‘ष्’ येतो. अशा प्रकारे ‘चतुष्कोन’ हा शब्द सिद्ध झाला आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
४ इ २ ए १. ‘दुःख’ आणि ‘निःपक्ष’ हे दोन शब्द वरील ‘४ इ २ ए’ या नियमाला अपवाद असणे : ‘दुः + ख = दुःख’ यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी असलेल्या विसर्गाच्या आधी ‘दु’ हे ‘उ’युक्त अक्षर आले आहे आणि दुसर्या पदातील पहिला वर्ण ‘ख्’ हा आहे. असे असले, तरी या पदांचा संधी होतांना तो ‘दुःख’ असा होतो; ‘दुष्ख’ असा होत नाही. अशा प्रकारे हा शब्द वरील ‘४ इ २ ए’ या नियमाला अपवाद आहे. असाच आणखी एक अपवादात्मक शब्द म्हणजे ‘निः + पक्ष = निःपक्ष.’
(क्रमशः पुढील रविवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२२)