पुढील शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके येणार !
पुणे – बालभारतीचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून पालटत्या काळासह नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘बालभारती’ही पालटत आहे. नवी पिढी ही अधिक गतीमान आणि तंत्रस्नेही आहे. मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील आहे. पुस्तकांचा आशय आणि रचना यांमध्ये मोठ्या प्रमाणात पालट केले जात आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून येणारी एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके हा त्याचाच एक भाग आहे. राज्यातील शिक्षण तज्ञांच्या साहाय्याने येणार्या काळात अभ्यासक्रम आणि पुस्तकाची क्षेत्रे यांमध्ये विविध प्रयोग केले जातील, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री आणि ‘बालभारती’च्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. त्या ‘बालभारती’च्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी ‘बालभारती’तील विविध पदाधिकारी उपस्थित होते.