यवतमाळ येथे आरोग्य साहाय्य समितीचे अन्न आणि औषध प्रशासनाला निवेदन !
यवतमाळ, ३१ डिसेंबर (वार्ता.) – वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर खाद्यपदार्थाच्या पॅकिंगसाठी केल्यास पेपरवर असलेली शाई नागरिकांच्या पोटात जाऊन आरोग्यासाठी हानीकारक होऊ शकते, त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर खाद्यपदार्थ बांधण्यासाठी न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करण्यात यावेत, नागरिकांच्या आरोग्याचा विचार प्राधान्याने करण्यात यावा. या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अन्न आणि औषध प्रशासनाचे जिल्हा साहाय्यक आयुक्त श्री. कृष्णा जयपूरकर यांना २८ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी आरोग्य साहाय्य समितीचे श्री. दत्तात्रेय फोकमारे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे श्री. विनोद अरेवार, राष्ट्र-धर्मप्रेमी श्री. मंगेश साखरकर आणि श्री. अक्षय शहाडे उपस्थित होते.
वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणार्या शाईत ‘डाय आयसोब्युटाइल फटालेट’ आणि ‘डायइन आयसोब्युटाइल’ ही रसायने असतात. गरम पदार्थाच्या संपर्कात ही रसायने विरघळतात आणि ते आरोग्यास अत्यंत घातक आहे. ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, तसेच पोटाचे अनेक विकार जडू शकतात. या संदर्भात भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.आय.) भारत सरकार यांनी ६ डिसेंबर २०१६ या दिवशी आदेश निर्गमित केले असून सर्व अन्न व्यावसायिक, मोठी उपाहारगृहे, बेकरी व्यावसायिक, स्नॅक सेंटर, स्वीट मार्ट, भजी किंवा वडापाव विक्रेते यांनी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात तसे होतांना दिसत नाही. या संदर्भात पुणे येथील साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडून अशा प्रकारे अयोग्य कृती करणार्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आलेत. यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा अशा प्रकारचे आदेश काढण्यात यावे आणि त्याविषयी योग्य ती प्रसिद्धी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाची तात्काळ नोंद घेत साहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी वरील प्रकारे अयोग्य कृती करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.