इस्लामी आक्रमक येण्याआधी काश्मीरची भूमी जगाची ‘सिलिकॉन व्हॅली’ होती ! – चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री

(अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’ हे स्थळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे सध्याचे जागतिक केंद्र म्हणून ओळखले जाते.)

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणार्‍या आगामी चित्रपट ‘दी कश्मीर फाईल्स’साठी अमेरिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

(उजवीकडे) चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री

नवी देहली – काश्मीरमध्ये सरस्वतीदेवीची आराधना केली जायची. इस्लामी आक्रमक काश्मीरमध्ये येण्याआधी ही भूमी जगाची ‘सिलिकॉन व्हॅली’ होती. येथे ज्ञानगंगा वहात होती. त्यामुळेच भारतावर आक्रमण करण्यात आले. धार्मिक कट्टरतावादी लोकांनी  भारताला शेकडो वर्षे लुटले. काश्मीरच्या रूपाने जगाच्या सर्वांत प्राचीन आणि महानतम् विद्वानांच्या भूमीला नेस्तनाबूत करण्यात आले, असे वक्तव्य प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘काश्मीर आणि वैचारिक आतंकवाद’ या विषयावर मार्गदर्शन करतांना केले. ते अमेरिकेतील डेन्वर विद्यापिठात १६ डिसेंबर या दिवशी त्यांच्या आगामी ‘दी कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या प्रचारार्थ बोलत होते.
काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांवर प्रकाश टाकणारा ‘दी कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २६ जानेवारी २०२२ या दिवशी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रचारार्थ विवेक अग्निहोत्री गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. ४ डिसेंबर या दिवशी त्यांचे कॅपिटॉल हिल येथेही भाषण झाले.

(सौजन्य: I Am Buddha)

डेन्वर विद्यापिठात आयोजित कार्यक्रमात अग्निहोत्री म्हणाले,

१. अफगाणिस्तान हे राष्ट्र ही एकेकाळी सांस्कृतिक भूमींपैकी एक होती. हिंदु धर्माच्या माहात्म्यामुळे अफगाणिस्तानला श्रेष्ठतम् इतिहास लाभला आहे. आज जिहादी आतंकवादामुळे अफगाणिस्तानची स्थिती काय झाली, हे आपण पहात आहोत.

२. योगाचा उगम काश्मिरी भूमीत झाला. योग हे आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न करते, तर आधुनिक वैद्यकीय शास्त्रे रोग झाल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कार्य करतात. उपनिषदांचा उगम काश्मीरमध्ये झाला. जर्मन आणि अन्य पाश्‍चात्त्य विचारवंत यांनी प्राधान्याने उपनिषदांचा अभ्यास केला.

३. संपूर्ण जग हे ‘डावी विरुद्ध उजवी’ विचारसरणी, ‘पूर्व विरुद्ध पाश्‍चिमात्य’ अशा प्रकारे विभागले गेले आहे. या वैचारिक भेदामुळे जिहादी आतंकवादी त्याचा अपलाभ उठवत आले आहेत. भगवान शिवाने सहस्रावधी वर्षांपूर्वी सांगितले होते की, त्याचा तिसरा डोळा सर्व विचारसरणींना एकत्र करण्याचे प्रतीक आहे. अशा संपूर्ण जगाला एकत्र आणण्याच्या शिकवणीच्या भूमीतून मी आलो आहे. करुणा, व्यापकता आदी दैवी गुण भारतातून जगाला मिळाले आहेत. हिंदु धर्म सर्वांचा आदर करण्याची शिकवण देतो. आमचा धर्म अनेकातून एकात यायला शिकवतो.

४. जीवनाचे रहस्य, कुटुंबव्यवस्था, श्रद्धेचे महत्त्व, ‘मी कुठून आलो ?’, ‘माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे ?’, याची उत्तरे मिळण्यासाठी विदेशींना माझ्या भारतभूमीत यावे लागेल. तुम्हाला पैसा कमवायचा असेल, तर अमेरिकेत जावे लागेल.

५. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याची शिकवण भारतानेच जगाला दिली आहे. आम्ही अत्यंत संयमी राहिलो आहोत. आमच्या संयमामुळेच जगात सर्वांत प्राचीन असलेली आमची संस्कृती आजही टिकून आहे. आम्ही पुढील ५ सहस्र वर्षे आतंकवादाच्या विरोधात लढत राहू. ‘जग हे एक आहे’, अशी आमची भावना आहे. त्यामुळेच आम्हाला शक्ती मिळते.

६. फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’वरील आक्रमण, मुंबईतील २६/११ चे आक्रमण हे धार्मिक कट्टरतावादाची फळे आहेत. पूर्वी १०० टक्के हिंदु असलेले काश्मीर आज हिंदुविहीन झाले आहे. १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्या काळी रशिया आणि काही प्रमाणात अमेरिका यांच्याकडून मिळालेल्या आर्थिक साहाय्यामुळे शस्त्रास्त्रांचा उपयोग करून आतंकवाद्यांनी हिंदूंवर आक्रमण केले. ५ लाख हिंदूंना परागंदा व्हावे लागले. एवढे होऊनही काश्मिरी हिंदूंनी कधीच त्याचा प्रतिशोध घेतला नाही, ना कधी भावना भडकावणारे एखादे भाषण केले !

मानवतेने न पाहिलेल्या आतंकवादावर प्रकाश टाकण्यासाठीच ‘दी कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट !

‘काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट काढत असल्याने माझ्या विरोधात फतवे काढण्यात आले. आतंकवादाचा सामना करण्यासाठी तो कळणे आवश्यक आहे. ‘मानवतेने जे पाहिलेले नाही, ते कळण्यासाठीच ‘दी कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आहे. आज लाखो काश्मिरी हिंदूंना ३२ वर्षे निर्वासितांचे जीवन जगावे लागत आहे. जर्मनीत हिटलरसमवेत ‘हॉलोकास्ट’ (ज्यूंचा नरसंहार) संपले, परंतु काश्मीरने भोगलेला आतंकवाद हा आज ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतरही चालूच आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ दु:ख, अत्याचार आदींवर प्रकाश टाकतो असे नाही, तर तो जागृती निर्माण करण्याचे कार्य करतो.