२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी तिहार कारागृहात अटकेत असणार्‍या सुकेश चंद्रशेखर याची विशेष बडदास्त

१० चित्रपट अभिनेत्री आणि मैत्रिणी घ्यायची भेट कारागृहात कार्यालय

कारागृहात मेजवान्यांचेही आयोजन अधिकार्‍यांना प्रतिमहा १ कोटी लाच देत असल्याचा आरोप

देशातील बर्‍याच कारागृहांची हीच स्थिती आहे, हे आतापर्यंत उघड झालेल्या अनेक घटनांमधून जनतेला वाटते ! ‘तिहार’ या देशातील प्रमुख कारागृहातील ही स्थिती देशासाठी धोकादायकच म्हणावी लागेल ! केवळ येथीलच नव्हे, तर देशातील सर्व कारागृहांविषयी सरकारने कठोर होऊन उपाययोजना काढल्या पाहिजेत आणि संबंधित भ्रष्ट अधिकार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे !

तिहार कारागृहात अटकेत असणार्‍या सुकेश चंद्रशेखर याची पोलिसांकडून विशेष बडदास्त

नवी देहली – येथील तिहार कारागृहात २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याला कारागृहात भेटण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्यासह एकूण १० चित्रपट अभिनेत्री, तसेच त्याच्या मैत्रिणी येऊन गेल्या. तसेच कारागृहात सुकेश याला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येत होत्या. येथे त्याचे आलीशान कार्यालयही स्थापन करण्यात आले आहे. येथे मेजवानीही आयोजित करण्यात येत होती. या सर्व गोष्टींसाठी सुकेश कारागृहातील अधिकार्‍यांना प्रत्येक मासाला १ कोटी रुपयांची लाच देत होता, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) सूत्रांकडून देण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारित झाले आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याकडे आधीच चौकशी झाली आहे.

१. मिळालेल्या माहितीनुसार एका अभिनेत्रीने तिच्या जबाबात सांगितले की, कारागृहात थाटलेल्या सुकेश याच्या कार्यालयामध्ये सोफा, शीतकपाट, दूरचित्रवाणी संच आदी सुविधा होत्या. तसेच या अभिनेत्रीला कारावासात कधीही जाण्याची अनुमती होती. त्यासाठी नोंदणीही करावी लागत नव्हती.

२. वर्ष २०१७ मध्ये निवडणूक आयोगाच्या लाचखोरीच्या प्रकरणामध्ये सुकेश चंद्रशेखर याला एका उपाहारगृहातून अटक करण्यात आली होती. त्याने अण्णाद्रमुक (अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) या पक्षातील गटाला निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी ५० कोटी रुपयांचा सौदा केला होता. तसेच त्याने निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना लाच देण्यासाठी पैसे घेतले होते.