अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

१. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.

२. मध्यम त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपासह ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन ७ प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर ३ माळा जप चालू ठेवावा.

३. तीव्र त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपाच्या जोडीला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ घंटे करावा. एखाद्या ज्योतीर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती यांसारखे विधी करावेत. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

४. पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ६ घंटे (७२ माळा) नामजप करावा.

दत्ताच्या नामजपाच्या व्यतिरिक्त अन्य वेळी प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी; म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.

दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे तेथील अतृप्त पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण घटते.

दत्ताच्या नामजपाचे लाभ

१. ‘दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.

२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.’

– श्री. मिरजे (२.११.२००५)