मंदिर संस्कृती रक्षण आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वस्तांच्या संघटित प्रयत्नांची आवश्यकता ! – रमेश कडू, मंदिर सह संयोजक

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने खेड तालुक्यात मंदिर संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


खेड, २ फेब्रुवारी (वार्ता.) – अनेक देवस्थानांच्या जमिनी आणि देवरहाटी यांवर ‘सरकार’ अशी नोंद आहे. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार राज्यात चालू आहेत. अशा अडचणी केवळ अन्यत्र आहेत, असे समजू नका. त्या आपल्यापर्यंत कधीही पोचू शकतात. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना फसवले जाते, हिंदूंचे धर्मांतरण केले जातेय. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा समस्यांना हिंदूंना सामोरे जावे लागत आहे. यासाठीच हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी मंदिरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी आज आपण कार्य केले नाही, तर उद्या अनेक आव्हाने उभे रहातील. अशा समस्यांसंदर्भात मंदिर महासंघ गेली २ वर्षे अधिवक्त्यांच्या सहाय्यासह संतांच्या मार्गदर्शनाने कार्य करत आहे. या दृष्टीने मंदिर संस्कृती रक्षणासाठी आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जालगाव (तालुका दापोली) येथील श्री महालक्ष्मी देवस्थानाचे अध्यक्ष आणि मंदिर महासंघाचे दापोली सह संयोजक श्री. रमेश कडू यांनी केले. मंदिर महासंघाच्या वतीने मंदिरे विश्वस्त संपर्क अभियान अंतर्गत तालुक्यातील चिंचघर येथील श्री हनुमान मंदिर आणि कोरेगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी बैठका झाल्या. या बैठकांत ते बोलत होते.

मंदिरांतील चैतन्य टिकवण्यासाठी वस्त्रसंहिता आवश्यक ! – परेश गुजराथी, हिंदु जनजागृती समिती

मंदिरे चैतन्याची स्रोत आहेत. मंदिरांतील चैतन्यामुळे व्यक्तीगत जीवन, सामाजिक- राष्ट्रीय स्वास्थ्य टिकते, मंदिरे ही ऊर्जास्रोत आहेत, मंदिरे ही हिंदु धर्माचे सामर्थ्य आहे; म्हणून मंदिरातील चैतन्य-सात्त्विकता टिकवण्यासाठी मंदिरांमध्ये मंदिर महासंघाच्या वतीने वस्त्रसंहिता (ड्रेस कोड), सामूहिक आरती यांसारखे उपक्रम राबवत आहे. महासंघाच्या वतीने आतापर्यंत राज्यात ८०० हून अधिक मंदिरांत, जिल्ह्यात ७० हून अधिक मंदिरांत वस्त्रसंहिता फलक लागले आहेत.

चिंचघर आणि कोरेगाव येथे झालेल्या बैठकांत पंचक्रोशीतील मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. या अभियान प्रसारात हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विलास भुवड, शिवाजी सालेकर यांच्यासह कोरेगाव येथील श्री विठ्ठल मंदिराचे विश्वस्त श्री. प्रकाश मोरे यांनी सहभाग घेतला.

मंदिरांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा आणि महासंघाच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचा उपस्थित मंदिर विश्वस्तांनी अभिप्राय व्यक्त केला.