संपादकीय : देवस्थाने धर्मशिक्षण केंद्रे बनावीत !

गोव्यात ९ फेब्रुवारीला २२० देवस्थानांमध्ये नूतन समिती निवडण्यासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीला राजकीय निवडणुकांप्रमाणे स्वरूप नसले, तरी काही देवस्थानांमध्ये २ गटांत वाद असल्याने तेथे पोलिसांना नेमण्यात आले होते. गोव्यात वर्ष १९३३ मध्ये म्हणजे पोर्तुगीजकाळात निर्माण केलेला ‘देवस्थान नियंत्रण कायदा’ हा देवस्थानांना लागू आहे. या कायद्यात पालट करण्याचा मध्यंतरी सरकारचा विचार होता; पण तो प्रत्यक्षात आलेला नाही. यानुसार देवस्थानाच्या महाजनांनी निवडलेली देवस्थान समिती देवस्थानाचा कारभार पहाते. महाराष्ट्र राज्याप्रमाणे येथील देवस्थानांचे सरकारीकरण झालेले नाही. त्यामुळे येथील देवस्थानांची मालमत्ता किंवा पैसा देवस्थान समितीकडेच रहातो. सरकारच्या वतीने केवळ या कारभारावर लक्ष ठेवले जाते.

शून्यातून उभी राहिलेली देवस्थाने !

गोव्यातील बहुतांश देवस्थाने ही अन्य राज्यांतील देवस्थानांच्या तुलनेत अत्यंत प्रशस्त आणि स्वच्छ आहेत. काही जुन्या प्रसिद्ध देवस्थानांच्या भूमीही आहेत. या भूमींचे उत्पन्न देवस्थानाला मिळते. गोव्यातील जी काही प्रसिद्ध देवस्थाने आहेत, त्यांचा इतिहासही रोमांचक आहे. गोव्यावर पोर्तुगिजांनी ४५० वर्षे राज्य केले. पोर्तुगिजांचा जेव्हा गोव्यात जम बसायला प्रारंभ झाला, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम हिंदूंची मंदिरे तोडायला प्रारंभ केला. तिसवाडी (पणजी आणि परिसर) तालुक्यातील मंदिरांवर तेव्हा पहिला घाव बसला. पोर्तुगिजांचे हे क्रौर्य पाहून इतरत्रचे हिंदु भाविक सतर्क झाले. त्यांनी आपापल्या मंदिरांतील देवतांच्या मूर्ती नद्या पार करून पोर्तुगिजांचा अंमल नसलेल्या स्थानी हालवल्या किंवा त्या मूर्तीतील देवत्व एखादा दगड किंवा धातू यांद्वारे स्थलांतरित केले. काही जणांनी मूर्ती विहिरीत लपवून ठेवल्या आणि नंतर योग्य वेळी सुरक्षितस्थळी देवळे उभारून पुन्हा स्थापन केल्या. अशा प्रकारे स्थलांतरित झालेल्या मूर्तींसाठी बांधलेली ही बहुतांश मंदिरे आज डौलाने उभी आहेत. पूर्वी मूर्तीसाठी गर्भागृह आणि समोर बसण्यासाठी मंडप एवढेच असलेल्या मंदिरांचा आता बराच विस्तार झाला आहे. मंदिराच्या बाजूला सभागृह, महाजनांना रहाण्यासाठी खोल्या, देवस्थानाचे कार्यालय, साहित्य ठेवण्यासाठी खोल्या, असे स्वरूप देवस्थानांना आले. अर्थात् देवस्थानांच्या या समृद्धीमागे त्या मंदिरांचे महाजन आणि सेवेकरी यांचे योगदान पुष्कळ मोठे आहे. ही भरभराट करतांनाच संबंधित देवस्थानांनी सर्व परंपरा, धार्मिक विधी यांचे पालन करून मंदिरातील पावित्र्यही टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्रातील काही देवस्थानांना ज्याप्रमाणे पुरो(अधो)गाम्यांची वाळवी लागल्याने काही परंपरा आणि विधी यांना फाटा द्यावा लागला, तशी परिस्थिती गोव्यातील देवस्थानांवर अद्याप आलेली नाही.

येथे अशी काही देवस्थाने आहेत, जेथे २ समाजांमध्ये मानपानावरून वाद आहेत. ‘देवतेचा पालखी विधी किंवा अन्य काही सेवा करण्याचा मान मिळावा’, असे एखाद्याला वाटणे ठीक आहे; पण ‘तो मान मिळणे हा आपला अधिकार आहे’, असे वाटणे, हा अहंकार आहे. त्यामुळे २ समाजांमध्ये जर भांडण होणार असेल, तर ते टाळले पाहिजे. काही ठिकाणी तर अशा भांडणांमुळे देवतेचा पारंपरिक विधीही बंद पडला आहे. ‘देवाला हे आवडेल का ?’, याचा विचार अशा वेळी करायला हवा.

गोव्यातील वैभवशाली मंदिरे !

देवस्थानांचे सध्याचे वैभव पाहून गोव्यातील नूतन देवस्थान समित्यांनी पुढे जाऊन काय करावे ?, याविषयी राज्यातील काही प्रसिद्ध लोकांनी त्यांची मते मांडली आहेत. यांमध्ये ‘मठ, मंदिरे लुटारू आहेत. मी त्यांना पैसा देत नाही’, असे म्हणणारे दत्ता दामोदर नायक हेही मागे राहिलेले नाहीत. ते म्हणतात, ‘‘देवस्थान समित्या भरपूर समाजकार्य करू शकतात. त्यांनी शाळा, महाविद्यालये चालू करावीत. गावागावांत स्मशानभूमी उभाराव्यात.’’ दत्ता नायक जर मंदिरांना पैसे देत नाहीत, तर मंदिरांनी पैसा कसा वापरावा ? हे तरी ते का सांगत आहेत ? असो.

देवस्थानांना भक्तांचे अर्पण मिळते. त्याचप्रमाणे देवतेचे कुळ म्हणजे ज्यांची संबंधित देवता ही कुलदेवता आहे, ते त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार देवतेला अर्पण करतात. देवतेला दान स्वरूपात अर्पण केल्याने दात्यांना काही अनुभूती आलेल्या असतात. त्यामुळे नित्यनेमाने महाजन, कुळ किंवा भक्त दान देतात. देवस्थानांकडे जमा होणारा हा पैसा भक्त किंवा महाजन यांनी स्वतःहून अर्पण केलेला असतो. त्यामुळे दत्ता नायक यांनी मठ आणि मंदिरे यांना ‘लुटारू’ म्हणणे, हे त्यांचे अज्ञान आहे. देवस्थानांना वर्षभरातील धार्मिक विधी, पुजार्‍यांचे मानधन, पाणी-वीज देयके, स्वच्छता सेवा, रंगकाम आदी गोष्टींसाठी खर्च येतो. काही देवस्थाने समाजकार्यही करतात. सध्याच्या काळाची आवश्यकता पाहिल्यास देवस्थाने ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत. मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणाली, इंग्रजीतून शिक्षण, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आदी गोष्टींमुळे समाज हिंदु संस्कृती, धर्मानुसार आचरण, वेदांचे शिक्षण आदी धर्मशिक्षणापासून वंचित आहे. धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंकडून हिंदु धर्मातील सण-उत्सवही शास्त्रानुसार साजरे केले जात नाहीत. यामुळे सण-उत्सवांमध्येही गैरप्रकार शिरले आहेत. संतांचे थोर विचार, मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या प्रेरणादायी कथा आदींपासून सध्याचा बराचसा समाज आणि भावी पिढी संपूर्णत: वंचित आहे. समाजाला धर्मशिक्षण देण्यासाठी देवस्थानांनी पुढाकार घेतल्यास समाज धर्मशिक्षित होईल आणि साधनाही करायला लागेल.

जगाच्या पाठीवर ‘भारत’ हा एकमेव असा देश आहे, जो येथील आध्यात्मिक परंपरेमुळे बाहेर ओळखला जातो आणि या परंपरेलाच जगात मान आहे. एवढेच नाही, तर या देशात जिल्ह्याजिल्ह्यात असणार्‍या संतपातळीच्या व्यक्ती, हिमालयात राहून साधना करणारे अनेक दिव्यात्मे यांच्यामुळे भारताचे हे आध्यात्मिक वैभव टिकून आहे. भारतावर गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आदी परकियांकडून आक्रमणे झाली; परंतु येथील संस्कृती ते मिटवू शकले नाहीत. अध्यात्म हा येथील संस्कृतीचा कणा आहे. त्यामुळे ही दिव्य संस्कृती टिकवून ठेवणे काळाची आवश्यकता आहे. सध्याचा समाज शिक्षित आहे; पण सुसंस्कृत नाही. सध्याचे शिक्षण पोटभरू आहे. त्यामुळे नोकरीचे आमीष दाखवून फसवणे, नोकरीच्या हव्यासापोटी फसले जाणे, अधिकचे आणि झटपट पैसे मिळवण्याच्या नादात आहे तेही गमावून बसणे, भ्रष्टाचार करणे आदी गोष्टी समाजात नीतीमत्ता नसल्यामुळे घडत आहेत. समाजाला धर्मशिक्षण मिळाल्यास समाज सुसंस्कृत होऊन देशातील अनेक समस्या सुटण्यास साहाय्य होईल. हे धर्मशिक्षण देण्याचे समाजकल्याणकारी कार्य देवस्थाने चांगल्या प्रकारे करू शकतात. नूतन देवस्थान समित्यांना ही सद्बुद्धी होवो !

धर्मशिक्षण देण्याचे समाजकल्याणकारी कार्य करून देवस्थानांनी सुसंस्कृत समाज घडवण्यास हातभार लावावा !