श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

सनातन-निर्मित दत्ताचे चित्र

१. अर्थ

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.

२. इतर काही नावे

२ अ. दिगंबर : ‘दिक् एव अम्बरः ।’ दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर म्हणजे वस्त्र आहे असा, म्हणजे एवढा मोठा, सर्वव्यापी.

२ आ. दत्तात्रेय : हा शब्द दत्त + आत्रेय असा बनला आहे. आत्रेय म्हणजे अत्रिऋषींचा मुलगा.

३. मूर्तीविज्ञान

प्रत्येक देवता हे एक तत्त्व आहे. हे तत्त्व युगानुयुगे असतेच. देवतेचे तत्त्व त्या त्या काळाला आवश्यक अशा सगुण रूपात प्रगट होते, उदा. भगवान श्रीविष्णूने कार्यानुमेय धारण केलेले ९ अवतार. मानव कालपरत्वे देवतेला विविध रूपांत पुजायला लागतो. ख्रिस्ताब्द १००० च्या सुमारास दत्ताची मूर्ती त्रिमुखी झाली, त्यापूर्वी ती एकमुखी होती. दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या प्रत्येक हातातील वस्तूविषयी पाहूया.

कमंडलू हे त्यागाचे प्रतीक : कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे; कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय.

त्रिशूळ : त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही.

४. परिवाराचा भावार्थ

४ अ. गाय (पाठीमागे असलेली) : पृथ्वी आणि कामधेनू (इच्छिलेले देणारी)

४ आ. चार कुत्रे

१. चार वेद

२. गाय आणि कुत्रे ही एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात.

४ इ. औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप. त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)