वेंगुर्ले – तालुक्यातील शिरोडा येथील समुद्रात प्रकाशझोतात, तसेच पर्ससीन नेटच्या माध्यमातून मासेमारी करणारी गोवा राज्यातील यांत्रिक नौका (ट्रॉलर) मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने १२ डिसेंबर या दिवशी पकडली. या नौकेवर एकूण २९ कामगार होते. नौकेत सापडलेल्या मासळीचा २ लाख ८३ सहस्र रुपयांना लिलाव करण्यात आला. ही नौका देवगड बंदरात हालवण्यात येईल आणि त्यानंतर मालवण येथील साहाय्यक मस्य आयुक्तांकडे कारवाईसाठी हे प्रकरण सादर करण्यात येईल, अशी माहिती वेंगुर्ला येथील मत्स्य व्यवसाय अनुज्ञप्ती (परवाना) अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली.
वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात, तसेच पर्ससीन नेटचा वापर करून काही यांत्रिक नौका मासेमारी करत असल्याची तक्रार स्थानिक मासेमारांनी दिली होती. त्यानुसार शासनाच्या ‘शीतल’ या गस्ती नौकेद्वारे मत्स्य विभागाच्या पथकाने ११ डिसेंबरला रात्रीपासून वेंगुर्ले येथील समुद्रात गस्त चालू केली होती. १२ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजता गोवा राज्यातील एक ट्रॉलर प्रकाशझोतात मासेमारी करत असतांना पथकाला आढळला. त्या ट्रॉलरला वेंगुर्लेत बंदरात आणून त्यातील मासळीचा लिलाव करण्यात आला, असे जोशी यांनी सांगितले.