आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचा २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी वार्षिकोत्सव

श्री भराडीदेवीचे मंदिर आणि श्री भराडीदेवीची मूर्ती

मालवण – तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी साजरा करण्यात येणार आहे.

प्रतिवर्षी लाखो भाविक श्री भराडीदेवीच्या जत्रेला येत असतात. त्यामुळे भाविक श्री भराडीदेवीच्या जत्रेचा दिवस कधी घोषित होतो, याची आतुरतेने वाट बघत असतात. रविवार, १२ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी देवीचा कौल घेऊन परंपरेनुसार जत्रोत्सवाचा दिनांक ठरवण्यात आला.

गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच स्तरांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे श्री भराडीदेवीच्या यात्रेवरही त्याचा परिणाम झाला होता. केवळ आंगणेवाडीवासियांसाठी मर्यादित स्वरूपात जत्रोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्रच्या भक्तांना देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नव्हते; मात्र २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती आंगणे कुटुंबियांनी दिली.