श्रीक्षेत्र कळंब (यवतमाळ) येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे आगमन !

श्रीक्षेत्र कळंब येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे झालेले आगमन

यवतमाळ, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील २१ श्री गणेश क्षेत्रांपैकी एक असलेल्या आणि इंद्रदेवाच्या घोर तपस्येने प्रकट झालेल्या श्रीक्षेत्र कळंब येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे आगमन झाले. कोरोना संसर्गामुळे बंद असलेले मंदिर ७ ऑक्टोबर या दिवशी उघडल्यावर भाविकांनी गाभार्‍यात प्रवेश केला. तेव्हा भाविकांना गंगेचे दर्शन झाले. त्यानंतर अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर समिती, पोलीस आणि प्रशासन यांच्या वतीने मंदिराच्या गाभार्‍यात जाणारा भुयारी मार्ग ८ ऑक्टोबर या दिवशी बंद करून बाहेरूनच गंगेच्या दर्शनाचे नियोजन केले; मात्र तसे शक्य होत नसल्याने ग्रामस्थ आणि भाविक हे असंतुष्ट झाले.

गंगादर्शन होण्यासाठी भाविकांकडून निवेदन !

स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने तहसीलदार चव्हाणसर, ठाणेदार राठोडसर आणि मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांना लेखी निवेदन दिले अन् ‘गंगेच्या दर्शनासाठी भुयारी मार्ग चालू करण्यात यावा’, अशी मागणी ९ ऑक्टोबर या दिवशी केली. (भाविकांना गंगेचे दर्शन जवळून घेता यावे, यासाठी मंदिराच्या भुयारामध्ये विशेष रचना आहे. भुयारात प्रवेश केल्यानंतर बाहेर निघणारे २ मार्ग आहेत.) भाविकांची श्रद्धा आणि जनभावना यांचा आदर करत पोलीस, प्रशासन आणि मंदिर समिती यांच्या वतीने १० ऑक्टोबरपासून गंगेच्या दर्शनासाठी मंदिराचे भुयारी मार्ग चालू करण्यात आले आहेत. नागपूर येथील भूजल अधिकार्‍यांनी गंगाजलाचे नमुने पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून त्याचा अहवाल यायचा आहे. ‘गंगादर्शन पुढील १५ दिवस रहाणार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये’, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मंदिर प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मंदिराची रचना !

मंदिर गावाच्या भूपातळीपासून ३० फूट खोल असून तळघरसदृश आहे. पायर्‍यांवरून खाली उतरल्यावर एक चिरेबंदी अष्टकोनाकृती कुंड आहे. मुख्य गाभार्‍यात श्री चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची विलोभनीय आणि नयनरम्य मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती दक्षिणाभिमुखी आहे.

मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व !

महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंब (कळंब) क्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्रदेवाच्या घोर तपस्येने प्रकट झालेले श्री गणेश म्हणजेच श्री चिंतामणी होय. इंद्रदेवाने श्री गणेशपूजनास पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या जलाने श्रीपूजन केले. प्रति १२ वर्षांनी गंगेला श्रीचरण धुण्यास सांगितले. त्यानुसार १२ वर्षांनी भुयारात असलेल्या कुंडातील पाण्याची पातळी वाढते. श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाल्यावर पातळी आपोआप न्यून होते. (एक ते सव्वा मास गंगादर्शन होते.) यापूर्वी १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी गंगेचे आगमन झाले होते. कदंब ऋषींचा येथे आश्रम होता. ‘त्यांनीच श्री गणेशमूर्तीची स्थापना केली’, असे श्री गणेश आणि श्रीमद्मुद्गल पुराणामध्ये उल्लेख आहे.

गंगेचे माहात्म्य !

१२ वर्षांतून एकदा एक मासाच्या कालावधीत मंदिराच्या गाभार्‍यात गंगेचे आगमन होऊन ती श्री गणेशमूर्तीच्या चरणांना स्पर्श करते आणि नंतर ती लुप्त होते, असे या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व आहे. गंगेचे जल गाभार्‍यात कुठून येते आणि कुठे लुप्त होते, याचा शोध आतापर्यंत कुणालाही घेता आला नाही. याविषयी भूगर्भ शास्त्रज्ञांनी अनेकदा संशोधन केले; मात्र त्यामागील सत्य समजू शकलेले नाही.