भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चे पाकिस्तानी षड्यंत्र ! – श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते, कर्नाटक

‘भारतात नार्कोटिक जिहाद ?’, या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

श्री. प्रशांत संबरगी

रामनाथी – भारतात २ प्रकारचे जिहाद असून एक ‘हार्ड जिहाद’ ज्यामध्ये बाँबस्फोट आणि आतंकवादी कारवाया अंतर्भूत असतात, तर दुसरा ‘सॉफ्ट जिहाद’ आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था’, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ (अमली पदार्थ जिहाद) येतो. रक्त न सांडता आणि बंदुकीची गोळी वाया न घालवता भारताला कमकुवत करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चा वापर केला जात आहे. भारतातील युवा पिढीला कमकुवत करून भारताला उद्ध्वस्त करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र आहे. पाकचा अमली पदार्थ विक्रेता रमझान याला पकडल्यावर त्याने तशी स्वीकृती दिली आहे, असे प्रतिपादन कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक श्री. प्रशांत संबरगी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतात नार्कोटिक जिहाद ?’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केले.

श्री. प्रशांत संबरगी पुढे म्हणाले, ‘‘पंजाब नंतर केरळ राज्याला ‘नार्कोटिक जिहाद’चे केंद्र बनवणे चालू आहे. केरळमध्ये पूर्वी ५०० पर्यंत असणार्‍या अमली पदार्थ व्यवसायाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वर्ष २०१६ नंतर ३ सहस्र ५०० पर्यंत गेले आहे. त्यामुळेच केरळमधील फादर जोसेफ कल्लारनगट्ट यांनी ख्रिस्ती तरुणींना अमली पदार्थांद्वारे लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले. केवळ हिंदीच नव्हे, तर कन्नड, तमिळ, तेलगू आदी चित्रपटसृष्टीतील पार्ट्या अमली पदार्थांविना होतच नाहीत. हे राष्ट्रीय समीकरणच बनले आहे. काँग्रेस पक्षाच्या बेंगळुरूतील एका अल्पसंख्यांक समुदायातील आमदाराच्या जन्मदिनाच्या पार्टीला बॉलीवूडमधील सर्व कलाकार आले होते. त्याचे आयोजन अभिनेता सुशांतसिंह राजपूत खटल्यातील ‘इम्तियाज खत्री’ यांनी केले होते. यातून सँडलवूडचा (कन्नड चित्रपटसृष्टीचा) अमली पदार्थांशी संबंध उघड होतो. वर्ष २०१९ मध्ये ‘अमली पदार्थमुक्त भारत’ या मोहिमेसाठी आम्ही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने चित्रपटसृष्टीतील लोकांची आवाहनपर छोटीशी मुलाखत घेण्याचे ठरवले, तेव्हा ७० टक्के लोकांनी त्याला नकार दिला; कारण बहुतांश चित्रपटसृष्टी यात सहभागी आहे. त्यामुळेच मुंबई ते गोवा क्रूझवर अमली पदार्थविरोधी पथकाने धाड घालून अटक केलेल्या आर्यन शाहरुख खान याला चित्रपटसृष्टीचा पाठिंबा मिळत आहे.’’

अमली पदार्थांचा व्यवसाय हा आतंकवाद आणि गुन्हेगारी कारवाया यांसाठी  पैसे कमावण्याचे मोठे माध्यम ! – अरुण कुमार, माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, ओडिसा

श्री. अरुण कुमार

अमली पदार्थांचा व्यवसाय हा आतंकवाद आणि गुन्हेगारी कारवाया यांसाठी पैसे कमावण्याचे मोठे माध्यम आहे; मात्र याचे योग्य अन्वेषण आणि जलद न्यायनिवाडा होऊन जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे थांबणे कठीण आहे. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांकडे पोलीस, सीमाशुल्क विभाग, अमली पदार्थविरोधी पथक हे सर्व पैसे कमावण्याचे माध्यम म्हणून पहातात. त्यामुळेच अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या १५ सहकार्‍यांचे मृत्यू या आत्महत्या होत्या कि हत्या ? याचे अन्वेषण न करता त्याचे अमली पदार्थांच्या अनुषंगाने अन्वेषण केले गेले.

अमली पदार्थांद्वारे भारतीय युवा पिढीला उद्ध्वस्त केले जात आहे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलमध्ये नेहा बहुगुणा नावाची युवती आणि अन्य तीन युवक यांचा अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यू झाला होता. एकूणच भारतीय युवा पिढीला उद्ध्वस्त केले जात आहे. भारतीय युवकांना अमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे.