९८ सहस्र एस्.टी.चे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !

एस्.टी. महामंडळाने शासनाकडे मागितले ६०० कोटी रुपयांचे साहाय्य !

एस्.टी.

मुंबई – कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इंधनाची दरवाढ यांमुळे एस्.टी. महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. प्रति मासाच्या ७ दिनांकाला होणारे वेतन ऑगस्ट मासाचा १५ दिनांक उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे घराचा व्यय भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्‍यांसमोर आहे. वेतनासाठी एस्.टी. महामंडळाने ६०० कोटी रुपयांचे साहाय्य राज्यशासनाकडे मागितले असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील ९८ सहस्र एस्.टी. कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ६ सहस्र ४०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. महामंडळाला प्रवासी उत्पन्नच मिळत नसल्याने गेल्या वर्षी कर्मचार्‍यांचे वेतन देणेही कठीण झाले होते. त्यामुळे राज्यशासनाकडून आर्थिक साहाय्य घेऊनच वेतन देण्यात आले, त्या वेळी वेतनाचा प्रश्न काहीसा सुटला होता; परंतु ते साहाय्य संपल्याने जुलै मासाचे वेतन अद्याप झालेले नाही.

…तर संघटनेस औद्याोगिक न्यायालयात दावा प्रविष्ट करावा लागेल !

‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने’चे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, वेतन नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतांना एस्.टी. कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापुढे कामगारांना नियमित देय दिनांकास वेतन न मिळाल्यास संघटनेस औद्याोगिक न्यायालयात दावा प्रविष्ट करावा लागेल.