साधकांनो, मानवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणार्‍या भगवंताप्रती कृतज्ञता म्हणून झोकून देऊन साधना करा !

‘आज भूतलावर साक्षात् भगवान विष्णूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात अवतार घेतला आहे. कलियुगातील पराकोटीची अधोगती झालेल्या मानवाला हे कळणे कठीण आहे. ‘देव आला घरा, नाही ओळखिला ।’, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील ओळीप्रमाणे आपली अवस्था झाली आहे; म्हणून परम कृपाळू भगवंताने सप्तर्षींनी लिहिलेल्या अनेक जीवनाडीपट्ट्यांच्या माध्यमांतून हे गुपित मानवजातीला अवगत करून दिले आहे.

‘भगवंताने मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर जन्म घेतला आहे’, हेही भगवंत कळू देत नाही. किती त्या भगवंताची अहंशून्यता ! याचा विचार करत असतांना भगवंतानेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) पुढील सूत्रे सुचवली. ‘पुढे दिलेली ही सूत्रे, म्हणजे भगवंताच्या कार्याची एक सहस्र कोट्यांशही ओळख नाही’, याची जाणीव होत आहे; परंतु ‘ते कार्यही किती अफाट आहे !’, हे कळल्याने भगवंतापुढे नतमस्तक होता येते आणि ‘आपण क्षुद्र असूनही किती अहंभावाने वागतो !’, याची लाज वाटू लागते.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्रीविष्णूने पृथ्वीतलावरील क्षुद्र मानवाच्या उद्धारासाठी भूतलावर अवतार घेणे

या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या पसा‍र्‍यात पृथ्वीचे स्थान ते केवढे ? ते एखाद्या सुईच्या अग्रभागावरील धुळीच्या कणाइतकेही नाही. असे असतांना अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक श्रीविष्णु यत्किंचित पृथ्वीतलावरील क्षुद्र मानवाच्या उद्धारासाठी स्वतः या भूतलावर अवतार घेतो. त्याच्या या प्रीतीविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

२. मानवाचा कृतघ्नपणा

मानवजातीच्या उद्धारासाठी तो अनंत कोटी ब्रह्मांडनायक या भूतलावर अवतरतो. तेव्हा अज्ञानी मानव त्याच्या उद्धारासाठी अवतरलेल्या भगवंताला आणि त्याच्या कार्याला पुष्कळ विरोध करतो. मानवाचा किती हा कृतघ्नपणा ! किती हे अज्ञान !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

३. अवतारी पुरुषांची अहंशून्यता

अवतारी पुरुष आपल्या कार्यकाळात साधकांची आध्यात्मिक उन्नती करवून घेतात. त्यांच्या साधनेतील स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील सर्व अडथळे दूर करतात, तसेच त्यांच्याकडून साधना करवून घेऊन आणि त्यांच्यावर कृपा करून त्यांचे प्रारब्ध अन् संचित संपवतात. एवढेच नव्हे, तर समस्त प्राणीमात्रांचा आपल्या अस्तित्वाने आणि संकल्पाने उद्धार करतात. एवढे प्रचंड कार्य करूनही ते त्याची वाच्यता करत नाहीत आणि त्याचे श्रेयही घेत नाहीत.

४. चौर्‍यांशी लक्ष योनींमधील प्रत्येक जिवाचा योगक्षेम वहाणारा कृपाळू भगवंत !

केवळ या पृथ्वीचाच विचार केला, तर तिची लोकसंख्या ७५० कोटींपेक्षा अधिक आहे. ८४ लक्ष योनींमधील प्रत्येक योनीत कोट्यवधी जीव आहेत. काही जीव तर इतके सूक्ष्म आहेत की, ते सूक्ष्मदर्शकामधून पहावे लागतात. भगवंत या प्रत्येक जिवाची काळजी घेत असतो. ८४ लक्ष योनींतील अब्जावधी जिवांच्या प्रत्येक वेळच्या भोजनाची, निवासाची आणि रक्षणाची व्यवस्था भगवंताने करून ठेवली आहे. ‘कोणाला कधी आणि काय खायला मिळणार ?’, याची पूर्ण व्यवस्था भगवंताने केलेली असते.

५. भगवंताने ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीचे सुनियोजन केलेले असणे

भगवंताने प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींची उत्पत्ती, स्थिती अन् लय यांचे परिपूर्ण नियोजन केलेले असते. ब्रह्मांडात अनेक पृथ्वी आहेत. ग्रह-तार्‍यांच्या भ्रमणकक्षा निर्धारित आहेत. ‘प्रतिदिन सूर्य आणि चंद्र केव्हा उगवणार अन् केव्हा मावळणार ?’, हे निश्चित आहे. आजपासून पुढच्या कितीही वर्षांपर्यंतचा किंवा मागील सहस्रो वर्षांचा अभ्यास केला, तरी आपण चंद्र अन् सूर्य उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा निश्चित सांगू शकतो. एवढे भगवंताचे सुनियोजन आहे. अशी अगणित उदाहरणे देता येतील.

६. भगवंताचे प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण असणे

या अफाट ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीवर भगवंताचे पूर्ण नियंत्रण आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक ब्रह्मांडातील प्रचंड आकाराचे अगणित ग्रह आणि तारे, जीवसृष्टी, तसेच स्थूल अन् सूक्ष्म सृष्टी यांवर भगवंताचे पूर्ण नियंत्रण आहे.

७. भगवंताची परिपूर्णता

भगवंताने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे. सृष्टीची निर्मिती परिपूर्ण आहे. मानवाच्या शरिराचा विचार केला, तर लाखो शास्त्रज्ञ शेकडो वर्षे या शरिराचा अभ्यास करत आहेत; परंतु ‘मानवाचे शरीर, मन आणि बुद्धी यांचे कार्य कसे चालते ?’, याचे आकलन त्यांना होऊ शकलेले नाही. त्यांनी यंत्रमानव बनवण्याचा प्रयत्न केला; पण हाडा-मांसाचा, मन आणि बुद्धी असलेला माणूस ते बनवू शकले नाहीत. मानवी मनाचा थांगपत्ता अजूनही कुणाला लागू शकलेला नाही, इतके ते वैशिष्ट्यपूर्ण आणि परिपूर्ण आहे. मानवाचा मेंदू करत असलेले अफाट कार्य पाहून शास्त्रज्ञ अजूनही अचंबित आहेत. मानवी मेंदूचे कार्य अनाकलनीय आणि परिपूर्ण आहे. मेंदूची रचना, कार्य, तसेच ‘त्याची क्षमता किती आहे ?’, याचा थांगपत्ता वैज्ञानिकांना लागलेला नाही.

‘वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर’, हे ६ ऋतू त्या त्या वेळी कार्यान्वित होतात. प्रत्येक ठिकाणचे ऋतूंचे चक्र वर्षानुवर्षे तसेच असते. ‘प्रत्येक झाडाला फुले, पाने आणि फळे केव्हा येणार ?’, याचे परिपूर्ण नियोजन असते. त्यात पालट होत नाही. मानवाच्या शरिरात वात,  पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या निर्मितीचा कालावधी अन् त्याच्या वेळा सर्व ठिकाणी सारख्याच आहेत.

समुद्रात सहस्रो फूट खोलवर लहान-मोठे मासे सहजतेने फिरू शकतात. खरेतर एवढ्या खोलीवर पाण्याचा प्रचंड दाब असतो. आपण त्या प्रचंड दाबाची कल्पनाच करू शकत नाही. त्या दाबामुळे आधुनिक उपकरणांच्या साहाय्यानेही मानव एवढ्या खोलवर जाऊ शकत नाही; पण मासे तेवढ्या खोलीवर सहजतेने फिरू शकतात.

८. विविध प्रकारची झाडे, फुले आणि फळे बनवणार्‍या भगवंताची कलात्मकता !

भगवंताने अनेक प्रकारची झाडे निर्माण केली आहेत. त्यांचे विविध आकार आहेत. त्या अनेक प्रकारच्या झाडांना अनेक प्रकारची, विविध आकारांची रंगीबेरंगी पाने, फुले आणि फळे येतात. त्यांना अनेक प्रकारचे गंधही असतात. प्रत्येक फळाची चव वेगळी असते.

भगवंताने अनेक प्रकारचे पक्षी निर्माण केले आहेत. त्यांचा आकार, रंग आणि आवाज भिन्न आहेत. ते आपल्याला सहज आकर्षित करून घेतात. असेच प्राण्यांविषयीही आहे.

विविध प्रकारची धान्ये आहेत. त्यांना वेगवेगळा स्वाद असतो. त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार वैशिष्ट्यपूर्ण धान्य उगवते. त्यांचे लाभही विविध आहेत. हे सगळे आश्चर्यकारक आहे.

९. ‘सृष्टीवर जिवापाड प्रीती करणार्‍या भगवंताविषयी आपल्याला कृतज्ञता वाटते का ?’, याचा विचार करायला हवा !

खरेतर ‘देवाला एवढे करण्याची काय आवश्यकता होती ?’, असा प्रश्न पडू शकतो. या सगळ्यांचा आस्वाद खर्‍या अर्थाने मानवच घेतो. यावरून ‘देव मानवावर किती प्रेम करतो !’, हे लक्षात येते.

अशा या जीवसृष्टीवर जिवापाड प्रीती करणार्‍या भगवंताविषयी आपल्याला किती प्रेम वाटायला पाहिजे ! आपल्याला त्याच्याप्रती किती कृतज्ञता वाटायला पाहिजे ! ‘तशी आपल्याला वाटते का ?’, याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे.

१०. प्रार्थना

‘अशा परम दयाळू, परम कृपाळू, सर्वशक्तीमान, सर्वज्ञ आणि भक्तवत्सल भगवंताच्या चरणांजवळ जाण्यासाठी झोकून देऊन तीव्र साधना करण्याची बुद्धी सर्वांना होवो’, अशी श्रीविष्णूचा अवतार असणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.

इदं न मम । (म्हणजे हे माझे नाही.)

श्रीविष्णुचरणार्पणमस्तु ।’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(१०.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक