देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘अध्यात्मातील कृती करतांना भाव महत्त्वाचा असतो. प्रार्थना, नामजप यांच्यासह देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. देवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधीयुक्त केलेले उपचारसमर्पण म्हणजे देवपूजा होय. देवतेची प्रतिमा अथवा मूर्ती यांची शास्त्रोक्त पद्धतीने करावयाची पूजा देवतेला अपेक्षित अशी झाल्यास ती खर्‍या अर्थाने ‘पूजा’ होते. याप्रमाणे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथील ध्यानमंदिरात किंवा घरी असलेल्या देवघरात पूजा करतांना ‘देवता, संत किंवा गुरु तिथे प्रत्यक्ष आहेत’, असा भाव ठेवून त्यांची पूजा करावी. भावपूर्ण पूजेतून चैतन्य प्रक्षेपित होऊन त्याचा पूजकाला आणि त्या वास्तूतील सर्वांना लाभ होतो. देवता आणि गुरु यांचे आशीर्वाद लाभतात, तसेच वातावरणातील सकारात्मक ऊर्जा अन् सात्त्विकता वाढते आणि आध्यात्मिक स्तरावरील अनुभूतीही येतात; मात्र पूजा भावपूर्ण न केल्यास देवाची अवकृपा होऊन त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही, तसेच वातावरणातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तूतील चैतन्यही उणावते. त्यामुळे घरातील इतर कामांप्रमाणे पूजा हे एक काम किंवा केवळ एक नित्यकर्म म्हणून उरकू नये. सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणार्‍या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ? हे लक्षात घेऊन देवता आणि गुरु यांची यथासांग अन् भक्तीभावाने पूजा केली, तरच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (६.७.२०२१)