कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

कुलु (हिमाचल प्रदेश) – सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे १९ जून २०२१ या दिवशी देवभूमी हिमाचल प्रदेशचा प्रवास आरंभला. सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांचे दर्शन घेतले आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी अन् आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली. अशा या दैवी क्षेत्रांमध्ये कुलु खोर्‍यातील ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखली माता’ ही दोन स्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या दोन्ही स्थानांविषयीचा हा वृत्तांत…

श्री. विनायक शानभाग

कुलु खोर्‍याचे आध्यात्मिक महत्त्व

देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये कुलु नावाचे शहर आहे. या शहराच्या चारही दिशांनी अनेक दैवी स्थाने आहेत. कुलु म्हणजे पूर्वीच्या काळातील ‘कुलांतपीठ’ ! जेथे मनुष्य कुळ संपते आणि देवकुळ म्हणजेच देवतांचे निवासस्थान आहे ते, म्हणजे ‘कुलांतपीठ’ ! अशा कुलु प्रदेशात कुलुचे खोरे आहे. या खोर्‍याच्या डावीकडे आणि उजवीकडे मोठे डोंगर आहेत. उजवीकडे असलेल्या डोंगरावर भगवान शिव ‘बिजली महादेव’ या नावाने, तर डावीकडे असलेल्या डोंगरावर देवी पार्वती ‘बेखलीमाता’ या नावाने विराजमान आहेत. ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ या दोन्ही देवता कुलु खोर्‍याच्या अधिष्ठात्री देवता आहेत.

शिवाच्या क्रोधाग्नीतून निर्माण झालेल्या ‘जालंधर’ची कथा आणि ‘बिजली महादेव’ अन् ‘बेखलीमाता’ यांचे स्थानमाहात्म्य

जालंधर असुराला देवी पार्वती भुवनेश्वरीचे रूप दाखवून अंतर्धान पावली, त्या गुहेच्या चिंचोळ्या प्रवेशद्वाराशी उभे असलेले श्री. विनायक शानभाग !

एकदा इंद्राला त्याच्या अहंकारासाठी शिक्षा करण्यासाठी भगवान शिव त्यांचा तिसरा डोळा उघडतात; मात्र इंद्र लगेच भगवान शिवाच्या चरणी शरण जाऊन क्षमायाचना करतो. भगवान शिवाने त्यांचा तिसरा डोळा उघडलेला असल्याने त्यातून बाहेर पडलेला क्रोधाग्नी शिव समुद्राकडे पाठवतो. त्यामुळे इंद्रदेव वाचतात. समुद्रात गेलेल्या शिवाच्या क्रोधाग्नीमुळे शिवस्वरूप जालंधर नावाच्या असुराची निर्मिती होते. तो शिवासारखा तेजस्वी आणि महाशक्तीवंत असतो अन् तो असुरांचा राजा होतो. जालंधरची पत्नी वृंदा ही कालनेमीची पुत्री आणि पतिव्रता असते. जालंधरचा अहंकार वाढून तो देवलोकावरच आक्रमण करतो आणि सर्व देवतांना हरवतो.

बेखलीमातेचे स्थानमाहात्म्य

जालंधर असुराला देवी पार्वतीने ‘भुवनेश्वरी’चे रूप दाखवून पळवून लावले ते बेखलीमातेचे (भुवनेश्वरीदेवी) स्थान आणि गोलात बेखलीमातेची मूर्ती दाखवली आहे.

जालंधर तिन्ही लोकांचा राजा झाल्यावर शिवाकडे जातो आणि म्हणतो की, तू संन्यासी आहेस. तुला अलौकिक सौंदर्य असलेली पार्वतीदेवी पत्नी म्हणून का पाहिजे ? मी तिन्ही लोकांचा राजा असून पार्वती ही माझी राणी असली पाहिजे. यानंतर जालंधर पार्वतीकडे जातो आणि तिला घेऊन जायचा प्रयत्न करतो. तेव्हा देवी पार्वती ‘भुवनेश्वरी’चे रूप धारण करते आणि ते रूप पाहून जालंधर घाबरतो अन् तेथून पळून जातो. पार्वतीदेवीने जेथे जालंधरला तिचे भुवनेश्वरी रूप दाखवले, ते स्थान म्हणजे ‘बेखलीमाता’ होय ! या ठिकाणी आजही पार्वतीमातेच्या ‘भुवनेश्वरी’ रूपाची पूजा केली जाते. स्थानिक लोक तिला ‘बेखलीमाता’ या नावाने संबोधतात.

बिजली महादेवाचे स्थानमाहात्म्य

दर १२ वर्षांनी वीज पडणारा देवदार लाकडाचा मंदिराच्या शेजारील ७० फूट खांब आणि वीज पडून तुकडे होणारे अन् ते एकत्र करून पुनर्स्थापित केले जाणारे शिवलिंग (गोलात दाखवलेले) !

जालंधरचा पापाचा घडा भरल्यावर त्याचा अंत्यसमय जवळ येतो. शिव जालंधरशी युद्ध करतात. युद्धात शिव त्रिशूळाने आणि सुदर्शनचक्राने जालंधरचा वध करतात. वध झाल्यावर तो शिवाच्या तिसर्‍या नेत्राशी एकरूप होतो. शिव आणि जालंधर यांचे युद्ध झाले ते स्थान म्हणजे ‘बिजली महादेवा’चा डोंगर होय ! येथे शिवाचे प्रतीक म्हणून एक शिवलिंग आहे. मंदिराच्या समोर ७० फूट उंच देवदार लाकडाचा खांब आहे. असे म्हटले जाते की, प्रत्येक १२ वर्षांनी या खांबावर वीज पडते आणि नंतर ती मंदिरात प्रवेश करून शिवलिंगाला आपटते. यामुळे शिवलिंगाचे अनेक तुकडे होऊन ते विखुरलेले असतात. ज्या रात्री हे घडते, त्या रात्री मंदिराच्या पुजार्‍यांना स्वप्नात त्या शिवलिंगाचे तुकडे कुठे कुठे पडले आहेत, त्याचे दर्शन होते. दुसर्‍या दिवशी सकाळी पुजारी तेथे जातात आणि शिवलिंगाचे तुकडे गोळा करून लोण्याने ते शिवलिंग पुनर्स्थापित करतात. या शिवलिंगावर वीज पडते; म्हणून येथे शिवाला ‘बिजली महादेव’ (हिंदीमध्ये बिजली म्हणजे वीज) हे नाव पडले.

– श्री. विनायक शानभाग

क्षणचित्रे

१. बिजली महादेवाला जायला कुलु शहरातून डोंगरावर २२ कि.मी. गाडीने जावे लागते आणि शेवटी दीड किमी डोंगरावर पायी चढावे लागते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत दौर्‍यासाठी असलेल्या साधकांना अशी अनुभूती आली की, ही चढण अत्यंत आनंददायी आहे आणि ती सुखरूपपणे चढता आली.

२. बेखलीमातेच्या मंदिरात दशमहाविद्या, दशावतार आणि रामायण-महाभारतातील प्रसंगांविषयी सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत. देवीच्या मंदिराजवळ देवी जेथे अंतर्धान झाली, ती गुहा आहे.

३. ‘बेखलीमाता’ ही कुलु शहराची स्थानदेवताही आहे. कुलुमध्ये होणारा ‘कुलु दसरा’ संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे. ‘बेखलीमाते’ची आज्ञा घेऊनच कुलु दसर्‍याचा आरंभ होतो.

– श्री. विनायक शानभाग, हिमाचल प्रदेश

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या दैवी प्रवासामुळे आपल्याला इतिहासात दडलेल्या दैवी स्मृतींचे दर्शन घडत आहे ! त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !