७. संतांचे कार्य
७ अ. संत लाखात एकच शब्द बोलतात; परंतु ते सगळ्यांचे भले करणारे शब्द असतात ! : समाजात ९९ प्रतिशत गाढवे असतात. १०० माणसांमागे देवाने एक शहाणा पाठवला आहे; म्हणून कुणाकडे तरी संत, साधू, ऋषिमुनी म्हणून बोलतात किंवा मौनरूप धरून बसतात. संत लाखात एकच शब्द बोलतात; परंतु ते सगळ्यांचे भले करणारे शब्द असतात.
७ आ. एक साधू किंवा संत यांना जेवू घातले, तर १ सहस्र ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य पदरी पडतेे.
७ इ. राजा भ्रष्टाचारी असल्याने प्रजाही भ्रष्टाचारी झालेली असणे, त्यामुळे संत देवाला अवतार घे आणि या भ्रष्टाचारी दुष्टांचा नाश कर, अशी प्रार्थना करत असणे : सत्याने आणि नीतीने चालणारे थोडे लोक असून ते लपून बसले आहेत. सध्या पापाचरण करणारी प्रजा भरपूर जन्माला आलेली आहे. चोर, लबाड, लुच्चे आणि फसवे अशाच लोकांचे राज्य आलेले आहे. राक्षसांचे राज्य आले आहे. सध्या लोकांची वृत्ती आणि नीती कशी आहे पहा, माझी तुंबडी भरू दे, दुसरा उपाशी मरू दे. राजा आणि प्रजा भ्रष्टाचारी झाली आहे. पुढे काय होणार ? देवच जाणे. सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळून निघत आहे. आमदार-खासदारांनी आपले घर भरून संपत्ती गोळा केली आहे. सरकारने सारखे कर वाढवून जनतेला सळो कि पळो करून सोडले आहे. आम्ही संत देवाला अवतार घे आणि या भ्रष्टाचारी दुष्टांचा नाश कर, अशी प्रार्थना करत आहोत.
८. संतांकडून कोणता आदर्श घ्यावा ?
८ अ. त्याग
८ अ १. संतांप्रमाणे साधनेत मोह-लोभ नसावा, वैराग्य असावे !
८ अ २. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत यांसारखे वैराग्य हवे ! : संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ महाराज हेही कीर्तन करायचे; परंतु त्यांनी लोकांकडून धन जमा केले नाही. संत तुकाराम महाराजांच्या घरी १८ विश्वे दारिद्य्र होते, तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाठवलेली भेट त्यांनी परत पाठवली. केवढे वैराग्य ! छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. त्यांनी हिंदवी स्वराज्य रामदासांच्या झोळीत टाकले. तेव्हा समर्थ रामदास स्वामी त्यांना म्हणाले, मलाही नको आणि तूही घेऊ नकोस. हे राज्य भगवंताचे, श्रीरामाचे आहे, असे समजून चालव. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा पाठीशी असतांना समर्थ १२ वर्षे लंगोटीवर राहून लोकांना ज्ञान देण्यासाठी फिरत होते ! खरे संत असे असतात.
८ आ. व्यापकत्व
८ आ १. संत एकनाथ महाराजांची दृष्टी देवमय झाली असल्याने त्यांना जगात सर्वत्र भरलेला ईश्वरच दिसणे
हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥
संत एकनाथ महाराज म्हणतात, मला आता सगळीकडे हरिच दिसतो. गायी-गुरांमध्ये हरि, मुंगीमध्ये हरि, माणसांमध्येही हरिच दिसतो. आकाशामध्ये हरि, भूमीमध्ये हरि, सूर्य-चंद्रामध्ये हरि. आता माझी दृष्टी देवमय झाली आहे. मला सर्व जगात ईश्वर भरलेला दिसत आहे.
८ आ २. आत्मप्रचीती झाल्यावर संत एकाच ठिकाणी न रहाता जगभरात फिरून ज्ञान वाटतात ! : संतांनी एकदा ताक घुसळून ज्ञानाचे लोणी बाहेर काढल्यावर परत परत ताक घुसळण्यात वेळ कशाला फुकट घालवायचा ? ते काढलेले ज्ञानाचे लोणी जगाला वाटण्यासाठी भक्ताने बाहेर पडावे. सगुण मूर्तीतून बाहेर येऊन निर्गुणाचा अभ्यास करून जो पदवीधर होतो, त्यालाच देवप्रचीती, आत्मप्रचीती, गुरुप्रचीती आणि शास्त्रप्रचीती येते. कणसे आपटून त्यातील दाणे मिळाल्यावर उगाच पुनःपुन्हा आपटत कशाला रहायची ? देणे पदरात पडले की, भक्ती बस झाली. त्यानंतर संत जगात फिरत ज्ञान वाटत राहिले. ते कधी एकाच ठिकाणी राहिले नाहीत.
९. संतांच्या अस्तित्वाचा परिणाम
९ अ. संतांमुळे समाज सुखी होतो ! : कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– पू. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)