१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
प्रकरण ७ : पोथीतील तिथी, वार, नक्षत्र, वर्षाचे आणि पंचांगातील संदर्भ – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/471026.html |
प्रकरण ८ : नाडी ग्रंथ भविष्य आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत
नाडी ग्रंथ या विषयावर पंचवीस वर्षात प्रस्तुत लेखकाचे अनेक अंगांनी लेखन आले आहे. वेगवेगळ्या यातून नोंदले गेलेले आहे. नाडी ग्रंथ हे प्राचीन काळच्या महर्षींनी सध्याच्या काळातील व्यक्तींना उद्देशून केलेले एक भविष्यकथन आहे. हे बघ अत्यंत वैयक्तिक किंवा खाजगी असल्यामुळे त्याचा बोलबाला, नोंद ठेवली जात नाही किंवा मुद्दाम टाळली जाते. ते इतके खाजगी असते की बऱ्याचदा पतीने / पत्नीने नाडी भविष्य पाहिले आहे, हे परस्परांना माहीत नसते. मुलांच्या करता आईवडिलांनी त्यांचे भविष्य पाहिलेले आहे हे त्या मुलांना माहिती नसते. कदाचित थोडेसे माहिती असले तरी त्यात काय म्हटले गेलेले होते याचा थोडा देखील पुरावा किंवा माहिती लिहून ठेवलेली नसते. असे दिसून येते की कुठल्याही मोठ्या लेखकाने, मोठ्या व्यक्तीने आपल्या आत्मचरित्रात किंवा अन्य लेखनात नाडीग्रंथ पाहिल्याचा उल्लेख केला गेलेला नसतो. आज सुद्धा असे कित्येक प्रतिथयश म्हणून मान्यवर आहेत, सिनेमा क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती, काही क्रिकेटर, नामी राजकारणी लोक, व्यापारी किंवा व्यावसायिक उद्योगपती अशा लोकांनी नााडी भविष्य पाहिलेले असते, त्यात सुचवले गेलेले उपायही त्यांनी केलेले असतात. त्यांना योग्य ते फळ ही मिळालेले असते परंतु अशा गोष्टींचा उल्लेख केलेला त्यांना मान्य नसतो किंवा त्याबद्दल गोपनीयता ठेवलेली बरी असे वाटून त्या नाडी भविष्य कथनांचा उल्लेख कुठल्याही लेखनातून, बोलण्यातून, चर्चेतून त्यांनी नाडी ग्रंथ भविष्याचेे अवलोकन केले आहे असा उल्लेख आवर्जून टाळला जातो. उदाहरणार्थ, सिनेक्षेत्रातील नामवंत संजय दत्त. त्यांनी नाडी भविष्य पाहिले आहे असे फारसे कुठे म्हटलेले नाही. परंतु वैदीईश्वरन कोविल गावामधील नाडीग्रंथ केंद्रामध्ये त्यांचे नाडीवाचकांबरोबर काढलेल्या फोटोंना टांगलेले पाहायला मिळतात. तीच गोष्ट भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या फोटोची. ते कुठेही असं म्हणत नाहीत की मी नाडी ग्रंथ भविष्य पाहिलेे. परंतु जर खाजगीत त्यांना भेटून खोदून खोदून विचारले गेले तर ते नक्कीच पाहिले होते असे मान्य करतीलही. परंतु त्यात सुचवली गेलेली शांती-पुजा केली का? किती कथने बरोबर आली याबद्दलची चर्चा करण्यास असे लोक उत्सुक नसतात. याचे एक महत्त्वाचे कारण असे की आपल्या जीवनामधील काही घटनांचा बद्दलचे उल्लेख त्यांच्या संबंधितांना, मित्रगणांना किंवा अन्य विरोधकांना माहिती झाले तर ते त्यांच्या जीवनामध्ये काही अनावश्यक गुंतागुंत निर्माण करतील असे वाटून त्याबद्दल न बोललेले असे म्हणून ते झाकून ठेवले जाते. अर्थात आजकाल असे बरेच लोक आहेत की ते याची पर्वा न करता आपल्या लेखनामध्ये नाडी ग्रंथ पाहिले आवर्जून नोंद करतात. त्यातील कथनांवर टिप्पणी करतात. यावरून असे लक्षात येते की नाडी ग्रंथांचा उल्लेख हे वेगवेगळ्या लोकांच्या आत्मचरित्रात किंवा लेखनात का येत नसावा. गेल्या दोन-पाचशे वर्षांतील लेखनात कुठेही नाडीग्रंथांचा उल्लेख का येत नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत पोथीत अध्याय ५ मध्ये नाडीग्रंथांचा उल्लेख हा विशेषत्वाने लक्षात राहतो आणि या पोथीमध्ये घटनांचा प्रवाह त्यामुळे कसा बदलतो त्याचे ते ढळढळीत उदाहरण आहे.
त्या अध्यायात जेव्हा शंकर भट्ट तिरुपतीच्या आसपास खेडेगावात असताना एका नाभिक घरातील व्यक्तीला आपला वीस वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा तो हाच असे वाटून त्यांना घरी आणून आळेबळे तू आमचा हरवलेला मुलगा आहेस असे म्हणून त्यांच्यावर विविध तऱ्हेने ते मान्य करण्यासाठी दबाव आणतात. सून म्हणून मानलेल्या मुलीला ते तिचा नवरा आहे असे म्हणून सांगतात. तीही मान्य करते. दाढीमिशांचे मुंडण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील बदलले जाते. ‘आपण म्हणता तो (तुमचा मुलगा) मी नाही असे बऱ्याचदा सांगून देखील त्यांचे म्हणणे मान्य केले जात नाही आणि नाईलाजाने शंकर भट्टांना तेथे राहणे भाग पडते. त्या घरच्या लोकांनी केलेल्या मांत्रिक-तांत्रिक कारवायांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागतो. त्या मुलीला मी तुझा नवरा नाही असे कळवळून सांगत असले तरी तिला ते मान्य करणे अवघड जाते. ती म्हणते, ‘माझे लग्न झाले त्यावेळेस मी फक्त दोन वर्षांची होते. मला माझा पती कोण हेही माहित नव्हते. परंतु ह्या घरच्यांनी मला तुम्हीच माझे पती आहात असे म्हटले तर ते मला मान्य होईल. या सर्वातून सुटका करणे सर्वस्वी अशक्य अशी परिस्थिती असताना, ज्या श्रीपाद श्रीवल्लभ ह्या व्यक्तीला भेटायची अत्यंतिक इच्छा असूनही भेटणे होणार नाही म्हणून निराश झालेल्या शंकर भट्टांना अचानक नाडी ग्रंथ वाचन मदतीला येते. एक नाडीवाचक तिथे त्या कुटुंबियांना घरी कवड्यांचे दानटाकून त्याच्या जवळच्या ताडपट्टीवर लिहिलेले भविष्य कथन करतो आणि सांगतो की हा व्यक्ती तुमचा मुलगा नाही. याचे नाव शंकर भट्ट असून तो श्रीपाद श्रीवल्लभ व्यक्तीच्या शोधात चाललेला आहे. पुढील काळात त्याच्या हातून श्रीपादवल्लभ चरितामृत पोथीचे लेखन होणार असेल. तुम्ही ज्या मुलाच्या शोधात आहात तो उद्या सकाळी घरी परतेल. या भविष्यकथनाचा प्रत्यय लगेच दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबियांचा वीस वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला मुलाचा परत घरी येतो. ही श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे असे समजून शंकर भट्ट आपला पुढील प्रवास सुरू ठेवतात.
नाडी ग्रंथ भविष्याची कथन व त्यातून निर्माण होणार्या घटना यांचे आणखी एक उदाहरण म्हणजे आशुतोष नावाचे एक बंगाली ब्राह्मण ग्रहस्थ श्रीपादांच्या दर्शनासाठी दूरवरून आपल्या नाडी ग्रंथांसह येतात. अध्याय ६.४१ (निठुरकर प्रत) मधे श्रींच्या जन्मरहस्याच्या बाबत उल्लेख तिरुमलदासांच्या शंकर भट्टांशी झालेल्या संवादातून येतो. तो असा , “… नाडीग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना (बगलामुखी देवतेच्या शोधात आलेल्या आशुतोषांनी दुष्ट नरसावधानींसमोर केल्याने) विचलित करत होते. नाडी ग्रंथ हा मूलतः अविश्वसनीय ग्रंथ आहे….”
तेच कथन गोपालबाबा प्रतीत अ ६ पान ४४ वर …. असे येते. “…त्यातील कथनातून सिंधू वेदांत सांगून श्रीपाद वल्लभांच्या जन्मकुंडलीचे रहस्य संबंधितांना सांगितले जाते. ‘एकदा पीठिकापुर गावातील नरसावधानी नामक कर्मठ ब्राह्मण आणि श्रीपादांचे आजोबा बापनालु यांच्या समावेत उपस्थित ब्रह्मवृंदात,’ उपनयनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे का? कि तो अन्य तीनही वर्णाश्रमांना पण लागू आहे? यावर चर्चा चालूू होती. आशुतोष यांनी बापन्नाचार्यांच्या बाजूने मत दिल्याने नरसावधीनी त्यांच्यावर भडकले.’ असल्या ‘बंगाली मासे खाऊन वर पवित्र म्हणवणाऱ्या ब्राह्मणाला’ काय विचारायचे निष्ठेचे नियम? म्हणून संभावना केली….”
बापन्नाचार्यांनी सभेेत निर्णय दिला, ‘ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य (माणसे म्हणून) समान आहेत, त्यामुळे ह्या तीनही वर्णांच्या लोकांनी उपनयन विधी करणे धर्म मान्य आहे. जर शूद्र नियम निष्ठेने धर्माचरण करीत असतील तर त्यांना देखिल उपनयनाचा अधिकार देता येईल’. त्याकाळातील हा निर्णय खरोखरच साहसी होता. ह्या निर्णयाच्या वेळी घडलेल्या वादावादीत बालक श्रींनी आधी प्रेक्षकाची भूमिका घेतली. पण नरसावधानींना आपण बगलामुखीचे मोठे उपासक असल्याचा दंभ अथवा गर्व झाला होता. त्याभरात श्रीपाद खरोखरच अवतारधारी आहे का? याबद्दल शंका उपस्थित केली. नंतर श्रींंनी आपल्या पद्धतीने कसा यावर उपाय काढला. तो भाग रंजक आहे. आशुतोष नामक बंगाली ब्राह्मण नाडीग्रंथांच्या पट्ट्यातून आश्चर्यकारक भविष्य कथन करत असत. त्यांना बगलामुखीचे दर्शन हवे होते म्हणून ते (कदाचित नाडीग्रंथातील आदेशानुसार पीठिकापुरात नरसावधानींना भेटायला) आले असावेत. पण नरसावधानींच्या म्हणण्याला नाकारून आशुतोष वाकड्यात गेल्यावर बापन्नाचार्यांना भेटायला ते त्यांच्या घरी गेले. तिथे श्रीपादांनी आशुतोषना स्वतः च्या रुपात बगलामुखीचे दर्शन घडवले. शिवाय त्यांना पेंचलकोन या कण्व महर्षींच्या तपोभूमीला जाऊन साधना करायला सांगितले. निघताना श्रीपाद त्यांना म्हणाले, ‘मी पुन्हा महाराष्ट्रात कण्वमुनींच्या वाजसेनिय शाखेत अवतरेल, त्या अवतारात मी तुझ्यावर अनुग्रह करीन. त्यावेळी तू माझा पट्टशिष्य होशील व माझ्या अद्भूतलीलांचा प्रत्यक्ष अनुभव घेशील. आता तू नीघ’. या वरून नाडी भविष्य बंगाल राज्यातील भागात सुद्धा प्रचलित होते. हे नक्की होते.
नाडीग्रंथांचा आणखी एक ओझरता उल्लेख अध्याय १९ मध्ये येतो. अध्याय १९.१५० वर आणखी काही कारणांनी देखील थोडासा वेगळा आहे. “… नाडी ज्योतिषातील भविष्याप्रमाणे तो पीठिकापुरला येऊन माझा अनुग्रह मिळवील. धर्मबद्ध वंशातील पुण्यवान व्यक्ती भारताची स्वामी होणार…” सध्याच्या परिस्थितीत (सन २०१८) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांना संपूर्ण जगात एक चारित्र्यवान, धडाडीचे निर्णय घेणारे, निस्वार्थी राष्ट्रीय नेता म्हणून गौरवले जात आहेत, ज्यांना राजर्षी असे काही ठिकाणी संबोधन दिले गेले आहे, ते या अध्यायातील ‘आर्य वंशीय पुण्यवान व्यक्ती भारताची स्वामी होणार’ हे पुढील काळाबाबतच्या भविष्यकथनाचे वर्णन अन्य पंतप्रधानांच्या तुलनेत त्यांच्याकरिता समर्पक वाटते.
एकामधून दुसरे कथानक सादर-
बालपणी अरेबियन नाईट्स मधील सुरस गोष्टी ऐकताना, वाचताना एका कथेतील पात्र दुसरी गोष्ट उलगडते त्यातून पुढच्या गोष्टीला वाट मिळते ह्या तंत्राचे नवल वाटायचे. पोथीच्या कथनातून त्याचा प्रत्यय वेगवेगळ्या अध्यायातून येतो. तो १९ व्या अध्यायात कसा मिळतो ते पाहू.
वल्लभेश, पत्नी, सासरे सुब्बण्णा व शंकर भट्ट एकत्रित बोलतातना>लिंगण्णा>त्यांचे आजोबा>वाटेत अवधूत>अंबा देणारा शेतकरी >वेद पंडित गणपती शास्त्री>काकिनाड्यापाशी शेतात श्रींच्या भेट> वेंकटपैय्या श्रेष्ठींचा विश्वदर्शन> श्रींची वाणी नाडीग्रंथातील भविष्यकथनाप्रमाणे एक पुण्यवान व्यक्ती भारताची स्वामी होणार>माणिकप्रभूंचे वंशज अर्थिक मदत करून पीठिकापुरच्या संस्थानाला मदत करणार…या गोष्टी एकात एक करून कथानकातून कशा सादर होतात ते पहा….
कुरवपुरात जिथे आलेल्या पाहुण्यांची सोय केली जात असे त्या ठिकाणी एकदा वल्लभेष शर्मा, (ज्याला नंतरच्या काळात श्रींच्या अवतार गमनानंतर तो वाटसरूंच्या कडून हत्या झालेला असताना वाचवले जाते) त्याची पत्नी, सुब्बण्णा शास्त्री यांच्यात गप्पावजा चर्चा सुरवात असताना लिंगण्णा शास्त्री नामक सुब्बण्णाशास्त्रींचे दूरस्थ नातलग भेटायला येतात. ते आपल्याला आधीच्या जीवनातील आलेले दारुण अनुभव सांगायला सुरवात करतात. त्यांच्या आजोबांपासून जे धार्मिक कार्य करायला पादगयेला येत त्यांना शास्त्रोक्त कर्मकांडातील अडचणी काढून ते अनावश्यक खर्च वाढवत. पण पूजा-अर्चेत काटछाट करून थातूरमातूर करून संपवत. कोणी जाब विचारलाच तर वाद घालत. असे गैरवर्तन करून ते, नंतर माझे वडीलही तसेच वागत. मला त्यांच्या वागणुकीत गैर वाटून मी तसे न करता सचोटीने श्राद्धकमे वाजवी खर्चात करत असे.
उतारवयात एकाएकी माझ्या जीवनात कलह निर्माण झाले. पत्नी माहेरी गेली. सुनांनी मला घरात राहणे अशक्य केले. मुलगा गळा दाबून मारायला धावला. मुली-जावयांच्या घरी आलो तर त्यांनी नोकरांची कामे करायला लावली. उरलेले, उष्टे, किडे पडलेले जेवण देऊन गोठ्यात कामे करवून राहायला लावले. अशा अवस्थेत असताना एक अवधूत येऊन त्याच्यामुळे मी तिथून सटकलो…. मग पीठिकापुरात जायच्या वाटेवर एक गणपती शास्त्री नामक वेदांती ब्राह्मण त्यांना वायसपूर म्हणजे सध्याचे काकीनाडा भागातील एका शेतात ते गुरूंच्या आश्रमातील गुरे चरावयाला गेले असता घडलेला प्रकार सांगतात. ते (गणपती शास्त्री) म्हणाले, ‘पीठिकापुरातील वेंकटपय्या श्रेष्ठी या भागातील त्यांच्या इस्टेटीची पहाण्यासाठी अधूनमधून घोडागाडीतून येत, असेच ते आले असताना मी त्यांना पाहिले. त्या दिवशी श्रीपादवल्लभ सुद्धा त्यांच्या बरोबर होते. (तो मुलगेलासा व्यक्ती श्रीपाद आहेत हे गणपती शास्त्रींना त्यांच्या आधीच्या भेटीमुळे माहिती होते) त्या वेळी अदभूत घटना घडल्या. तिथे लहान मुलगी आणि मुलगा खेळत होते. एकदा मुलाने मी राखत असलेल्या कळपातील वांझ गाईला ‘मला भूक लागली आहे’ म्हणताच गाईच्या आचळातून दुग्धधारा आल्या. नंतर एका अंब्याच्या झाडाला लटकलेला बिन मौसमी एक अंबा तोडून, तो पिकलेला करून वेंकटपय्यांना खायला दिला. हे दृष्य पाहून वेंकटपय्या श्रेष्ठींचा श्रद्धा भाव जागृत झाला. तेवढ्यात आपापल्यात खेळणारी बालके अदृश्य झाली. त्यांच्यातील नंतर झालेले संवाद मी ऐकू शकलो. तेंव्हा ते गदगदून म्हणाले, ‘बेटा, सोन्या आमच्या गोत्रजांवर, वंशावर, समस्त आर्यकुलावर तुझा अखंड अनुग्रह राहू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना!’ त्या वेळी श्रींनी, जे उद्गार काढले ते असे की भविष्यात धर्मबद्ध (आर्यवंशी) भारताचा राजा (स्वामी) होईल. नाडी ज्योतिषातील कथनाप्रमाणे तो पीठिकापुरात येऊन माझा अनुग्रह मिळवील’….
हे कथन गणपती शास्त्रींनी लिंगण्णा शास्त्री यांच्यासमवेत चालत जात असताना केले. नंतर पीठिकापुरात पोहोचल्यावर लिंगण्णांची भेट श्रींशी झाली आणि आपल्या पश्चात आपले श्राद्ध कोण करील या चिंतेतून निर्माण झालेल्या अनेक शारीरिक व मानसिक छळातून सुटका केली. त्यानंतर बर्याच वर्षांनी लिंगण्णा शास्त्री श्रींच्या दर्शनासाठी पीठिकापुरहून कुरवपुरात आले असताना तिथे घडलेल्या घटना आठवून सांगते झाले. या चर्चेनंतर श्रीपाद कृष्णा नदी पाण्यावरून चालत येऊन जेंव्हा भास्कर बंड (मोठ्या दगडावर) एकदम त्या वेळी उत्पन्न होणाऱ्या व्याघ्रचर्म बैठकवर स्थानापन्न झाल्यावर म्हणाले, ‘ वा! वेंकटपय्या, माझ्या बद्दल बरीच चर्चा रंगली होती वाटते?’
विविध अध्यायातील नाडी ग्रंथांचा उल्लेख इतक्या सूक्ष्मपणे आल्याचे प्रस्तूत लेखकाला गेली २५ वर्षे नाडीग्रंथ भविष्य विषयावर सखोल अभ्यासकार्य करून प्रथमच निदर्शनास आले. मात्र पोथीत काही गोष्टींचा खुलासा होत नाही. याचे कारण कदाचित नाडीग्रंथ भविष्यातील कथनांवर विविधांगी भाष्य करणे चरित्रलेखकाला आणि चरित्र नायकाला अपेक्षित नसावे.
१. नाडी ग्रंथ कुठल्या महर्षींनी लिहिले होते? ते कुठल्या भाषेत लिहिलेले होते? त्याची लिपी कोणती होती?
२. नाडीग्रंथ पाहण्याची पद्धत काय होती? या नाडी ग्रंथांमधून काही शांती-दीक्षा करण्यासारखे काही आदेश दिले गेले होते का?
३. नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी केंद्रांची स्थापना काही महत्त्वाच्या गावातून झाली होती का? काही नाडी वाचक त्या बरोबर घेऊन गावोगावी फिरणारे काही नाडी वाचक लोक होते का? या काही बाबींवर प्रकाश पडत नाही.
असे असूनसुद्धा नाडी ग्रंथांबद्दलची माहिती आणि त्या ग्रंथांमधून कथन केलेल्या भविष्य कथनामुळे संबंधित व्यक्तींच्या जीवनामध्ये काय बदल झाले? त्यांची समस्या कशी निवारण झाली यावर प्रकाश पडतो. हेही नसे थोडके!
नाडीग्रंथ भविष्य कथने आजकालच्या संदर्भात पाहता येणे शक्य आहे का? असेल तर कुठे जावे? वगैरे प्रश्नांची उत्तरे प्रस्तूत लेखकाने लिहिलेल्या पुस्तकातून, ब्लॉग्स, वेबसाईट, यू ट्यूब क्लिप्स मधून शोधता येतील.
प्रकरण ९ : दत्त संप्रदायातील पहिल्या तीन महाभागांची पोथी रुपाने मांडणी – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/471057.html |