श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जानेवारी २०१८ आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये केलेला श्रीलंकेचा दौरा अन् श्रीरामसेतूचे दर्शन घेतांना अनुभवलेली प्रभु श्रीरामाची लीला !

‘श्रीलंका म्हटले की, आपल्याला ‘रामायणा’चीच आठवण येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आम्हा साधकांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत जानेवारी २०१८ मध्ये श्रीलंकेला जाण्याचे भाग्य लाभले. या एक मासाच्या दौर्‍यात आम्हाला श्रीलंकेतील श्रीराम, सीता, हनुमंत आणि रावण यांच्याशी संबंधित अशा अनेक स्थानांना भेट देता आली; मात्र काही कारणांनी रामसेतूला जाता आले नाही. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये आम्हाला पुन्हा १५ दिवसांसाठी श्रीलंकेला जाण्याचा योग आला. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘या वेळी श्रीरामसेतूचे दर्शन करूया.’’ त्यानंतर त्या दिशेने आमचे प्रयत्न चालू झाले. या वेळी आम्हाला रामसेतूला जाता आले. या दैवी प्रवासात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या पावन चरणांचा स्पर्श झालेल्या रामसेतूचे अत्यंत भावपूर्ण दर्शन घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ

१. जानेवारी २०१८ मध्ये पहिल्यांदा केलेला श्रीलंकेचा दौरा

१ अ. ‘नगुलेश्‍वरम्’ येथील प्राचीन शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे : जानेवारी २०१८ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीलंकेच्या दौर्‍यावर असतांना श्रीलंकेतील प्रसिद्ध शिवमंदिर ‘नगुलेश्‍वरम्’ येथे त्या देवदर्शनासाठी गेल्या होत्या. हे प्राचीन शिवमंदिर ५ सहस्र वर्षांपूर्वीचे आहे. प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाने या मंदिरात पूजा केली आहे. काही मासांपूर्वी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक केला होता.

१ आ. श्रीलंकेतील एका प्रतिष्ठित व्यक्तींशी झालेली भेट !

१ आ १. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंदिराच्या पुजार्‍यांची मुलाखत घेणे, त्या वेळी तेथे असलेल्या श्रीलंकेतील एका प्रतिष्ठित व्यक्तीने त्यांना ‘तुम्ही कोण आहात ?’, असे विचारणे आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आम्ही रामसेवक आहोत’, असे सांगणे : या मंदिरात गेल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंदिराच्या पुजार्‍यांची मुलाखत घेतली. या वेळी श्रीलंकेतील काही प्रतिष्ठित व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. त्यातील एक व्यक्ति श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणाले, ‘‘तुम्ही कोण आहात ?’’ त्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘आम्ही भारतातून आलो आहोत. आम्ही श्रीरामाचे सेवक आहोत आणि श्रीरामाशी संबंधित स्थानांना भेट द्यायला आलो आहोत. भारतात आमचा एक आश्रम आहे. त्या आश्रमात आम्ही सेवेकरी आहोत.’’

१ आ २. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून प्रतिकिष्ठत व्यक्तींना ‘या कुणी दैवी स्त्री आहेत’, असे जाणवणे आणि त्यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांच्या कार्यालयात येण्याचे आमंत्रण देणे : ते प्रतिष्ठित व्यक्ती म्हणाले, ‘‘मी बौद्ध आहे; पण मला हिंदु धर्माविषयी जवळीक वाटते. मी सर्व हिंदू मंदिरांना भेट देतो. मंदिरांत काही साहाय्य लागल्यास मी साहाय्यही करतो. तुम्हाला पाहून ‘तुम्ही कुणीतरी दैवी स्त्री आहात’, असे मला वाटले. मी तुमच्याकडे आपोआप आकर्षिला गेलो.’’ त्या वेळी आम्ही ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘संत’ आहेत’, असे त्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘माताजी, तुम्ही उद्या आमच्या कार्यालयात यावे. आम्हाला आशीर्वाद मिळेल.’’

१ आ ३. प्रतिष्ठित व्यक्तींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी ‘अध्यात्म अन् साधना यांवर चर्चा करणे, ‘श्रीलंकेत काही साहाय्य लागल्यास ते करू’, असे आश्‍वासन देणे आणि परततांना त्यांच्या आस्थापनाकडून त्यांना ‘स्मरण पदक’ प्रदान करणे : प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेल्या. त्यांनी त्यांच्याशी २ घंटे ‘अध्यात्म आणि साधना’ यांविषयी चर्चा केली. त्या वेळी तेथेे अन्य सहकारीही उपस्थित होते. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणाले, ‘‘माताजी, तुम्हाला कधीही कुठलेही साहाय्य लागले, तर मला संपर्क करा. श्रीलंकेत तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात, तेथे आम्ही शक्य ते सर्व साहाय्य करू.’’

आमचा हा दौरा संपत आल्याने या वेळी आम्हाला रामसेतूला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘पुढच्या वेळी रामसेतूला जाण्यासाठी तुमचे साहाय्य लागेल’, असे आम्ही त्यांना सांगितले. आम्ही तिथून निघतांना प्रतिष्ठित व्यक्तींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांच्या आस्थापनाकडून एक ‘स्मरण पदक’ प्रदान केले.

२. ऑक्टोबर २०१८ मध्ये दुसर्‍यांदा केलेला श्रीलंकेचा दौरा !

२ अ. रामसेतू दर्शनाची अनुमती मिळण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेले अनमोल साहाय्य ! : ऑक्टोबर २०१८ मध्ये आम्हाला पुन्हा श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाण्याची संधी लाभली. तेव्हा श्रीलंकेच्या बाजूला असलेल्या श्रीरामसेतूला जाण्यासाठी आम्ही कागदपत्रांची सिद्धता करायला आरंभ केला. या श्रीरामसेतूचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा २ – ३ कि.मी.चा भाग भूभागाशी संलग्न आहे, तर भारताच्या बाजूने असलेल्या रामसेतूचा बहुतांश भाग पाण्याखाली आहे. आम्ही आवश्यक ती कागदपत्रे श्रीलंकेतील भारतीय दूतावासात पाठवली; मात्र त्यांनी आम्हाला नकार दिला. त्यामुळे आम्ही श्रीलंकेच्या रक्षामंत्रालयाला निवेदन दिले. त्यांनी लगेचच आम्हाला होकार दिला. श्रीलंकेच्या रक्षा मंत्रालयालयात जाऊन रक्षासचिवांना निवेदन देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींनी आम्हाला सर्व साहाय्य केले.

२ आ. रामसेतू दर्शनाला जातांना आलेल्या अडचणी

२ आ १. समुद्रात वादळ आल्याने रामसेतूपर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होणे : रामसेतूला जाण्यासाठी आवश्यक अनुमती मिळूनही आम्हाला तिकडे जाता येत नव्हते; कारण त्या वेळी श्रीलंकेच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्रात वादळ आले होते. रामसेतूकडे जायला दोन मार्ग आहेत.

एक म्हणजे मच्छिमारांच्या बोटीतून जाणे आणि दुसरा मार्ग म्हणजे वाळू आणि पाणी यांतून ४ कि.मी.चे अंतर चालत जाणे. हे दोन्ही मार्ग कठीण आहेत. वादळ आल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्याची अनुमती नव्हती. वादळ असल्याने श्रीलंकेच्या नौदलाने धोक्याची सूचना (‘रेड अलर्ट’) दिली होती आणि ‘नागरिकांनी किनारपट्टीवर येऊ नये, आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली होती.

२ आ २. प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्याशी संबंधित असणार्‍या  अन्य व्यक्तींना सर्व साहाय्य करण्यास सांगणे, त्याप्रमाणे किनार्‍यावरील सर्व नौसैनिकांना सूचना दिल्या जाणे; पण नौदलाने ‘वादळ कमी झाल्याशिवाय किनार्‍यावर जाऊ देऊ शकत नाही’, असे सांगणे आणि आश्‍चर्य म्हणजे १ घंट्यातच वादळाचा जोर न्यून होऊन त्याने दिशा पालटणे : आम्ही प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क केला. त्यांनी संबंधित प्रमुखांना आम्हाला साहाय्य करण्यास सांगितले. किनारपट्टीवर १०० ते १५० ‘टेहळणी मनोरे’ (वॉच टॉवर्स) होते. प्रत्येक ‘टेहळणी मनोर्‍यामध्ये २ – ३ नौसैनिक होते. त्या सर्वांना सांगण्यात आले, ‘‘भारतातून एक ‘माताजी’ आल्या आहेत. त्या रामसेतूचे दर्शन घेऊन येईपर्यंत कुणीही त्यांना अडवू नये’’; मात्र नौदलाने आम्हाला सांगितले, ‘‘वादळ कमी होत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला किनार्‍यावर जाऊ देऊ शकत नाही.’’ गुरुदेवांच्या कृपेने १ घंट्यातच वादळाचा जोर न्यून होऊन त्याने त्याची दिशा पालटली ! जसे पुराणांमध्ये ऐकले होते, तसेच हे सर्व घडत होते.

खडतर प्रवास करून रामसेतूच्या दर्शनासाठी ‘टॅ्रक्टर ट्रॉली’मधून जातांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि त्यांच्या समवेत असणारे साधक अन् स्थानिक व्यक्ती

२ आ ३. रामसेतूच्या पहिल्या द्विपाला जाण्यासाठी वाळू आणि समुद्राचे पाणी यांतून ४ कि.मी. अंतर जावे लागणे अन् त्यासाठी तेथील मच्छिमारांनी ‘ट्रॅक्टर ट्रॉली’ उपलब्ध करून देणे : रामसेतू ३२ कि.मी. लांब आहे. आता मध्ये मध्ये समुद्राचे पाणी आल्याने हा सेतू सलग दिसत नाही, तर एका रांगेत १६ द्वीप असल्याप्रमाणे दिसतो. त्यातील ८ द्वीप भारतीय नौसेनेकडे आणि उर्वरित ८ द्वीप श्रीलंकेच्या नौसेनेकडे आहेत. श्रीलंकेच्या बाजूला असलेल्या श्रीरामसेतूच्या पहिल्या द्विपाला जाण्यासाठी वाळू आणि समुद्राचे पाणी यांतून जायला ४ कि.मी.चे अंतर चालून जावे लागते. तेथे आम्ही स्थानिक मच्छिमारांशी बोललो. बहुतांश मच्छिमार ख्रिस्ती होते. त्यांनी एका व्यक्तीला दूरभाष केला. त्याने त्याची ‘ट्रॅक्टर ट्रॉली’ आणली. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचे नाव ‘हनुमान’ होते !

२ आ ४. वादळ येऊन गेल्यामुळे पाऊस पडू लागणे, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आता रामसेतूकडे जाऊया, श्रीरामच आपल्याला घेऊन जाईल’, असे म्हणणे आणि त्याची प्रचीती येणे : गाडी जाऊ शकते, तेथपर्यंत आम्ही गाडीने प्रवास केला. तेथून पुढे आम्हाला रामसेतूपर्यंत ‘ट्रॅक्टर ट्रॉली’मधून जावे लागणार होते. नुकतेच वादळ येऊन गेल्यामुळे पाऊस पडायला लागला. पाऊस पडू लागल्यावर ‘पुढे कसे होईल ?’, असा विचार मनात आला. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आपण पुढे जाऊया. श्रीरामाच्या मनात आहे, तर तोच आपल्याला रामसेतूपर्यंत घेऊन  जाईल !’’ त्याप्रमाणे आम्ही सर्व जण ‘ट्रॅक्टर ट्रॉली’मध्ये बसून निघालो.

काही अंतर गेल्यावर आमच्या लक्षात आले, ‘रामसेतूचा परिसर सोडून अन्य सगळीकडे पाऊस पडत आहे.’ तेव्हा ‘हे सर्व श्रीरामाचे नियोजन आहे’, असे आमच्या लक्षात आले.

२ इ. अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा केल्यानंतर वाळूमध्ये ‘श्रीराम’ हे अक्षर लिहितांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ

२ इ १. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र वाळूवर ठेवून त्याला उदबत्ती ओवाळून भावपूर्ण प्रार्थना करणे, तेव्हा क्षणार्धात समुद्राचे पाणी जवळ येऊन त्याने छायाचित्राला स्पर्श करणे : त्यानंतर ‘टॅ्रक्टर ट्रॉली’ थांबली, तेथून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ काही अंतर चालत गेल्या. एके ठिकाणी वाळूवर त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले आणि त्याला उदबत्तीने ओवाळून दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. तेव्हा १०० फूट दूर असलेले समुद्राचे पाणी अकस्मात् गुरुदेवांच्या छायाचित्रापर्यंत आले. गुरुदेवांचे छायाचित्र आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या होत्या, तेवढाच परिसर समुद्राच्या पाण्याने ओला झाला. हे सर्व क्षणार्धात घडले. एवढ्या मोठ्या किनारपट्टीवर अन्यत्र कुठेही असे समुद्राचे पाणी आत आल्याच्या खुणा नव्हत्या. जणू काही समुद्रदेवच गुरुदेवांना स्पर्श करण्यासाठी आतुर झाल्यासारखा त्यांच्या जवळ आला होता !

रामसेतूच्या दर्शनाला गेल्यानंतर समुद्राच्या लाटांपासून दूर असूनही एका लाटेने अचानक पुढे येत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांना स्पर्श केला, जणू समुद्रदेवतेनेच चरणस्पर्श केले !

२ इ २. श्री. विनायक शानभाग यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाकून नमस्कार करणे, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्यांना सचैल स्नान घालणे : यानंतर  मी समुद्राकडे पाहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला वाकून नमस्कार केला. मी वाकून नमस्कार केला, तेव्हाही क्षणार्धात समुद्राचे पाणी आले आणि मी चिंब भिजलो. ‘काही क्षणांसाठी काय घडले ?’, हेच मला कळले नाही. नंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि गुरुदेव यांच्याविषयी भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त झाली. मला तो समुद्रदेवतेचा आशीर्वादच वाटला ! जय श्रीराम !

रामसेतू येथील दैवी वाळू हातात घेतलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ
श्री. विनायक शानभाग

२ इ ३. काही मच्छिमारांनी स्वतःहून येऊन दुसर्‍या आणि तिसर्‍या द्विपातील रामसेतूची वाळू अन् वनस्पती आणून देणे : नंतर आम्ही श्रीरामसेतूवर काही अंतर चालत गेलो. तेथे छायाचित्र काढले आणि चित्रीकरणही केले. काही वेळाने ४ मच्छिमार एका बोटीतून आमच्याकडे येतांना दिसले. ते मच्छिमार आमच्या जवळ आले आणि त्यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले, ‘‘माताजी, आम्ही श्रीरामसेतूच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या द्विपातून वाळू अन् तेथील वनस्पती आणली आहे.’’ हे ऐकून आम्हा सर्वांना पुष्कळ आश्‍चर्य वाटले. ‘त्यांना तिकडे जाण्याची अनुमती तरी कशी मिळाली ?’ याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही नौसेनेच्या अधिकार्‍यांना तोंडी निवेदन करून दुसर्‍या आणि तिसर्‍या द्विपावर जाऊन आलो.’’

‘अशा सर्व कठीण परिस्थितीत रामसेतू येथे जाता येणे आणि तेथे सर्व प्रकारचे साहाय्य मिळणे’, ही सर्व श्रीरामाची लीलाच आहे’, असे आम्हा साधकांना जाणवले. रामराज्यासम असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा परात्पर गुरुदेवांचा संकल्प आहे. आम्हाला कठीण काळातही घडलेले श्रीरामसेतूचे दर्शन आणि तेथे आलेल्या अनेक बुद्धीअगम्य अनुभूती हा प्रभु श्रीरामाचा गुरुदेवांच्या कार्याला लाभलेला आशीर्वादच आहे ! ‘प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद असेच सदैव आपल्या पाठीशी रहावेत’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना आहे ! जय श्रीराम !’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (६.४.२०२१)

भारत आणि श्रीलंका या दोन राष्ट्रांना जोडणार्‍या रामसेतूचा इतिहास

रामसेतू

१. चेन्नई येथील रामसेतूचे अभ्यासक प्रा. कल्याणरामन् यांनी कथन केलेली रामसेतूविषयीची सूत्रे

१ अ. ‘रामसेतू’ हे भारताचे पहिले राष्ट्रीय स्मारक असणे, हा सेतू श्रीरामाच्या वानरसैन्यातील ‘नल’ नावाच्या अभियंत्याने निर्माण केला असल्यामुळे पूर्वी त्याला ‘नलसेतू’, म्हटले जाणे : श्रीरामसेतू हा भारत आणि श्रीलंका या दोन राष्ट्रांना जोडणारा मानवनिर्मित सेतू आहे. त्याचा उल्लेख आदी कवी वाल्मीकि महर्षि यांनी लिहिलेल्या ‘रामायणा’मध्ये आहे. रामसेतूची कथा सर्व हिंदूंना ज्ञात आहे. चेन्नई येथील रामसेतूचे अभ्यासक प्रा. कल्याणरामन् यांनी अत्यंत परिश्रम घेऊन रामसेतूवर अभ्यास केला आहे. ते म्हणतात, ‘रामसेतू हे भारताचे पहिले राष्ट्रीय स्मारक आहे. रामसेतू आपल्या संस्कृतीशी आणि भारत राष्ट्राशी संबंधित आहे. रामसेतूचे खरे नाव ‘नलसेतू’ आहे; कारण ‘नल’ नावाच्या ‘अभियंता’ वानराने या सेतूची निर्मिती केली होती.

१ आ. ‘रामसेतू कधीही नष्ट होऊ नये’; म्हणून हनुमंताने सेतूच्या मध्यभागी ‘हनुमान यंत्र’ स्थापन करणे, त्यामुळे याला ‘हनुमानसेतू’, असेही म्हटले जाणे : पुढे श्रीरामावतार संपल्यावर हनुमंताने ‘श्रीरामाशी संबंधित असलेली ही मुख्य खूण कधीही नष्ट होऊ नये’; म्हणून रामसेतूच्या मध्यभागी ‘हनुमान यंत्रा’ची स्थापना केली. तेव्हापासून या सेतूला ‘हनुमानसेतू’ असेही नाव पडले.’

२. कलियुगात या सेतूला ‘रामसेतू’ असे म्हटले जाते.

३. ३ कि.मी. रुंदी आणि ३२ कि.मी. लांबी असलेला खरा रामसेतू ९ फूट पाण्याखाली असणे

नलाने या सेतूची निर्मिती केली. तेव्हा याची रुंदी ३ कि.मी. आणि लांबी ३२ कि.मी. होती. आता लाखो वर्षे झाल्यानंतर आणि वैश्‍विक समुद्रपातळी वाढल्याने खरा रामसेतू पाण्याखाली गेला अन् त्यावर समुद्राच्या वाळूचा थर जमा होत गेला. या वाळूच्या थरालाच आपण रामसेतू समजतो; मात्र खरा सेतू ९ फूट पाण्याखाली आहे.

४. सेतूचा भारताच्या बाजूचा आरंभ (टोक) म्हणजे ‘धनुष्यकोडी’ हे गाव आणि श्रीलंकेकडचे शेवटचे टोक म्हणजे ‘तलैमन्नार’ गाव होय !’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (६.४.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक