प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून पुढाकार का घेत नाही ? असे प्रशासन जनतेसाठी आहे का ?, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
सातारा, ८ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजना करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी ग्रामसुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली; मात्र काही गावांचा अपवाद वगळता बहुतांश गावात या समित्या निष्क्रीय झाल्याचे चित्र अनुभवास येत आहे. त्यामुळे गावागावातील कोरोनाविषयी आवश्यक उपाययोजना राबवल्या जात नसल्याने प्रशासनाने पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी गतवर्षी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली होती. सरपंच हे समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी अन् गावातील काही व्यक्ती यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार गतवर्षी कोरोना काळात या समित्यांनी चांगली कार्यवाही केली. याची नोंद घेऊन शासनाने समित्यांना दंड करण्याचे, पोलीस कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केले. त्यानुसार समित्यांनी दंड आणि पोलीस कारवाई केली. त्यामुळे गावागावात समित्यांचा चांगलाच धाक बसला होता. नंतर कोरोनाचे प्रमाण अल्प झाल्याने ग्रामसुरक्षा समित्यांना मरगळ आली. त्यातच ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने गावकारभारी पालटले. आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून एकीकडे बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे, तर दुसरीकडे ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याचे पहायला मिळत आहे.
परराज्यातून, परजिल्ह्यातून येणार्या नागरिकांवर म्हणावे तसे लक्ष ठेवले जात नाही. आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका कार्यरत असल्याने ग्रामसुरक्षा समित्यांचे पदाधिकारी निवांत आहेत; परंतु ग्रामसुरक्षा समित्यांच्या पदाधिकार्यांनी कोरोनाचा धोका ओळखून मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.