हरिद्वार, ६ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्र केवळ बळाच्या नव्हे, तर धर्माच्या आधारे स्थापन होणार आहे, असे प्रतिपादन हरिपूर कला येथील शौनक कुटीर आश्रमाचे स्वामी अभयनंद महाराज यांचे शिष्य स्वामी अनंतानंद सरस्वती यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी अभयनंद महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी अनंतानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्वामी अनंतानंद यांनी ‘तुम्ही स्वार्थीपणा सोडून राष्ट्रासाठी एकत्रितपणे कार्य करत आहात, ते अनुकरणीय आहे’, असेही म्हटले.
या वेळी श्री. घनवट यांनी कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील चित्रमय फलक प्रदर्शन असलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही स्वामी अभयनंद महाराज आणि स्वामी अनंतानंद सरस्वती यांना देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री राजेश उमराणी आणि हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते. स्वामी अभयनंद यांच्याकडून समाजात धर्मशिक्षण देऊन धर्मानुसार आचरण करण्यासाठीचे कार्य केले जात आहे.
अन्य संपर्क
मऊ येथील श्री ब्रजधाम उदासीन आश्रमाचे श्री प्रज्ञानंद स्वामी यांचीही भेट घेण्यात आली. या वेळी स्वामीजींना समितीच्या कार्याची माहिती देऊन प्रदर्शनाला भेट देण्याविषयीचे निमंत्रण देण्यात आले.