सांगली, २७ मार्च (वार्ता.) – विशाळगडाच्या संदर्भात कृती समिती देत असलेला लढा अत्यंत स्तुत्य आहे. या विषयाच्या संदर्भात मी अवगत होतो; मात्र कृती समितीने सर्व कागदपत्रांच्या आधारे पुराव्यानिशीच या विषयाला वाचा फोडली आहे, हे विशेष आहे. हा विषय तडीस लागेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू, असे आश्वासक उद्गार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र-छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. भिडेगुरुजी यांची २६ मार्च या दिवशी भेट घेऊन त्यांना विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्या वेळी त्यांनी हे उद्गार काढले.
या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे सदस्य श्री. प्रमोद सावंत, समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. संतोष देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सचिन पवार उपस्थित होते. या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करून ‘या कार्याची आवश्यकता आहे. समाजात तुम्ही करत असलेली जागृती अत्यावश्यक आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा कोणत्याही साहाय्याची आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या समवेत आहे’, असे सांगितले.
सध्या देशात परखड लिखाण करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक ! – पू. भिडेगुरुजी
सध्या देशात परखड लिखाण करणारे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे, दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे. मी बैठका, तसेच विविध कार्यक्रम यांमधून ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचा’, असे नेहमी सांगतो.