तहसीलदाराने भ्रष्ट कमाई लपवण्यासाठी जाळल्या १५ ते २० लाखांच्या नोटा !

राजस्थान येथील धक्कादायक घटना !

एका तहसीलदाराकडे लाखो रुपयांच्या नोटा मिळतात, यावरून प्रशासन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !

सिरोही (राजस्थान) – येथील पिंडवाडा तालुक्यातील भूमी अभिलेख निरीक्षक असणार्‍या परतब सिंह यांना १ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंध खात्याने रंगेहाथ अटक केली. याच प्रकरणात तहसीलदार कल्पेशकुमार जैन यांना अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे पथक त्यांच्या घरी पोचले असता त्यांनी  स्वतःला घरात कोंडून घेतले आणि १५ ते २० लाख रुपये किमतीच्या नोटा स्टोव्हवर जाळल्या. एका कंत्राटदाराकडून सरकारी कंत्राट देण्याच्या नावाखाली कल्पेश जैन यांनी लाच मागितल्याचा खुलासा त्यांच्याच कार्यालयामध्ये काम करणार्‍या परबत सिंह यांनी  केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे महासंचालक बी.एल्. सोनी यांनी दिली.