(म्हणे) ‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार !’ – असदुद्दीन ओवैसी यांची भाजपवर टीका

गेल्या ७४ वर्षांत भारतातील हिंदूंना त्यांचा गौरवशाली इतिहास दडपून टाकून मोगलांचा उदो उदो करणारा इतिहास शिकवला जात होता. आता जर सरकार त्यात पालट करून हिंदूंना त्यांचा खरा इतिहास शिकवत असेल, तर ओवैसी यांच्यासारखे थयथयाट करणारच !  

असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – भाजप नव्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हिंदुत्वाची विचारधारा आणू पहात आहे. पाठ्यपुस्तकात धार्मिक ग्रंथांचा, संस्कृतीचा अभ्यास असावा; पण त्याची मोडतोड होता कामा नये. इस्लामी इतिहास संपवणे, वर्ष १८७५ च्या स्वातंत्र्यसंग्रामापूर्वीचा अभ्यासक्रम पुसून टाकणे, दलित राजकारण आणि बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, नेहरू आणि पटेल यांच्यावरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप  एम्.आय.एम्. प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (‘युजीसी’ने) नुकतेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा एक ‘ड्राफ्ट’ प्रकाशित केला आहे. ज्यात भारतीय इतिहासातील अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावर अनेक विचारवंतांसह असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतला आहे. या ड्राफ्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारताची जुनी परंपरा, समाज यांविषयी ज्ञान होईल. तसेच समाजव्यवस्था, धर्मपद्धती, राजकीय इतिहास याविषयीचा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जाईल. पाठ्यपुस्तकामधून आर्यांनी आक्रमण केल्याचा दावा अयोग्य असल्याचे म्हटले आहे. या पुस्तकांमध्ये बाबर आणि तैमूर यांना ‘आक्रमणकारी’ म्हणण्यात आले. याआधीच्या पाठ्यपुस्तकांत त्यांना आक्रमणकारी म्हणण्यात आले नव्हते.