धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आवश्यक ! – विवेक पंडित, कुडाळ

कुडाळ येथे छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाचे आयोजन

जिजामाता स्मारकाजवळ छत्रपती संभाजी महाराज यांची महती सांगतांना श्री. विवेक पंडित

कुडाळ – छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, तसेच स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलीदान दिले. हा आपला पराक्रमी इतिहास आहे; परंतु आज काही हिंदू इतिहास विसरल्याने नोकरी, पैसा आदींच्या लोभासाठी आपला धर्म सोडत आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानावरील धडा समाविष्ट करणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुडाळ येथील श्री. विवेक पंडित यांनी केले.

‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने शहरातील जिजामाता चौकातील ‘जिजामाता स्मारक’ येथे फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (१४ मार्च ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत) छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास पाळण्यात येत आहे. या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता सर्व शिवप्रेमी जिजामाता स्मारक येथे एकत्र येऊन धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पंडित बोलत होते.

‘ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे. ही जखम धुऊन काढण्यासाठी बलीदान मास सर्व गावांमध्ये पाळला गेला पाहिजे’, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दोडामार्ग तालुका कार्यवाह श्री. मंगेश पाटील यांनी केले.

‘शालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचा धडा समाविष्ट करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग आणि समविचारी संघटना मोहीम हाती घेत आहेत, अशी माहिती शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे श्री. रमाकांत नाईक यांनी दिली.