हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

‘कुंभ महिमा’(आपत्काळाची पूर्वसिद्धता विशेष) या विशेषांकाचे प्रकाशन करतांना पूज्य श्री तारा मां आणि त्यांच्या बाजूला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हरिद्वार, १३ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे. आपत्काळाची पूर्वसिद्धता, तसेच वनौषधींची लागवड यांच्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले. हरिद्वार कुंभमेळ्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या ‘कुंभ महिमा’(आपत्काळाची पूर्वसिद्धता विशेष) या विशेषांकाचे प्रकाशन पूज्य श्री तारा मां यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पूज्य श्री तारा मा प्रणीत शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष श्री. बालगोपाल तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि समितीचे उत्तराखंड समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके उपस्थित होते.

या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले की, या विशेषांकात कुंभमहिमा, हरिद्वार क्षेत्रमहिमा, गंगामहिमा, आनंदी जीवन जगण्यासाठी, तसेच आपत्काळात तरून जाण्यासाठी साधनेची आवश्यकता, आपत्काळात जीवांचे रक्षण होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर करायची सिद्धता आदींविषयीचे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

पू. श्री तारा मां यांचा परिचय

ठाणे आणि पुणे (महाराष्ट्र), गुडुवनचेरी (तमिळनाडू), हरिद्वार (उत्तराखंड), गुरुग्राम (हरियाणा), टेक्सास (अमेरिका) येथे पूज्य श्री तारा मां यांचे आश्रम आहेत. देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती घडल्यास ‘श्री तारा मां मिशन’च्या वतीने आपत्कालीन साहाय्य केले जाते. पूज्य श्री तारा मां यांच्या प्रेरणेने आपद्ग्रस्त अनाथ मुलांसाठी शाळा चालवल्या जातात. या शाळांमधून विद्यार्थ्यांना भौतिक शिक्षण देण्यासह त्यांच्यावर साधनेचे संस्कार केले जातात.

पूज्य श्री तारा मां यांनी ‘हिंदु जनजागृती समिती’चा विशेषांक हातात घेताच क्षणी ‘‘तुमचा हिंदी विभाग कोण पहाते ?’’, अशी विचारणा करत ‘‘ही हिंदी अतिशय सुंदर आहे’’, असा उत्स्फूर्त अभिप्राय व्यक्त केला. तेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले की, हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला संस्कृतनिष्ठ हिंदी उपयोगात आणण्याची शिकवण दिली आहे.’’