कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणार्या संबंधितांकडून पैसे वसूल करून घ्यावेत !
पुणे – सिंहगडावर येणार्या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे. स्थानिक वनसंरक्षण समितीनेही १५ लाख रुपये दिले. एवढा पैसा व्यय करून लोकांना प्रवेश मिळालाच नाही आणि उद्यानाची दुर्दशा झाली आहे, असे सिंहगड वनसंरक्षक समितीचे माजी अध्यक्ष दत्ता जोरकर यांनी सांगितले. वनधिकार्यांच्या अनास्थेमुळे उद्यानाची हानी झाल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.
वेगवेगळ्या कामांसाठी वन विभागाला सरकारकडून सातत्याने पैसे येत असतात. वन विभागाने मात्र मिळालेल्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केल्याची तक्रार गावकरी करत आहेत. तळई उद्यानामध्ये पाण्याच्या टाक्या, विहीर स्वच्छता, पॅगोडा, पदपथ, उद्यान, स्वच्छतागृह, बगिचा, दगडी गॅबियन वॉल अशी कामे पूर्ण करण्यात आली; मात्र उद्यान अजून बंदच आहे. उद्यानातील सर्व खेळणी, फायबरचे जंगली प्राणी, पॅगोडा सगळे धूळ खात पडून आहेत. विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असतांना, झाडांना पाणी घातले जात नाही. त्यामुळे शोभेची झाडे जळाली आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले की, तळई उद्यानासाठी दीड ते दोन कोटी रुपये व्यय झाले. कंत्राटदार कोण होते, नेमका किती व्यय झाला, ही माहिती अंधारात ठेवण्यात आली. याविषयी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला; मात्र वनाधिकार्यांनी दाद दिली नाही. या प्रकरणी वनाधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे.