मासेमार महिलेने तमिळ भाषेत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असतांना भाषांतर करतांना तिने कौतुक केल्याचे सांगितले !

पुदुच्चेरीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा !

अशा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती खोटेपणा केला असेल, याची चौकशी केली पाहिजे ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी, राहुल गांधी आणि तक्रार करतांना मच्छिमार महिला

पुदुच्चेरी – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुदुच्चेरी दौर्‍याच्या वेळी मासेमारांची भेट घेतली. या भेटीमध्ये एका महिलेने तमिळ भाषेमध्ये काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांची त्यांच्या उपस्थितीत तक्रार केली. राहुल गांधी यांना तमिळ भाषा कळत नसल्याने या वेळी मुख्यमंत्री सामी यांनी भाषांतर करतांना ‘ही महिला माझे कौतुक करत आहे’, अशा प्रकारची खोटी माहिती राहुल गांधी यांना दिल्याचे समोर आले आहे. यावरून सामाजिक माध्यमांतून काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री नारायण सामी यांच्यावर टीका केली जात आहे.

१. या महिलेने टीका करतांना म्हटले हेते की, पुदुच्चेरीमध्ये जेव्हा चक्रीवादळ आले होते, तेव्हा सत्ताधारी काँग्रेस सरकारने आम्हाला कोणतेही साहाय्य केले नाही. मुख्यमंत्रीही आम्हाला भेटायला आले नाहीत.

२. याचे भाषांतर करतांना मुख्यमंत्री सामी म्हणाले की, चक्रीवादळाच्या वेळी साहाय्य करण्याविषयी ही महिला कौतुक करत आहे, असे सांगितले.

राहुल गांधी यांच्याकडून जनतेची दिशाभूल

केंद्रीय मत्सपालन मंत्रालय असतांना त्याची स्थापना केली नसल्याचा राहुल गांधी यांचा हास्यास्पद आरोप

राहुल गांधी यांनी या भेटीच्या वेळी भाषण करतांना म्हटले की, भाजप सरकारने मासेमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय बनवलेले नाही, अशी टीका केली.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी लोकसभेत मत्स्यपालन, पशूपालन आणि डेयरी मंत्री यांच्याकडे एक प्रश्‍न विचारला होता आणि मंत्र्यांकडून त्याचे उत्तरही देण्यात आले होते. तरीही राहुल गांधी यांनी देशात मत्स्यपालनाविषयी मंत्रालय नसल्याचा उल्लेख केला. (यावरून राहुल गांधी जनतेची कशा प्रकारे दिशाभूल करतात, हे दिसून येते. असे नेते समाजाचे नेतृत्व करण्याच्या पात्रतेचे आहेत का ? – संपादक)