आज सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु अनंतानंद साईश यांचा दिनांकानुसार प्रकटदिन ! त्यानिमित्ताने…
१. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) पुष्कळ रुग्णाइत असल्याने आधुनिक वैद्यांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितले असूनही श्री अनंतानंद साईश यांचा भंडारा असल्याने मरण आले तरी भंडारा सोडून कुठेही जाणार नाही, असे प.पू. बाबांनी सांगणे
मला आठवते , वर्ष १९८८ मध्ये प.पू. अनंतानंद साईश यांचा मोरटक्का येथे भंडारा होता. त्या वेळी प.पू. बाबा पुष्कळ रुग्णाइत होते. आधुनिक वैद्य प.पू. बाबांना रुग्णालयात भरती होण्यास सांगत होते. तेव्हा ते म्हणाले, माझ्या गुरूंचा भंडारा आहे. मी कुठेही जाणार नाही. मला मरण आले, तरी चालेल. त्या वेळी प.पू. बाबांनी प.पू. रामजीदादा आणि प.पू. भाऊ बिडवई यांचे (रामानंद आणि अच्युतानंद) असे नामकरण केले.
२. गुरुबंधूंचे अलौकिक प्रेम रात्री प.पू. भुरानंद बाबा प.पू. बाबांच्या खोलीत आले. त्या वेळी तेथे आम्ही तिघेच होतो. तेव्हा त्यांच्यात पुढील संभाषण झाले.
प.पू. भुरानंद बाबा : क्या हुआ ?
प.पू. बाबा : खांसी बहुत हो गई है ।
प.पू. भुरानंद बाबा : तुझे कुछ नहीं हुआ है; तेरी घंटी (पडजीभ) बैठ गई है । मैं अभी ठीक कर देता हूं । (प.पू. भूरानंद बाबाने मुझे कहा) जा रवि, दो चार लौंग (लवंग) गरम कर, पीस कर, शहद में मिला कर ला ।
मी गेलो आणि मिश्रण सिद्ध करून आणले. प.पू. भुरानंद बाबांनी प.पू. बाबांच्या कमरेत हात घालून त्यांना उठवले आणि मध अन् लवंग यांचे चाटण मधल्या बोटाने प.पू. बाबांच्या घशात टाकले आणि म्हणाले, जा, तेरी घंटी बैठ गई है; अब सो जा । त्यानंतर प.पू. बाबा झोपले.
मला त्या दिवशी गुरुबंधूंमधील प्रेम पहायला मिळाले. खरेतर प.पू. बाबांना त्या दिवशी हृदयाचा पुष्कळ त्रास होत होता; मात्र त्यांनी त्याविषयी कुणालाही कळू दिले नाही. त्यांची गुरु मला काहीही होऊ देणार नाहीत, अशी अढळ श्रद्धा होती. प.पू. बाबांनी संसार करून भक्तांना योग्य मार्ग दाखवला.
हरि ॐ तत्सत् ।
नर्मदे हर हर हर ।
– श्री. रवींद्र कसरेकर (प.पू. भक्तराज महाराज यांचा मुलगा), नाशिक (६.१.२०१९, वेळ : ७ वाजून २ मिनिटे)