६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

कु. ऋग्वेदी हिने अलीकडेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

​(वर्ष २०१६ मध्ये कु. ऋग्वेदीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. ऋग्वेदी गोडसे

१. आश्रमजीवनाची ओढ असणे

१ अ. आश्रमात रहायला आल्यावर पुष्कळ आनंद होणे आणि आश्रमाजवळ घर असूनही एकदाही घरी जाण्याचा हट्ट न करणे : ऋग्वेदी ३ वर्षांची असतांना आम्ही देवद आश्रमाजवळील सनातन संकुल येथे रहाण्यास आलो. त्या वेळी ती सायंकाळी तिच्या बाबांच्या समवेत थोडा वेळ आश्रमात जात असे. तेथे ती आश्रम परिसरातील बालसाधकांशी खेळत असे. तेव्हापासून तिच्यात आश्रमात जाण्याची ओढ निर्माण झाली. ती आश्रमात रहायला जाण्यासाठी हट्ट करू लागली. तिने त्याविषयी स्वतःहून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना २ – ३ वेळा विचारले. त्यानंतर दळणवळण बंदीच्या काळात आम्ही आश्रमात रहायला आलो. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला. आमचे घर आश्रमाजवळ असूनही तिने एकदाही घरी जाण्याचा हट्ट केला नाही. त्यानंतर अडीच मास तिला तिचे बाबा भेटले नाहीत, तरीही त्याविषयी तिने गार्‍हाणे केले नाही.

१ आ. आश्रमातील वातावरणाशी जुळवून घेणे : आश्रमात रहायला आल्यानंतर तिने आश्रमातील वातावरणाशी लगेचच जुळवून घेतले. दळणवळण बंदीच्या काळात आश्रमात तिच्या वयाची कुणीच मुले नव्हती. तिच्याशी खेळायला कुणीच नाही. ती एकटी कशी रहाणार ?, या विचाराने मला तिची काळजी वाटत होती. यापूर्वी ती कधीच एकटी खेळत नसे. तिच्याशी खेळायला कुणी नसेल, तर मी तिच्याशी खेळावे, असा तिचा आग्रह असे; पण आश्रमात आल्यापासून तिने स्वतःमध्ये पुष्कळ पालट केला आहे. आता ती एकटीच खेळू लागली आहे. तिचे त्याविषयी गार्‍हाणे नसते. आता तर ती आश्रमातील सर्व सेवांच्या ठिकाणी जाऊन तेथील सेवेत तिच्यापरीने सहभागी होते.

– सौ. मेघा अतुल गोडसे (आई)

२. आश्रमात आल्यानंतर अल्प कालावधीमध्ये तिने प्रत्येक साधकाची ओळख करून घेतली. ते साधक काय सेवा करतात ?, हे सगळे तिने जाणून घेतले आणि ते तिने चांगले लक्षातही ठेवले.

३. उत्तम निरीक्षणक्षमता

आश्रमात पालटलेल्या लहान लहान गोष्टीही तिच्या लगेच लक्षात येतात. ती लगेचच विचारते, हे का पालटले ? हे कुठून आले ? त्या गोष्टी आमच्याही लक्षात आलेल्या नसतात. एकदा आम्ही दोघे आश्रमाच्या तिसर्‍या माळ्यावर गेलो होतो. त्या वेळी ती मला म्हणाली, बाबा, येथे ठेवलेला तपकिरी रंगाचा दूरभाष पालटून काळ्या रंगाचा ठेवला आहे.

– श्री. अतुल गोडसे (वडील)

४. सेवेची आवड

अ. मी धान्य निवडण्याची सेवा करते. धान्य चाळणे, निवडणे आणि वाळत घालणे, या सेवा तिने आनंदाने शिकून घेतल्या आणि ती त्या सेवेत सहभागी होते. – सौ. मेघा अतुल गोडसे

आ. एकदा मी आश्रमातील प्रसाधनगृह स्वच्छतेची सेवा करत होतो. त्या वेळी ती मला म्हणाली, मलासुद्धा ही सेवा करायची आहे. तेव्हा तिने माझ्याकडून ती संपूर्ण सेवा समजून घेतली आणि म्हणाली, आता मी एकटी सेवा करीन. तुम्ही दुसरे प्रसाधनगृह स्वच्छ करायला घ्या. तेव्हा तिचे वय ४ वर्षे होते.

– श्री. अतुल गोडसे

५. प्रगल्भता

ती लहान असूनही सर्व वयोगटांतील साधकांशी निर्भयपणे बोलते. प्रत्येक साधकाचे नाव आणि तो करत असलेली सेवा हे तिला ठाऊक असते. साधकांनी तिला विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे ती अचूकपणे देते. नवनवीन गोष्टी शिकण्याकडे तिचा ओढा असतो. आश्रमात लावण्यात येणारे मंत्र, उद्घोषणा इत्यादी तिला लगेचच पाठ होतात. – श्री. अतुल गोडसे

६. आज्ञापालन करणे

महाप्रसादाच्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) यांनी तिला तू हाताने जेवत नाहीस का ?, असे विचारले होते. तेव्हा तिला मी जेवण भरवावे, असे वाटायचे; पण त्यानंतर तिने प्रयत्नपूर्वक हाताने जेवणे चालू केले. त्या वेळी ती मला म्हणाली, संतांचे ऐकायचे असते ना ! – सौ. मेघा अतुल गोडसे

७. जिज्ञासू वृत्ती

अ. प्रत्येक नवीन गोष्ट तिला पूर्णपणे समजत नाही, तोपर्यंत त्याविषयी प्रश्‍न विचारून ती ते समजून घेते. आश्रमात लावण्यात येणारे मंत्र आणि अन्य स्तोत्रे यांचे अर्थ तिने विचारून घेतले आहेत. – सौ. मेघा अतुल गोडसे

आ. एकदा मी चिंतनसारणी भरत होतो. त्या वेळी तिने मला विचारले, बाबा, हे काय आहे ? त्यानंतर ती माझ्या मागेच लागली, बाबा, मलासुद्धा अशी चिंतनसारणी बनवून द्या. तिला वाचता येत नाही, तरीही तिने माझ्याकडून चिंतनसारणी बनवून घेतली आणि मला वाचायला सांगून ती आढावा देऊ लागली. – श्री. अतुल गोडसे

८. सतर्कता

८ अ. आई-बाबांमध्ये वाद चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ आईसमोर धरणे आणि परात्पर गुरु डॉक्टर पहात आहेत, याची आठवण करून देऊन त्यांच्यातील वाद थांबवणे : एकदा एका सूत्रावरून मी आणि यजमान यांच्यात वाद चालू होता. त्या वेळी तिने लगेचच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ माझ्यासमोर आणून ठेवला आणि त्यातील एक छायाचित्र काढून ती मला म्हणाली, आई, इकडे बघ, परम पूज्य तुला काय सांगत आहेत ? असे करून तिने आमच्यातील वाद थांबवला. तिची ती कृती पाहून आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आणि आम्ही परात्पर गुरुदेवांकडे क्षमायाचना केली. त्या वेळी ती केवळ अडीच वर्षांची होती. – सौ. मेघा अतुल गोडसे

८ आ. सत्संगात श्रीकृष्णाचा श्‍लोक म्हणण्याचे विसरल्याची जाणीव करून देणे : एकदा ती वाहन चालवण्याची सेवा करणार्‍या साधकांच्या सत्संगात बसली होती. ती आणि दोन साधक असे तिघेच जण सत्संगाला उपस्थित होते. प्रार्थना करून सत्संग चालू झाल्यावर लगेचच सूत्रे घेण्यास आरंभ झाला होता. तेव्हा तिने उत्तरदायी साधकाला श्रीकृष्णाच्या श्‍लोकाचे उच्चारण करायला विसरल्याची जाणीव करून दिली होती.

– सौ. मनीषा दीपक परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.११.२०२०)

९. ती साधारण ३ वर्षांची असल्यापासून तिला संत, ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक आणि अन्य साधक यांतील भेद लक्षात येतो.

१०. संतांप्रती भाव असणे

अ. तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही, तरीही परम पूज्य मला भेटले आहेत, असे ती ठामपणे सांगते. ते सांगतांना तिच्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती भाव जाणवतो.

आ. आम्ही आश्रमाजवळ रहाण्यासाठी आलो. तेव्हा तिला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याविषयी विशेष काही ठाऊक नसतांनाही ते दिसले की, ती लांबूनच त्यांना नमस्कार करत असे.

– सौ. मेघा अतुल गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.११.२०२०)

११. ऋग्वेदीला आलेल्या अनुभूती

११ अ. तिला पुष्कळ वेळा देवीदेवतांची स्वप्ने पडतात. सकाळी उठल्यावर ती प्रथम मला तिला पडलेले स्वप्न सविस्तरपणे आणि व्यवस्थित सांगते.

११ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीच्या भिंतीचा रंग निळा दिसणे : आश्रमातील काही साधिका परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीची स्वच्छता करत होत्या. तेव्हा तिने साधिकेला मी काय सेवा करू ?, असे विचारले. एका साधिकेने तिला भिंत पुसण्याची सेवा दिली होती. त्या वेळी तिला भिंतीचा रंग निळा दिसू लागला. तेव्हा तिने मला कृष्णाचा रंग दिसत आहे, असे भावपूर्णरित्या सांगितले.

११ इ. नामजप ऐकू येणे

१. आम्ही सनातन संकुलात वास्तव्यास असतांना एकदा तिला ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नमः । हा नामजप स्पष्टपणे ऐकू येत होता. तिला पुष्कळ आनंद झाला आणि ती मला म्हणाली, आई, मला हा नामजप ऐकू येत आहे.

२. एकदा ती अत्तर भरण्याच्या सेवेच्या ठिकाणी गेली असतांना तिला अत्तराच्या बाटल्यांमधून  विठ्ठल, विठ्ठल, असा नामजप ऐकू आला. तेव्हा तिने मला ते आनंदाने सांगितले होते.

११ ई. स्वप्नात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजप सांगितल्याचे दिसणे : काही दिवसांपूर्वी तिला २ – ३ दिवस जेवण जात नव्हते. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याकडून नामजपादी उपाय विचारून घेण्यात माझ्याकडून चालढकलपणा झाला. त्या वेळी सकाळी उठल्या उठल्या ती मला म्हणाली, आई सद्गुरु राजेंद्रदादा माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला जेवण जात नाही; म्हणून एक नामजप करण्यास सांगितला आणि तो नामजप मी केला.

११ उ. पू. शिवाजी वटकरकाका संत होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे : आम्ही आश्रमात नवीन असतांना पू. वटकरकाका यांच्याविषयी तिला काहीच ठाऊक नव्हते. पू. वटकरकाका संतपदी विराजमान होण्यापूर्वी २ मास आधी ती एकदा महाप्रसाद वाढून घेत असतांना लांबूनच मला म्हणाली, आई, ते बघ संत, संत ! त्या वेळी तिने त्यांच्याकडे बोट केले.

१२. स्वभावदोष

हट्टीपणा, मोठ्याने बोलणे आणि रागीटपणा.

– सौ. मेघा अतुल गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.११.२०२०)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक