तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर प्रयत्न करणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची सुश्री (कु.) कल्याणी गांगण !

साधकांना साधना करतांना वाईट शक्ती विविध प्रकारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण करत असतात अन् साधकांना साधनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची सुश्री (कु.) कल्याणी गांगण हिला झालेले तीव्र त्रास आणि त्यातही तिने परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून केलेले प्रयत्न येथे आपण पहात आहोत. २६ डिसेंबरला आपण वर्ष ३ जानेवारी ते ५ जुलै २०२० पर्यंत झालेले त्रास पाहिले. आज या लेखमालेचा अंतिम भाग पाहूया.

या लेखाचा या पूर्वीचा भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/867016.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही सुश्री (कु.) कल्याणी गांगण हिची अभ्यासू वृत्ती किती होती, हे सर्वांनी या लेखातून शिकण्यासारखे आहे.’

 –  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

५. जुलै २०२०

५ ई. प्रयोग चालू झाल्यावर स्वतःचे अस्तित्व न जाणवणे : पहिल्या दिवसापासून ‘अनेक वर्षांपासून मला त्रास देणार्‍या वाईट शक्ती निघून जायला हव्यात’, असा विचार करून मी लढण्याचा प्रयत्न करायचे. या कालचक्राचा कालावधी हा सूक्ष्मातील महायुद्धाचा शेवटचा काळ आहे. सहा महिने प्रयोग चालू असतांना मला कधी कधी ‘मी जिवंत आहे कि नाही ?’, असा प्रश्न पडायचा. प्रयोग चालू झाल्यावर मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.

५ उ. ‘प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टर साधिकेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत आहेत’, असा विचार मनात सतत येणे : ‘मी काळाच्या चक्रात अडकून पडले आहे’, असे दृश्य मला सतत दिसत होते. एकदा पहाटे मला दृश्य दिसले. त्यात ‘मला यम दिसत होता. मी त्याला विचारले, ‘मला न्यायला आला आहेस का ?’ तेव्हा तो म्हणाला, ‘तुझ्या गुरूंनी सांगितल्याविना मी तुला नेऊ शकत नाही.’ त्यानंतरही हे दृश्य मला अधूनमधून दिसत होते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर मला प्रत्येक वेळी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत आहेत’, असा विचार माझ्या मनात सतत येत होता.

एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुला ‘मृत्यू’ हा शब्द सतत ऐकून तुझ्या मनातील मृत्यूची भीती दूर झाली असेल ना !’’ त्यावर मी ‘हो’, असे म्हणाले; कारण त्या आधी काही मास माझ्या मनात सतत माझ्या मृत्यूचाच विचार येत होता. ‘हा विचार का येत होता ?’, हे मला कळत नव्हते.

५ ऊ. ‘पुढच्या पिढीला आध्यात्मिक त्रासाविषयी समजावे’, असा समष्टी विचार करून प्रतिदिन प्रयोगाला बसणे : पाताळ आणि सप्तलोक यांच्यामध्ये जोरात सूक्ष्म युद्ध चालू आहे. त्याला सामोरे जावे लागणार आहे. पृथ्वीवर वाईट शक्तींचे प्राबल्य आहे; परंतु त्याहीपेक्षा गुरूंचे सामर्थ्य अनेक पटींनी अधिक आहे. ते एका क्षणात हे सर्व पालटू शकतात; परंतु पुढच्या पिढीला ‘कसे लढायचे आणि त्रास म्हणजे काय ?’, ते काहीच कळणार नाही. या विचाराने मी प्रतिदिन न चुकता प्रयोगाला जात होते.

५ ए. त्रास वाढला असतांना आतून सतत नामजप, प्रार्थना आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण आठवत राहिल्याने वाईट शक्ती मनावर करत असलेले चुकीचे आघात न्यून होणे : प्रयोगाच्या वेळी मला चित्रीकरण कक्षात वेगळी स्थिती दिसत होती. वाईट शक्तींची स्थिती वेगळी असायची. बाहेर चेष्टामस्करी आणि मानसिक त्रास देऊन माझे खच्चीकरण करायच्या. ही त्यांची युद्धनीती लक्षात घेण्यासारखी आणि भयानकही होती. पाताळातील वाईट शक्ती एकमेकांना साहाय्य करून शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा मला सर्वत्र काळोख दिसायचा. त्या ध्यान लावून शक्ती मिळवत होत्या. हे माझ्या लक्षात आल्यावर मी सतत नामजप, प्रार्थना आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण आठवत रहायचे. त्यामुळे वाईट शक्ती मनावर करत असलेले चुकीचे आघात न्यून झाले. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने झाले. तेव्हा मला पोटातील आतडी पिळवटणे, पाय सतत वळणे (शिरा खेचल्यासारख्या होणे) सतत मळमळणे, असे त्रास व्हायचे.

५ ऐ. नामजपाचे प्रयोग सकाळी चालू झाल्यावर ते उशिरा संपायचे; परंतु रात्रीही मला शांत झोप लागत नसे. मधेच त्रास झाल्यावरही लगेच नामजप चालू करून न्यास आणि मुद्रा करणे, प.पू. भक्तराज महाराजांचे भजन ऐकणे, हे उपाय केल्यावर मला झोप लागायची. तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता, ‘मोठ्या वाईट शक्तींची शक्ती वाढू द्यायची नाही.’

६. वर्ष २०२१

सुश्री (कु.) कल्याणी गांगण

६ अ. सूक्ष्मातून भीतीदायक आवाज ऐकू आल्यावर ‘भजन ऐकणे, नामजप करणे’, असे प्रयत्न करणे आणि त्यानंतर झोप लागणे : मे, जून आणि जुलै २०२१ या मासांमध्ये मला सतत सूक्ष्मातून आवाज यायचे, उदा. कुणातरी नातेवाइकांचे निधन झाले; म्हणून माणसे रडत आहेत, कुठेतरी आग लागली आहे, भूकंप होऊन इमारती पडत आहेत. त्यांतील सामान, भांडी पडून जो आवाज व्हायचा, त्या आवाजाने मी झोपेतून दचकून उठत होते. उठल्यावर ‘आश्रमात सर्वत्र शांतता आहे, हे माझ्या लक्षात यायचे. तेव्हा मला ‘हा सूक्ष्मातील युद्धाचा आवाज आहे’, हे लक्षात यायचे. त्या वेळी लगेच भजन ऐकणे किंवा नामजप करणे, असे केल्यावर मला झोप लागायची.

६ आ. जलप्रलय होणे, समाजात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढणे, अशी दृश्ये दिसणे : ‘जलप्रलय होऊन सर्व पाण्याखाली गेले आहे. त्या पाण्यात श्रीविष्णु शेषशय्येवर विराजमान आहे. सतत काहीतरी घडत आहे’, असे मला जाणवत होते. प्रत्यक्षात जुलै महिन्यामध्ये पूर आला, त्याच वेळी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही वाढले होते. यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही पुष्कळ वाढले होते. त्या कालावधीत ११ संतांनी देहत्याग केला. त्यानंतर सर्व वातावरण शांत झाले. ‘वरील सर्व परिस्थितीत मी जिवंत आहे, हे महत्त्वाचे आहे आणि क्रियमाण वापरून सर्व करत रहाणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन मी सेवा करत होते.

६ इ. वाईट शक्तीचा त्रास उणावून मन पुष्कळ उत्साही होणे : वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून माझ्यात अकस्मात् चैतन्य निर्माण होऊन मन पुष्कळ उत्साही झाल्याचे जाणवू लागले. जशी माझी २०२० च्या गुरुपौर्णिमेला मनाची स्थिती अकस्मात् खालावली होती, तशी २०२१ च्या गुरुपौर्णिमेला माझी स्थिती अकस्मात् पालटली. तेव्हा माझ्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांचे वाक्य आठवले, ‘काळ पालटला की, आपोआप परिस्थितीत पालट होत जाणार आहे’, याची मला प्रचीती आली. ‘मनात येणारा विचार देवाचा आहे’, याची मला सतत जाणीव होत होती.

७. साधनेचे प्रयत्न होऊ लागल्यावर स्वतःमध्ये झालेले पालट

अ. हळूहळू मी ‘सत्र, प्रार्थना आणि नामजपादी उपाय’, असे प्रयत्न करू लागले. तेव्हा माझ्या मनावरचा ताण न्यून होऊन मनाला समाधान मिळू लागले.

आ. मी प्रयोगात बसल्यावर ‘कुठल्याही परिस्थितीत मनाला नकारात्मक स्थितीत न्यायचे नाही आणि कुठल्याही साधकाचे नकारात्मक विचार ऐकायचे नाहीत’, असे मनाला सतत सांगत होते. हा संस्कार मनावर केल्यावर मोठ्या वाईट शक्तीचे अस्तित्व न्यून होत गेले. त्यानंतर मी साधनेचे प्रयत्न करायला आरंभ केला.

इ. एकदा माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. त्या वेळी प्रयोगातील नामजपाचे उपाय चालू होऊन सहा मास झाले होते. माझी स्थिती ४० टक्के सुधारली होती. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सहा मासांतच तू बाहेर पडली आहेस. नाहीतर कितीतरी वर्षे लागली असती या स्थितीला यायला.’’

ई. ‘मला काहीच येत नाही. मला शिकायचे आहे’, असा विचार करून साधनेचे प्रयत्न करण्यास आरंभ केला. यामुळे माझ्या मनाची स्थिती सुधारत गेली.

उ. नियमित प्रयत्न केल्यावर ‘त्रास न्यून होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्रासाचे प्रमाण न्यून झाल्यावर मी भाव वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रत्येक नामजप अर्पण होऊन त्यामुळे मनातील सर्व विचार निघून नामजपाचे चैतन्य सर्वत्र पसरत आहे’, असे दृश्य मला दिसत होते.

ऊ. ‘समोर येणारी प्रत्येक परिस्थिती स्वीकारणे ही माझी साधना आहे. याने माझा मनोलय होणार आहे’, या विचाराने मी सर्वत्र पहाण्याचा प्रयत्न करत आहे. काही मासांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘सर्व साक्षीभावाने पहा’, असे सांगितले. त्यामुळे त्यांचे आज्ञापालन म्हणून मी सर्व स्वीकारत आहे.

८. कृतज्ञता

वरील सर्व पालट ‘संत करत असलेले नामजपादी उपाय, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेले नामजपादी उपाय आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले साधनेविषयी केलेले मार्गदर्शन’, या सर्व नामजपादी उपायांतील चैतन्यामुळे होत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् भगवंत आहेत. त्यांनी मला सर्वकाही दिले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.’                                               (समाप्त)

– सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक