
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेच्या स्वप्नात येऊन तिला नामजपादी उपाय करायला सांगणे
‘८.९.२०२३ या दिवशी मला निराशा आल्यामुळे काहीच करावेसे वाटत नव्हते. मी रात्री प्रार्थना करून झोपल्यावर मला स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हा ‘त्या काय सांगत आहेत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी झोपेतून उठल्यावर मला त्यांचे एकच वाक्य आठवले, ‘कौमुदी, आता नामजपादी उपायांकडे लक्ष दे.’ तेव्हापासून माझ्याकडून नामजपादी उपाय चांगल्या प्रकारे होत आहेत.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेच्या स्वप्नात येऊन तिला प्रार्थना करण्यास सांगणे

काही दिवसांपूर्वी मला मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा काही कारणास्तव मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारणे शक्य झाले नाही. १२.९.२०२३ या दिवशी रात्री मी झोपल्यावर मला स्वप्नात सद्गुरु गाडगीळकाकांचे दर्शन झाले. ते मला म्हणाले, ‘तू देवाला प्रार्थना कर, ‘हे देवा, तुझे चैतन्य थेट माझ्या आत्म्यापर्यंत जाऊ दे.’ त्यामुळे तुझ्या मनात साचत असलेले विचार दूर होतील.’ तेव्हा मला वाटले, ‘देवाच्या चैतन्यामुळे माझी देहशुद्धी होऊन माझ्या मनातील विचार नष्ट होतील.’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला स्वप्नात दर्शन देणे आणि तिला ‘परिस्थितीला धिराने सामोरी जा’, असे सांगणे
२९.९.२०२३ या दिवशी रात्री मला स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या.’ त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘आता प्रयत्न होत आहेत ना. आता मुळीच मागे जायचे नाही. परिस्थितीला धिराने सामोरी जा.’
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे स्वप्नातील बोलणे आठवल्यावर साधिकेची भावजागृती होणे आणि तिला ऊर्जा मिळणे अन् उत्साह येणे

विशेष म्हणजे अन्य वेळी मला पडलेले स्वप्न माझ्या लक्षात रहात नाही; मात्र सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला स्वप्नात सांगितलेले आठवते अन् त्याचा परिणाम टिकून रहातो. त्यांचे बोलणे आठवल्यावर माझी भावजागृती होते. मला प्रयत्न करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते आणि आपोआप उत्साह येतो.
५. अंतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
प.पू. डॉक्टर, मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु गाडगीळकाका यांना भेटावे’, असे वाटते. मला त्यांना ‘माझ्या स्थितीविषयी सांगावे’, असे वाटते; मात्र मी त्यांना काही न सांगताही त्यांना माझी स्थिती समजते आणि त्यानुसार ते मला मार्गदर्शन करतात. ‘ते माझ्या समवेतच आहेत. मला जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा ते मला भेटणार आहेत आणि मार्गदर्शन करणारच आहेत’, अशी माझी श्रद्धा वृद्धींगत करण्यासाठी तुम्ही असे करता’, असे मला वाटते.
‘माझी आपल्या तिघांप्रती श्रद्धा दृढ होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
|