(म्हणे) ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा !’ – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

मुंबईचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा काहीही संबंध नसतांना वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करत आहेत, हेच स्पष्ट होते ! जर सीमावादातील भाग वादग्रस्त आहे, तर तो केंद्रशासित करण्यास काय अडचण आहे ?

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी

बेंगळुरू (कर्नाटक) – ज्या क्षेत्रावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात रहाणार्‍या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे. जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो, असे विधान कर्नाटकचे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी केले आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असणार्‍या क्षेत्राला केंद्रशासित घोषित करण्याच्या मागणीवर बोलत होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय. ते म्हणाले की, वादग्रस्त भूभाग हा महाराष्ट्राच्या मालकीचा असून तो महाराष्ट्राला परत मिळाला पाहिजे. बेळगाव, निप्पाणी आणि कारवार या भागामध्ये मराठी भाषिक लोकसंख्या अधिक आहे. यावरूनच ही भूमी महाराष्ट्राची असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही जमीन महाराष्ट्राला देण्यात यावी.