राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम 

अशी निवेदने का द्यावी लागतात ? प्रशासन स्वतःहून प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान का रोखत नाही?

उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना निवेदन देतांना डावीकडून समितीचे  सर्वश्री रवींद्र परब, सुरेश दाभोळकर, यशवंत परब आणि गजानन मुंज

सिंधुदुर्ग – प्रजासत्तादिनाच्या दिवशी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे, शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करणार्‍यांवर गुन्हे नोंद करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतीकाविषयी जागृती करणे, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि  सनातन संस्था यांच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, गटशिक्षण अधिकारी, तसेच माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालये यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असतांना ‘हातातील राष्ट्रध्वज भूमीवर पडू नये’, यासाठी अनेक लाठ्या खाल्ल्या, राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये, यासाठी क्रांतीकारकांनी प्रसंगी प्राणाचेही बलीदान दिले. असे असतांना लहान मुलांना खेळण्यासाठी, वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे, रस्त्यांवर अन् नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, ते पायदळी तुडवले जातात. ही कृती म्हणजे राष्ट्रध्वजासाठी बलीदान करणार्‍या क्रांतीकारकांची आणि अत्याचार सहन करणार्‍या देशभक्तांची क्रूर चेष्टाच आहे, तसेच काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे स्वतःचा तोंडवळा रंगवतात. अशा कृतींमळे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होतो. या कृती रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी दिलेली निवेदने !

जिल्हा मुख्यालय, ओरोस

पोलीस उपअधीक्षक श्रीमती गावडे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी श्री. यशवंत परब, समितीचे श्री. सुरेश दाभोळकर आणि श्री. गजानन मुंज,

उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, पोलीस उपअधीक्षक श्रीमती गावडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. अशोक खडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर यांना निवेदने देण्यात आली. या वेळी कसाल गावचे प्रमुख मानकरी श्री. यशवंत परब, सर्वश्री रवींद्र परब, गजानन मुंज आणि सुरेश दाभोळकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी

येथील पोलीस सहनिरीक्षक श्री. योगेश जाधव आणि तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांना, तसेच ‘देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स’, ‘पंचम खेमराज महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, ‘राणी पार्वतीदेवी माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालया’चे उपमुख्याध्यापक श्री. सदानंद धोंड यांना निवेदने देण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चंद्रकांत बिले, गणेश पेंढारकर, उमाजी चव्हाण आदी उपस्थित होते,

देवगड

येथील तहसीलदार श्री. मारुति कांबळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, स. ह. केळकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुखदा जांभळे, शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संजीव राऊत यांना निवेदने देण्यात आली. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री अनिकेत माने, श्रेयस शाहाकार, दीपक पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे अनिरुद्ध दहिबावकर, अशोक करंगुटकर आदी उपस्थित होते.

मालवण

येथील तहसीलदार श्री. सुधीर सुभाष पाटील, अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे प्राचार्य श्री मिलिंद अवसरे, तसेच स.का. पाटील महाविद्यालय यांनाही निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी बैठक आयोजित करून मार्गदर्शन करणार ! – पोलिस निरीक्षक एस्.एस्. ओटवणेकर

राष्ट्रप्रेमींकडून पोलीस निरीक्षक एस्.एस्. ओटवणेकर आणि पोलीस उपनिरीक्षक फार्णे यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी या दोघांनी ‘नगर परिषद, तसेच सर्व ग्रामपंचायती आणि पोलीस पाटील यांना समवेत घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी  योग्य ते नियोजन करू’, असे आश्‍वासन दिले, तसेच पोलीस निरीक्षक एस्.एस्. ओटवणेकर यांनी ते नगर जिल्ह्यामध्ये असतांना राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ‘राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांना १४९ ची नोटीस देऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राखणार. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून त्या वेळी राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राखावा, याविषयी  मार्गदर्शन करणार’, असे त्यांनी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कणकवली

येथील नायब तहसीलदार श्रीमती संगीता पाटील, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, तसेच कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले यांना निवेदने देण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे सर्वश्री सूर्यकांत मालवणकर, श्रीधर मुसळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विष्णु कदम आदी उपस्थित होते.